Breaking News

तायक्वांडोमुळे हिमांशू बनला अभिनेता ‘सोबत’ चित्रपटाद्वारे करणार सिनेसृष्टीत पदार्पण

मुंबई : प्रतिनिधी

नशीबाचा खेळ कधीच कुणाला कळला नाही. मोठेपणी समाजात ठामपणे उभं राहायचं असेल तर अभ्यास करण्याचा सल्ला सर्वांनाच मिळत असतो. त्या जोडीला आणखी एक पर्याय खुला ठेवण्यासाठी एखाद्या खेळात प्रावीण्य मिळवण्याकडेही पालक आणि पाल्यांचा कल असतो. पण इतकं करूनही काहीजण एखाद्या भलत्याच क्षेत्रात नावलौकीक मिळवतात. यात रुपेरी पडद्यावर चमकणाऱ्या काही चेहऱ्यांचाही समावेश आहे. काही जण डॅाक्टरी पेशाकडून अभिनयाकडे वळतात, तर काही शिक्षकी… काही आयटीकडून, तर काही खेळाकडून… याच कलाकारांचा वारसा चालवत आणखी एका खेळाडूची पावलं सिनेसृष्टीच्या दिशेनी वळली आहेत. तायक्वांडोमध्ये पटाईत असलेला हिमांशू विसाळे हा तरुण ‘सोबत’ या आगामी सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत चमकणार आहे. विशेष म्हणजे हिमांशूला तायक्वांडो या खेळानेच अभिनेत्याच्या रूपात चमकण्याची संधी दिली आहे.

तायक्वांडो खेळात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेला हिमांशू २५ मे पासून प्रदर्शित होणाऱ्या ‘सोबत’ या सिनेमात अभिनेत्याच्या रूपात दिसणार आहे. कश्मिरा फिल्म्स प्रोडक्शन्स निर्मिती असलेल्या ‘सोबत’ या सिनेमाचं दिग्दर्शन मिलिंद उके यांनी केलं आहे. हिमांशूसोबत या सिनेमात मोनालिसा बागल नायिकेच्या भूमिकेत आहे, तर रुचिरा जाधव, गिरीश परदेशी, स्मिता गोंदकर, नागेश भोसले, प्रदीप वेलणकर, विजय गोखले, मनोज टाकणे, अभिलाषा पाटील, अश्विन पाटील, कौस्तुभ जोशी या कलाकारांचा चित्रपटात समावेश आहे.

‘सोबत’ ही गोष्ट आहे करण आणि गौरी या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुण-तरुणीची… गौरीच्या घरून असलेल्या विरोधाला सोमोरे जात करण गौरीशी लग्न करतो असं या सिनेमाचं कथानक आहे. सिनेसृष्टीतील पदार्पणाविषयी विचारलं असता हिमांशू म्हणाला की, मला आंतरराष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत सुवर्णपदक मिळालं होतं. तेव्हा सगळीकडे माझी पोस्टर्स लागली होती. त्या पोस्टरवरचा माझा फोटो पाहून ‘सोबत’च्या निर्मात्यांनी चित्रपटात काम करण्याविषयी विचारलं. यापूर्वी कधी चित्रपटात काम केलं नव्हतं. मात्र, शाळेत असताना नाटकांतून काम केलं होतं. त्यामुळे एक संधी म्हणून या चित्रपटात काम केलं. ‘सोबत’च्या निमित्ताने मिलिंद उके यांच्यासारख्या अनुभवी दिग्दर्शकांसोबत काम करताना खूप काही शिकायला मिळालं. प्रत्येक सीनपूर्वी रिहर्सल केल्याने शूटिंग करताना कुठेही अडचण भासली नाही. आता पुढे जाऊन अभिनयच करेन असं काही ठरवलेलं नाही. संधी मिळाली, तर अभिनय करत राहण्याचा हिमांशूचा मानस आहे.

Check Also

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी या तीन मराठी चित्रपटांची निवड मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाकडून ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय या तीन मराठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *