Breaking News

नवा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच २४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या जणगणनेसाठी २६ कोटींची तरतूद

मुंबईः विशेष प्रतिनिधी

राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक राहीलेला असतानाच २४ हजार ७२३ कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या आज विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केल्या. विशेष म्हणजे या पुरवणी मागण्यात काही नव्या योजनांचा सुतोवाच करण्यात आला आहे.

या पुरवणी मागण्यांमध्ये सर्वाधिक रकमेची तरतूद शेतकरी कर्जमाफीसाठी करण्यासाठी करण्यात आली आहे. ३५ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा देण्यासाठी २ हजार कोटी रूपये यासाठी यापूर्वीच काढून ठेवण्यात आले होते. यात भर घालण्यासाठी राज्याच्या आकस्मिक निधीतून १ हजार कोटी रूपये काढून ती रक्कम यात जमा करण्यात आली. तर १४ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून एकूण १५ हजार कोटी रूपये यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सातारा, सांगली, कोल्हापूरात आलेल्या पूरामुळे नुकसान भरपाई आणि नागरीकांच्या पुर्नवसनासाठी ५ हजार ३७९ कोटी रूपयांची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय शासकिय इमारतींची दुरूस्ती- नव्याने बांधणी, रेल्वे उड्डाणपूल, पादचारी रस्ते, रस्ते विस्तारीकरण, शहरी रस्ते बांधकाम आदीसाठी तब्बल २ हजार कोटी रूपयांची मागणी करण्यात आली आहे.

नगरविकास विभागासाठी ३४२ कोटी रूपये, गृहनिर्माण योजनेसाठी १६५२ कोटी रूपये, पाणी पुरवठा विभागासाठी ४४२ कोटी रूपयांची मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय राष्ट्रीय जनगणनेच्या राज्यातील कामासाठी २६ कोटी रूपयांची तरतूद राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या पिकाचे विमा हप्ते भरण्यासाठी १५० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली. तर राज्य सरकारने जाहीर केलेल्या शिवभोजन योजनेसाठी या पहिल्या वर्षासाठी ६ कोटी ३८ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली असून अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या इतर कामासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून ५०७ कोटी रूपयांची मागणी करण्यात आलेली आहे.

याशिवाय केंद्र सरकारकडून राज्यातील केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी ६२४ कोटी रूपये आले आहेत. तर राज्य सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी ७७९ कोटी रूपयांचा निधी मागण्यात आला आहे.

पर्यटन मंत्री आदीत्य ठाकरे यांच्या महत्वकांक्षी मुंबई पर्यटना प्रकल्प योजनेसाठी १०० कोटी रूपयांचा निधीही या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Check Also

इंडिगो, जगातील तिसऱ्या क्रमांकांची विमान कंपनी बनली भारतातील सर्वात मोठी एअरलाइन

इंडिगो विमान कंपनीने बुधवारी बाजार भांडवलाच्या बाबतीत यूएस-आधारित साउथवेस्ट एअरलाइन्सला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *