Breaking News

निवृत्त अधिकारी आणि वृत्त निवेदिकेचा मुलगा बनला देशाचा नवा लष्करप्रमुख ले. जनरल मनोज नरवणे वर्षाच्या पूर्णसंध्येला स्वीकारणार सुत्रे

नवी दिल्ली : प्रतिनिधी
केंद्र शासनाने महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनन्ट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची भारतीय सैन्यदलाचे नवे लष्करप्रमुख म्हणून निवड केली आहे. विद्यमान लष्करप्रमुख बिपीन रावत येत्या ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून ले.जनरल नरवणे हे लष्करप्रमुख पदाचा कार्यभार त्यांच्याकडून स्विकारतील. त्यांचे वडिल मुकुंद नरवणे हे हवाई दलात अधिकारी होते. तर त्यांच्या मातोश्री या सुधा नरवणे या पुणे आकाशवाणीवर वृत्त निवेदिका म्हणून काम पहात होत्या.
नरवणे यांच्या रुपाने मराठी माणूस देशाच्या लष्कराच्या सर्वोच्च पदी विराजमान होणार आहे. या पदावरील ते दुसरे मराठी अधिकारी असतील. यापूर्वी जनरल अरूण कुमार वैद्य या मराठी अधिका-याला १९८३ ते १९८६ या कालावधीत देशाच्या लष्कर प्रमुखपदाचा बहुमान मिळाला आहे.
केंद्र सरकार व संरक्षण मंत्रालयातील उच्चपदस्थ समितीने सेवा ज्येष्ठतेनुसार मनोज नरवणे यांची देशाचे आगामी लष्करप्रमुख म्हणून निवड केली आहे. मूळ पुण्याचे असलेले नरवणे सध्या भारतीय लष्कराचे उपप्रमुख असून विद्यमान लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत येत्या ३१ डिसेंबरला निवृत्त होत आहेत. त्यामुळे नरवणे यांना लष्करप्रमुख म्हणून बढती देण्यात येत आहे.
ले. जनरल मनोज नरवणे यांच्या विषयी
ले.जनरल नरवणे यांनी सप्टेंबर २०१५ या महिन्यात व्हाइस चीफ ऑफ आर्मी स्टाफ पदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्याआधी ते सैन्याच्या पूर्वेकडच्या भागाची जबाबदारी सांभाळत होते. भारताच्या चीनशी संलग्न सुमारे ४,००० कि.मी. लांब सीमेच्या रक्षणाची जबाबदारी नरवणे यांनी समर्थपणे सांभाळली आहे.
नरवणे यांचे वडील मुकुंद नरवणे हे हवाई दलातील निवृत्त अधिकारी आहेत. त्यांच्या आई सुधा या प्रसिद्ध लेखिका आणि आकाशवाणीच्या निवेदक होत्या. ले.जनरल नरवणे यांचे शालेय शिक्षण पुण्यातील ‘ज्ञानप्रबोधिनी’त झाले असून चित्रकलेची आवड जोपासत असतानाच त्यांना लष्करी सेवेचे वेध लागले. महाविद्यालयीन शिक्षणानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण करून ते जून १९८० मध्ये ते ‘७ सीख लाइट इन्फंट्री’मधून लष्करात दाखल झाले.
जम्मू-काश्मीर मधील दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी कार्यरत राष्ट्रीय रायफल्सचे त्यांनी नेतृत्व केले. आसाम रायफलचे उत्तर-पूर्व विभागाचे ‘इन्स्पेक्टर जनरल’, स्ट्राइक कोअरचे दिल्ली क्षेत्रातील ‘जनरल ऑफिसर इन कमांडिंग’, लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख, महू स्थित लष्कर युद्धशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षक अशा अनेक पदांची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. नरवणे यांना सोपविण्यात आलेली प्रत्येक जबाबदारी चोखपणे पूर्ण पाडत आपले कौशल्य, वेगळेपण सिद्ध केले. या कामगिरीची वेळोवेळी दखल घेण्यात आली.

Check Also

३१ डिसेंबरला अलविदा करून नववर्षाचे स्वागत करायचेय? मग या सूचना वाचा राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई : प्रतिनिधी मदत व पुनर्वसन विभागाने एका आदेशान्वये राज्यात २२ डिसेंबर,२०२० ते ५ जानेवारी, २०२१ या कालावधीत रात्री ११.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *