मुंबईः विशेष प्रतिनिधी
कोरोना व्हायरसला थोपविण्यासाठी संपूर्ण जगावर लढण्याऐवजी थांबण्याची वेळ आली आहे. सततची वाढती गर्दी ओसरण्यास सुरुवात झालेली असली तरी ही गर्दी पूर्णपणे बंद होण्यासाठी मुंबईसह राज्यातील संपूर्ण वाहतूक व्यवस्था बंद करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र मुंबईतील लोकल सेवा, बसेस आणि बँका वगळता गर्दी होण्यास कारण ठरणारी सर्व खाजगी कार्यालये, दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याने सर्व नागरीकांनी घरात बसून सहकार्य करावे अशी आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केले. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, आरोग्यमंत्री राजेश टोपे आदी उपस्थित होते. यावेळी प्रसिध्द दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी कोरोना व्हायरसच्या विरोधात लढा देण्यासाठी तयार केलेल्या एका छोटी फिल्मचे प्रकाशन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
मुंबईतील लोकल आणि बसेस या एमएमआरएच्या रक्तवाहीन्या आहेत. त्या बंद केल्यातर वैद्यकीय सेवेशी निगडीत असणारे डॉक्टर, कंपाऊडर, नर्सेस, अॅम्ब्युलन्सचे ड्रायव्हर, महानगरपालिकांचे साफसफाईचे कर्मचारी, पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी यांच्या येण्या-जाण्यावर निर्बंध येतील. त्यामुळे त्यांना जनतेच्या सेवेसाठी यावे लागणार असल्याने लोकल आणि बसेस बंद करता येणार नाही. मात्र बाकिच्यांनी घरात बसून करायचे काय म्हणून लोकल आणि बसेसने फिरून विनाकारण गर्दी करू नका असे आवाहन त्यांनी केले.
याशिवाय गर्दीसाठी प्रमुख कारण ठरत असलेली खाजगी आस्थापनांची कार्यालये, किंवा ऑफिसेस, दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट आदी गोष्टी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे लोकल आणि बसेस मध्ये सध्या जी काही होणारी गर्दी आहे. ती पूर्णपणे बंद होणार आहे. त्याचबरोबर शासकिय कार्यालयांमध्ये जी ५० टक्केवर आणण्यात आलेली संख्या होती. ती आता आणखी २५ टक्क्यांनी कमी करण्यात आली असून २५ टक्के संख्येवर ही कार्यालये सुरु राहतील अशी माहिती त्यांनी दिली.
खाजगी आस्थापनांची कार्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जरी राज्य सरकारने जारी केलेले असले तरी या आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पगार बंद करू नये असे आवाहन त्यांनी खाजगी मालक आणि प्रशासनाला केले.
यावेळी प्रसिध्द दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी कोरोना व्हायरसच्या विरोधात लढा देण्यासाठी तयार केलेल्या एका छोटी फिल्मचे प्रकाशन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
पुढील १५ दिवस अत्यंत काळजी घेण्याचे असून ही गर्दी टाळणे गरजेचे आहे. या आजाराचा मुकाबला करण्यासाठी फक्त आपल्या स्वतःला विलग करून ठेवण्याशिवाय दुसरा उपाय नसल्याचे त्यासाठीच सर्व आस्थापना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा सांगत सर्व नागरीकांनी स्वतःला घरातच ठेवून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
आतापर्यंत राज्यातील रूग्णांची संख्या ५२ वर पोहोचली आहे. त्यातील ५ जण सध्या निगेटीव्ह सिध्द झाले. मात्र तरीही त्यांच्यावर पुढील १५ दिवस त्यांच्यावर पूर्ण लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय मुंबईसह एमएमआर रिजन, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर ही शहरे ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगत या दरम्यानच्या काळात माणूसकी सोडू नका, एकजूटीने या संकटाचा मुकाबला करून त्यावर विजय मिळवू असे आश्वासक उद्गारही त्यांनी यावेळी केले.
