Breaking News

सुभाष साबणे म्हणाले, “भाजपा हा शिवसैनिकांसाठी मावशीसारखा” देगलूर पोटनिवडणुकीतील भाजपाच्या विजयाने राज्यात परिवर्तनाची गती वाढेल-चंद्रकांत पाटील

देगलूर: प्रतिनिधी 

महाविकास आघाडीच्या पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले म्हणून पोलिसांकडून शिवसैनिकांना लाथांनी तुडविण्यात आले. शिवसैनिकांचा अपमान करण्यात आला. हे आपल्याला सहन झाले नाही. त्यामुळे अनेक शिवसैनिकांसह आपण भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा हा पक्ष शिवसैनिकांसाठी मावशीसारखा आहे. राज्यात भाजपा शिवसेना युतीचे सरकार असताना शेतकऱ्यांना वेगवेगळ्या स्वरुपाची मदत मिळाली. मतदारसंघात रस्त्यांची कामे झाली. पण गेल्या दोन वर्षांत शेतकऱ्यांना मदत मिळत नाही आणि विम्याचेही पैसे मिळत नाहीत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठीही पालकमंत्री येत नसल्याची तक्रार देगलूर-बिलोलीचे भाजपा उमेदवार सुभाष साबणे यांनी केली.

यावेळी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर ते आयोजित जाहिर सभेमध्ये बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे ही उपस्थित होते.

देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूक भाजपा जिंकेल आणि विश्वासघाताने सत्तेवर आलेल्या राज्यातील महाविकास आघाडीला दाखवून देईल की, तुम्ही कितीही पक्ष एकत्र आलात तरी भाजपा, रिपब्लिकन पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना आणि जनसुराज्य मिळून आम्ही विजयी होऊ. या मतदारसंघातील भाजपाच्या विजयाने राज्यातील राजकीय परिवर्तनाचा वेग वाढेल, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी देगलूर येथे व्यक्त केला. निवडणूक आचारसंहितेचे कारण न दाखवता मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा, अशी मागणीही त्यांनी राज्य सरकारकडे केली.

भाजपाचे उमेदवार सुभाष साबणे यांच्या औपचारिक स्वागतासाठी आयोजित पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, आ. राम पाटील रातोळीकर, आ. राजेश पवार, आ. तुषार राठोड, नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील गोजेगावकर, नांदेड शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, माजी आ. गंगाराम ठक्करवाड आणि भाजपा वैद्यकीय आघाडी प्रदेश संयोजक डॉ. अजित गोपछेडे उपस्थित होते. मेळाव्याला पक्षाचे बूथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख आणि पन्ना प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टीने देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सर्वप्रथम उमेदवार जाहीर करुन आघाडी घेतली आहे. भाजपाने पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जिंकली. राज्यातील पंधरा हजार ग्रामपंचायतींपैकी साडेसहा हजार ग्रामपंचायती जिंकल्या. देगलूर बिलोलीची जागा जिंकून आपल्याला महाविकास आघाडी सरकारला दाखवून द्यायचे आहे की, तुम्ही तिघे एकत्र आलात तरी तुम्हाला पराभूत करू. या मतदारसंघात सुभाष साबणे यांना विजयी करण्याचा मतदारांचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपाच्या युतीला पूर्ण बहुमताने विजयी केले. पण विश्वासघातामुळे भाजपा सत्तेपासून दूर राहिली. मतदारांचा विश्वासघात करून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले असल्यामुळे ते लोकांची कामे करत नाहीत. मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीनला हेक्टरी साठ हजार रुपये तर ऊसाला हेक्टरी एक लाख रुपये मदत करा, अशी भाजपाची राज्य सरकारकडे मागणी आहे. नैसर्गिक आपत्तीत मदत करण्यात निवडणूक आचारसंहितेचा अडथळा नसतो. त्यामुळे या मदतीचा आदेश ताबडतोब काढला पाहिजे. भाजपाच्या सरकारने २०१९ च्या आदेशानुसार जशी मदत केली होती तशी मदत करा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *