Breaking News

ट्विट करणाऱ्या “त्या” सेलिब्रिटींची आयबी चौकशी करणार काँग्रेसची पक्षाच्या मागणीवर गृहमंत्र्यांचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटला भारतीय सेलिब्रिटींनी दिलेल्या प्रत्युतरामागे भारतीय जनता पक्षाने त्यांना प्रवृत्त केले होते का? व भाजपाचा त्यांच्यावर कोणता दबाव होता का? देशपातळीवरती अनेक संवैधानिक संस्था, विरोधी पक्षांची सरकारे व मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या व्यक्तींवर मोदी सरकारचा प्रचंड मोठा विरोध असताना या राष्ट्रीय हिरोंच्या मागे देखील भाजपाचा दबाव असल्याचे नाकारता येत नाही. त्यामुळे या भाजपा कनेक्शनची चौकशी व्हावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली असून गरज भासल्यास यांना भाजपापासून संरक्षण द्यावे अशी मागणी केली. काँग्रेसने केलेली मागणी गंभीर असून यासंदर्भात गुप्तवार्ता विभागाला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती यांनी दिली.
देशभरामध्ये विषेशतः पंजाब, हरियाणा, राजस्थान व पश्चिम उत्तर प्रदेशमधील शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत असताना मोदी सरकार या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी शेतकऱ्यांचे दमन करत आहे. भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही व गांधींचा देश असल्याने भारतामधील लोकशाही परंपरांचा आदर्श जगात घेतला जातो. त्यामुळे मोदी सरकारने अवलंबलेल्या अलोकतांत्रिक पद्धतीचा व शेतकऱ्यांवर होत असलेल्या अत्याचाराबद्दल जगामधून चिंता व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही व्यक्तीगत मतावरती केंद्र सरकार प्रत्युत्तर देत नसताना रिहाना या अमेरिकन पॉपस्टारने केलेल्या ट्विट विरोधात केंद्र सरकारने उत्तर दिले व त्यानंतर त्याच तऱ्हेचे अनेक ट्विट हे बॉलिवूड व क्रीडा क्षेत्रातल्या सेलिब्रिटींनी केल्याचे ते म्हणाले.
कोणी व्यक्तीगत पातळीवरती आपले मत व्यक्त करत असेल तर त्या व्यक्तीचा तो संवैधानिक अधिकार आहे, त्यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही. परंतु जर दबावाखाली त्यांच्याकडून हे करवून घेतले गेले असेल तर त्याचा निश्चितपणे विरोध होणे गरजेचे आहे. या दबावाच्या शंकेबद्दल पुष्टी करणारी माहिती या ट्विटचे विश्लेषण केल्यानंतर समोर येते. बहुतांश ट्विटमध्ये amicable हा शब्द सारखा येतो. त्यातही अक्षयकुमार आणि सायना नेहवाल यांचे ट्विट सयामी जुळ्या व्यक्तीने केल्याप्रमाणे शब्द न शब्द समान आहेत. यातूनच भाजपाने त्यांच्याकडून स्क्रिप्ट देऊन हे ट्विट करवून घेतले या शंकेला बळ मिळते. दुसरीकडे अभिनेता सुनिल शेट्टी यांनी केलेल्या ट्विटमध्ये मुंबई भाजपाचा उपाध्यक्ष हितेश जैन या व्यक्तीला उल्लेखीत करण्यात आलेले आहे. यातून भाजपाचे कनेक्शन होते का याची चौकशी करण्याची गरज निर्माण होते. कृत्रिमरित्या जनमत तयार करण्यासाठी भाजपा असा दबाव आणते का, याची चौकशी होण्याची गरज आहे आणि कनपट्टीवर शस्त्र ठेवण्याची मानसिकता असणारे मोदी सरकार आहे याची जाणीव देशातील प्रत्येक नागरिकाला आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये मत व्यक्त करण्याच्या अधिकाराचे निर्वहन कोणत्याही दबावाशिवाय करता यावे असे वातावरण निर्माण करणे हे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे कर्तव्य आहे आणि त्याचकरिता हे सरकार स्थापन झाले आहे म्हणूनच भाजपाच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली. तसेच गरज भासल्यास या सेलिब्रिटींना मोदी सरकारपासून संरक्षण व मानसिक आधार द्यावा अशी मागणी केली. कोरोनाबाधित असतानाही गृहमंत्र्यांनी या विषयाचे गांभिर्य ओळखून वेळ दिला.
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी आज ऑनलाईन चर्चा केली. या शिष्टमंडळात सचिन सावंत यांच्याबरोबर प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, सरचिटणीस डॉ. गजानन देसाई व विनय खामकर हे उपस्थित होते.

 

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *