Breaking News

राज्य नाट्य स्पर्धेत ‘शीमा’ नाटकाने मारली बाजी ठाणे विभागात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

मुंबई: प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या ५९ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानव विकास संस्था, वाशी निर्मित आणि पारमिता फाउंडेशन संस्था सादर ‘शीमा’ या नाटकाने प्रथम क्रमांक मिळवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. या नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटकासह चार पारितोषिके मिळाली.
१५ नोव्हेंबर २०१९ ते ११ डिसेंबर २०१९ या स्पर्धेच्या कालावधीत ठाणे केंद्रातून एकूण २८ हून अधिक नाटकांचे सादरीकरण झाले. शीमा या नाटकाचे लेखन राहुल साळवे व वैभव सातपुते यांनी लिहिले आहे.
“हे नाटक प्रेक्षकांना इतकं आवडलं की त्यांनी कलाकारांना नाटक झाल्यावर पुन्हा रंगमंचावर बोलावले. प्रेक्षकांनी तुडुंब भरलेल्या प्रेक्षागृहात सगळ्या प्रेक्षकांनी या कलाकारांना दाद म्हणून उभे राहून टाळ्या वाजवित गौरव केला “. हाच या कलाकृतीचा मोठा सन्मान होय अशा भावना प्रेक्षकांनी व्यक्त केल्या.
शीमा हे नाटक आजच्या समस्त स्त्री वर्गाच प्रतिनिधित्व करणाऱ नाटक आहे. आजच्या एकविसाव्या शतकातल्या भारतातल्या पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रियांबद्दलची होणारी अवहेलना त्यांच्या बद्दलची मानसिकता, त्यांना अजूनही दिलेलं दुय्यम स्थान, चालीरीती-रितीभातीच्या नावाखाली स्त्रियांचे होणारे शोषण या समस्यांवर आधारीत शीमा हे नाटक भाष्य करतं. एकंदरीत इथल्या व्यवस्थेने स्त्रियांच्या पायात टाकलेल्या बेड्या याची जाणीव शीमा हे नाटक समस्त स्त्री वर्गाला व पुरुष प्रधान संस्कृतीस करून देतं. स्त्री वर हक्क गाजवायचा अधिकार पुरुषाला कोणी दिला हा प्रश्न या नाटकातुन उपस्थित केला आहे. एखाद्या मुलीला येणारी ” मासिक पाळी ” ही तिच्या आयुष्यात नकळत किती बदल घडवून जाते . तीचा बालपणाचा प्रवास संपवून स्त्रित्वाकडे जाण्याचा प्रवास जो शिमातून मांडण्यात आला असून हा प्रवास अतिशय भयाण वास्तविकतेची आठवण करून देतो.
या नाटकाचे लेखन- राहुल साळवे ,वैभव सातपुते यांनी केले होते.दिग्दर्शन आणि नेपथ्य – वैभव पांडुरंग सातपुते यांनी केले होते.सुशील कांबळे यांनी संगीत, निलेश प्रभाकर यांनी प्रकाशयोजना, नितीन मोकल यांनी गीते व प्रविण डोणे ,कविता राम, लतेष पुजारी यांनी गायन केले. तसेच जगदीश शेळके यांनी रंगभूषा केली. तर रंजना म्हाब्दी,मयूर साळवी,नितीन जाधव ,प्रमोद पगारे,सुशील शिर्के,शीतल जाधव, सुकेशनी कांबळे,अनिष बाबर व विजय इंगळे या कलाकारांनी यात काम केले.
एखाद्या समाजाची प्रगती मी त्या समाजातील महिला किती प्रगत आहेत ह्यानुसार ठरवतो ” हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेला विचार मला प्रेरणादायी वाटतो आणि हा विचारच ” शीमा ” नाटक करण्यास मला प्रवृत्त करतो. राहुल साळवे आणि मी आमच्यात ह्यावर चर्चा होऊन हे नाटक संहितेत उतरलं. आमचा हेतू कोणत्याही समाजाला दुखावण्याचा नाही. हा विषय प्रत्येकाच्या घरातला आणि प्रत्येकाला तो आपलासा वाटावा ह्याची काळजी आम्ही घेतली आहे. दिग्दर्शक म्हणून संहीतेला न्याय देण्याच काम मी प्रामाणिक पणे केलं आहे. लोकांचा पहिल्याच प्रयोगाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्यासाठी प्रेरणादायी असल्याचे मत नाटकाचे दिग्दर्शक वैभव पांडुरंग सातपुते यांनी व्यक्त केले.

सर्वोत्कृष्ट नाटक प्रथम – शीमा
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक प्रथम – वैभव पांडुरंग सातपुते
सर्वोत्कृष्ट अभिनेता रौप्य पदक – मयूर साळवी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री रौप्य पदक – रंजना म्हाब्दी

Check Also

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी या तीन मराठी चित्रपटांची निवड मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाकडून ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय या तीन मराठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *