Breaking News

अनिल परब यांच्या घरासमोर उद्या आंदोलन: मात्र महामंडळाने १७ डेपोतून गाड्या सोडल्या आझाद मैदानावरचे ठिय्या आंदोलन सुरू

मुंबई: प्रतिनिधी

मागील १५ दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आजही सुरुच असून उद्या परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरासमोर आणि आणि राज्यात एसटी डेपो समोर आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदानावर केली. तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी भाजपा नेत्यांच्या नादी लागून स्वत:चे नुकसान करून घेवू नये संप मागे घ्यावा असे आवाहन करत त्यांच्या मागण्यांच्या प्रश्नी उच्च न्यायालयातूनच मार्ग काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी एसटी प्रशासनाने आज काही खाजगी कर्मचाऱ्यांच्या मदतीने १७ डेपोतून एसटी गाड्या बाहेर काढल्याचे सांगितले.

आधाद मैदानावरील चार दिवसाच्या संपानंतर पहिली एसटी बस धावली आज धावली असून मुंबई सेंट्रलमधून पहिली एसटी साताऱ्याच्या दिशेने रवाना झाली. तर ८२६ एसटी रस्त्यावर धावत असल्याचं एसटी प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे एसटी कामगारांच्या संपात फूट पडल्याचं चित्रं निर्माण झालं आहे.

मुंबई आगारातून आज दुपारी २ वाजून ३० मिनिटाने एमएच २० बीएल ३९५४ क्रमांकाची एसटी धावली. चालक आर. आर. देवरे आणि वाहक एस. एस. माने यांनी डेपोतून ही एसटी काढली. ही एसटी साताऱ्याच्या दिशेने निघाली होती. तर अक्कलकोट आगारातूनही काही बसेस सुटल्या. इस्लामपूर-वाटेगाव ही पहिली बस मार्गस्थ झाली. अक्कलकोट ते सोलापूर, सोलापूर ते अक्कलकोट अशा दोन ट्रीपही या बसच्या झाल्या. या एसटीतून ७५ प्रवाशांनी प्रवास केला. तसेच रत्नागिरी विभागातील राजापूर आगारातून बुरुंबेवडी वस्ती हातदे ही एसटी रवाना झाली.

२७ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. उच्च न्यायालय, औद्योगिक न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने नकार देऊनही संप सुरू आहे. खासगी वाहने आम्ही सुरू केली आहेत. कर्मचाऱ्यांनी कामावर यावं कोणी अडवणूक करू नये, असं आवाहन चन्ने यांनी केले. आज ३६ बसेस आम्ही विविध डेपोतून सोडल्या. १७ डेपोतून या बसेस सोडण्यात आल्या असून एकूण ९०० लोकांनी एसटीतून प्रवास केला. खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट होऊ नये यासाठी आम्ही एसटी सुरू करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.

एसटीच्या वर्कशॉपमध्ये काम करणारा मेकॅनिकल स्टाफ असलेला जवळपास २ हजारपेक्षा  जास्त कर्मचारी कामावर हजर झाला आहे. महामंडळाला भरतीची गरज असेल तर ज्यांचे ट्रेनिंग पूर्ण झालं आहे त्यांना घेण्याचा विचार करू. पण अजून पर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही. कर्मचाऱ्यांची मागणी उच्च न्यायालयासमोर विचाराधीन आहे. त्यावर समिती नेमली आहे. त्या वेळेनुसार ते ठरेल. डेपो सुरू करा असं आम्हाला कर्मचारीच सांगत आहेत. त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आम्ही डेपो सुरू करतोय पण कर्मचाऱ्यांनी कामावर यावं अशी आमची विनंती असल्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांशी आपण चर्चेसाठी कधीही तयार आहे. मात्र त्यांनी संप मागे घ्यावा, चर्चेतूनच त्यांच्या मागण्यावर मार्ग निघु शकणार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.

Check Also

शाहु महाराजांची उमेदवारी जाहिर केल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, आमचं…

आज सकाळपासून लोकसभा मतदारसंघांच्या वाटपावरून महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील जागांचा तिढा सोडविण्यावरून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *