Breaking News

फडणवीस म्हणाले मुख्यमंत्र्यांना, आर्थिक संकटातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्येकडे लक्ष द्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले पत्र

मुंबई: प्रतिनिधी

राज्य महामार्ग परिवहन सेवेतील (एसटी) कर्मचार्‍यांची सध्या परवड सुरू आहे. हे सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना अनेक आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांना मार्च महिन्याचे २५ टक्के वेतन अजून मिळालेले नाही, मे महिन्याचे ५० टक्के वेतन अजून मिळालेले नाही, तर जून महिन्याचे १०० टक्के वेतन अजून मिळालेले नाही. त्यामुळे एसटीच्या अनेक कर्मचार्‍यांवर आपल्या अर्थार्जनासाठी भाजीपाला विकणे, गवंडी काम करण्याची पाळी आली आहे. एसटीच्या लाखावर कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय सध्या अतिशय अस्थिर मानसिकतेत जीवन जगत आहेत. एकिकडे वेतन नाही आणि दुसरीकडे भविष्यात आपल्या नोकऱ्या तरी टिकणार का, ही चिंता त्यांना सतावत असल्याने त्यांच्या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एका पत्राद्ववारे आज केली.

दुष्काळी भागातील ज्या शेतकरी कुटुंबातील सदस्यांना आपण २०१९ मध्ये एसटीच्या सेवेत सामावून घेतले, त्यातील ४५०० जणांना घरी बसविण्यात आले. पुढील आदेशापर्यंत त्यांना सेवेवर येऊ नये, असे सांगण्यात आले आहे. याशिवाय, ५० वर्षांवरील कर्मचाऱ्यांना सक्तीने सेवानिवृत्ती देण्याचाही घाट घातला जात आहे. असे करताना कुठल्याही संघटनांना विश्वासात घेतले गेले नसल्याचा आरोप करत हे तर आणखी दुर्दैवी असल्याची टीकाही त्यांनी केली.

एसटी कर्मचाऱ्यांपैकी ३२८ कर्मचारी कोरोनाबाधित झाले. त्यापैकी ८ जणांचा मृत्यू झाला. ते सुद्धा या काळात कोरोना वॉरिअर्सप्रमाणे सेवा देत असल्याने त्यांच्याही समस्यांकडे प्रकर्षाने लक्ष देण्याची गरज आहे. राज्य सरकारने कोरोना बळींना ५० लाख रूपये देण्याची घोषणा केली. तथापि मृत्यू झालेल्या ८ जणांच्या कुटुंबीयांना अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. या समस्यांकडे आपण तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांना केली.

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *