Breaking News

एसटी बस होणार आता प्रदुषण मुक्त : या इंधनावर धावणार डिझेलवर धावणाऱ्या १ हजार गाड्यांचे सीएनजीमध्ये करणार रुपांतर- परिवहन मंत्री अनिल परब

मुंबई : प्रतिनिधी

कोरोना संकटामुळे घटलेली प्रवासी संख्या आणि इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर आर्थिक बोजा पडत आहे. महामंडळावरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने आपल्या ताफ्यातील १ हजार गाड्या सीएनजीमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली.

कोरोना संकटामुळे एसटीची प्रवासी संख्या कमी झाल्याने त्याचा उत्पन्नाला फटका बसला आहे. त्यातच डिझेलच्या दरातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात डिझेलवर धावणाऱ्या १७ हजार बसेस असून डिझेलवर होणारा खर्च हा एकूण खर्चाच्या ३४ टक्के इतका होता. वाढत्या डिझेल किंमतीमुळे तो आता ३८ ते ४० टक्क्यांवर पोहोचला आहे. डिझेलवर होणाऱ्या कोट्यावधी रूपयांच्या खर्चाचा गांभीर्याने विचार करत डिझेलला पर्यायी इंधनाचा वापर करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

एसटीच्या ताफ्यात लवकरच सीएनजी बरोबरच इलेक्ट्रीक, एलएनजी अशा पर्यावरणपूरक इंधनावर धावणाऱ्या बसेस दाखल होणार आहेत. त्यामुळे भविष्यात इंधनावरील खर्चाच्या बचतीबरोबरच पर्यावरणपूरक प्रवासाला एसटी प्राधान्य देणार आहे.  इंधनाचा खर्च कमी करण्यासाठी सीएनजीबरोबरच इतर पर्यायांचाही वापर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

वातावरणीय बदलामुळे बिघडलेले निसर्गचक्र अबाधित ठेवण्यासाठी तसेच डिझेलच्या वाढत्या किमती पाहता प्रवाशांना प्रदुषणमुक्त प्रवास घडविण्यासाठी एसटी महामंडळाने पर्यावरणपूरक इंधनाचा पर्याय निवडला आहे. त्यासाठी सध्या डिझेलवर धावणाऱ्या १ हजार गाड्यांचे सीएनजी या पर्यायी इंधनामध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. या रिट्रोफिटमेंटसाठी राज्य सरकार एसटी महामंडळाला निधी देणार आहे. सीएनजीमुळे इंधनाचा खर्च कमी होऊन प्रदुषणामुळे पर्यावरणाची होणारी हानी रोखण्यास एसटी महामंडळाचा नक्कीच हातभार लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Check Also

अखेर मान्सून राज्यात धडकलाः वातावरणातल्या गारव्याने नागरिकांना दिलासा कोकणात बरसल्या मान्सूनच्या सरी

महाराष्ट्रातील प्रत्येक जण ज्या गोष्टीची गेल्या काही दिवसांपासून आतुरतेनं वाट पाहत होता. तो दिवस आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *