Breaking News

आता एसटीचा प्रवास दिवसा महागः तर रात्री स्वस्त मध्यरात्रीपासून १७.१७ टक्के भाडेवाढ लागू

मुंबई : प्रतिनिधी
इंधनाच्या दरात झालेली भरमसाठ दरवाढ, टायरच्या तसेच गाड्यांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतींमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर पडलेला भार कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने अखेर भाडेवाढ लागू केली. एसटी महामंडळाने गेल्या तीन वर्षांनंतर प्रथमच १७.१७ टक्के भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला असून ही भाडेवाढ महामंडळाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवांना लागू होणार आहे. २५ ऑक्टोबर २०२१ च्या मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ होणार असून ती किमान ५ रूपयाने वाढणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. महामंडळाने भाडेवाढ केली असली तरी रातराणी गाड्यांच्या तिकिटांचे दर ५ ते १० रूपयांनी कमी करत रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा दिला आहे.
गेल्या ३ वर्षात इंधनाच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. दिवसेंदिवस हे दर वाढत असले तरी एसटी महामंडळाने प्रवासी दर मात्र स्थिर ठेवले होते. अशा परिस्थितीतही एसटी महामंडळाने कुठल्याच प्रवासी वाहतुकीच्या दरात वाढ केलेली नव्हती. इंधनाच्या वाढत्या दराचा बोझा झेलत एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी धावत आहे. वाढत्या इंधनाचा भार पेलत असताना दुसरीकडे महामंडळाच्या तिजोरीवरही त्याचा परिणाम जाणवू लागला असल्याने नाइलाजास्तव ही तिकिट दरवाढ करण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाने म्हटले आहे. नव्या तिकिट दरवाढीनुसार साधी गाडी, शयन-आसनी, शिवशाही तसेच शिवनेरी व अश्वमेधच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ होणार नसून दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजेच ६ किमी नंतर तिकिटाच्या दरात वाढ होणार आहे. ही दरवाढ ५ रुपयाच्या पटीत असून २५ ऑक्टोबर २०२१ च्या मध्यरात्रीपासून (२५ व २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री) लागू होणार आहे.
२५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून वा तद्नंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुधारीत दराने तिकिट आकारणी केली जाणार आहे. तसेच ज्या प्रवाशाने आगाऊ आरक्षण केले आहे अशा प्रवाशांकडून वाहक सुधारीत तिकिटाच्या रक्कमेची आकारणी करतील, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे. तथापि, रातराणी सेवा प्रकारांतर्गत रात्री धावणाऱ्या (जी सेवा सायंकाळी ७ वा. ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वा.पर्यंतच्या कालावधीमध्ये कमीत कमी ६ तास धावते) साध्या बसेसचे तिकिट दर हे दिवसा धावणाऱ्या साध्या बसेसच्या तिकिट दराच्या तुलनेत १८ टक्के जास्त होते. उदयापासून सदर अतिरिक्त दर रद्द करण्यात आले असून दिवसा व रात्री धावणाऱ्या बसेसचा तिकिट दर सारखाच असणार आहे. त्यामुळे साध्या बसचा रातराणीचा प्रवास तुलनेने स्वस्त झाला आहे.

Check Also

काँग्रेसची दुसरी ४३ जणांची लोकसभा उमेदवारांची यादी जाहिर

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मंगळवारी ४३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत कमलनाथ आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *