Breaking News

अंधेरीत एसआरए प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांच्या नावाचा गैरवापर एल अँड टी कंपनीवर प्रकल्पग्रस्तांचा आरोप

मुंबई : जयंत कारंजकर

अंधेरी आरटीओ परिसरातील अण्णानगर शिवशक्ती, अंधेरी कासमनगर आणि विठ्ठल-रुक्मिणी या पुनर्वसन योजनेसाठी एल अँड. टी या कंपनीकडून चक्क पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाचा गैरवापर येत असल्याची माहिती पुढे आली आहे. विकासक निवडीसाठी होत असलेल्या निवडणूकीत याबाबत एल अँड टी या नामांकित कंपनीसह वादग्रस्त चमणकर यांच्या विरोधात प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आरटीओ परिसरातील अण्णानगर शिवशक्ती, अंधेरी कासमनगर आणि विठ्ठल-रुक्मिणी अंधेरी या तीनही झोपडपट्टयांचा पुर्नविकास करण्यासाठी मे. के.एस. चमणकर या कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. मात्र, निर्धारित कालावधीत या कंपनीला हा प्रकल्प पूर्ण केला नाही. त्यामुळे एसआरएने १९ जून २०१७ रोजी मे. चमणकर यांना या प्रकल्पातून बाहेर काढले. शिवाय या प्रकल्पासाठी नवीन विकासक नेमण्यासंदर्भात तीनही सोसायटीच्या सदस्यांनी सहाय्यक निबंधकांच्या समक्ष बैठक घेऊन तसा ठराव मंजूर करण्याचे आदेश दिले.

एजीआरसीच्या आदेशानंतर एल अँड टी कंपनीचे श्रीकांत जोशी आणि सुधीर कुलकर्णी यांनी तीनही सोसायटीच्या सदस्यांची ३ डिसेंबर २०१७ रोजी बैठक घेतली. विशेष म्हणजे एसआरए ने काळ्या यादीत टाकलेल्या मे. चमणकर या कंपनीचे मालकही याबैठकीत उपस्थित असल्याचे प्रशासनाला केलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले.

अण्णानगर शिवशक्ती सोसायटीच्या व्यवस्थापकीय कमिटीसाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेला राजू पुन्नामडी हा एल अँड टी कंपनीचा प्रतिनिधी म्हणून या बैठकीत वावरत होता. यावेळी एल.अँड टी कंपनीच्या अधिका-यांनी पुन्नामडीचा व्यासपीठावर सत्कारही केला. पुन्नामडीवर याच परिसरातील ५० हून अधिक गरिबांची घरे आणि दुकाने संगनमत करून बेकायदेशीर रित्या बाहेरील लोकांना विकल्याप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल आहेत. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा गैरवापर करून प्रकल्पग्रस्तांवर दबाव टाकण्यात येत आहे.  त्यासाठी प्रकल्पग्रस्तांना एल अँड टीचे अध्यक्ष अनिल नाईक यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाची व्हिडिओ क्लिप दाखवित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांच्या सोबत कंपनीचे संबंध असल्याचा प्रयत्न कंपनीकडून करण्यात येत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी लेखी तक्रार अर्जाद्वारे केला आहे.

एल अँड टी सारख्या नामांकित कंपनीचे प्रतिनिधी जर भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या मे. चमणकर आणि गुंड प्रवृत्तीचा राजू पुन्नामडी यांच्या सारख्या लोकांसोबत व्यासपीठावर वावरत असल्याबद्दल तक्रारीत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी असलेल्या सुनील दोंडगे यांनी एल अँड टी कंपनी आणि राजू पुन्नामडी यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांच्या नावाचा गैरवापर केल्या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Check Also

“बुरा ना मानो होली है”, श्रीरामांनी वस्ताला केला प्रश्न, माझ्यामुळे तु की तुझ्यामुळे मी

एक आटपाट नगरी होती. सुदैवाने म्हणा किंवा योगायोग म्हणा श्रीरामाचा धाकटा भाऊ भरत यांच्या नावासारखे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *