Breaking News

जयंत पाटील यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे? राष्ट्रवादी काँग्रेसला दुखावणे महागात पडण्याची शक्यता

काल बुधवारी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांना बोलण्याची संधी नाकारल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तुम्ही तरी निर्लज्जपणा करू नका अशी नार्वेकरांना उद्देशून शेरेबाजी केली. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारकडून जयंत पाटील यांच्यावर हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाची कारवाई शिंदे-फडणवीस सरकारने केली. मात्र आता या घटनेचे भलतेच पडसाद उमटू लागल्याने जयंत पाटील यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईबाबत फेरविचार करण्यात येत असल्याची माहिती शिंदे-फडणवीस सरकारमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

विधानसभेत निलंबनाची कारवाई केली तरी जयंत पाटील यांनी आपल्या वक्तव्याबद्दल सभागृहात दिलगिरी किंवा माफी मागितली नाही. त्यामुळे शिंदे-फ़डणवीस सरकारच्या अतितायी राजकारणाला बळी न पडता त्याचा सामना यशस्वीतेने करणारे जयंत पाटील अशी त्यांची प्रतिमा बनली आहे. तसेच काल रात्रीपासून जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसह, काँग्रेस आणि शिवसेनेतील आमदारांकडून मोठ्या प्रमाणावर फोनद्वारे, प्रत्यक्ष भेटीद्वारे पाठिंबा दर्शविण्यात येत आहे.

त्याशिवाय जयंत पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या सांगली जिल्ह्यात जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढत शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. एकाबाजूला शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधातील वातावरण अद्यापही शांत व्हायला तयार नाही. राज्याच्या अनेक भागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होत असल्या तरी निवडूण आलेले प्रतिनिधी हे शिंदे गट आणि भाजपाचे असल्याचे अद्याप तरी जाहीररित्या कोणी कबूल करत नाही. मात्र निवडूण आलेले उमेदवार हे शिंदे गटाचे आणि भाजपाचे असल्याचा दावा दोन्ही पक्षांकडून करण्यात येत आहे.

त्याचबरोबर शिंदे-फडणवीस सत्तेवर आल्यापासून राज्यघटनेतील तरतूदींना आव्हान देत बेकायदेशीर पध्दतीने कामकाज चालवित असल्याची भावना सध्या राज्यातील जनतेमध्ये निर्माण झाली आहे. राज्य सरकारने जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली खरी पण या मुद्यावरून जयंत पाटील यांनी अद्याप सभागृहात दिलगिरी आणि माफी मागितली नाही. त्यामुळे या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिंदे-फडणवीस सरकार विरोधात चांगलेच रान उठविण्याचे संकेत मिळत आहेत.

त्यामुळे आताच्या असलेल्या परिस्थितीत जे काही राजकिय नुकसान होईल त्यावर तोडगा शोधण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीसांकडून शोधला जात असला तरी आता सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी कडून जे रान पेटविले जाणार आहे. त्याचा फटका भाजपा आणि शिंदे गटाला बसल्याशिवाय राहणार नाही असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर आगामी निवडणूकीत शिंदे गटाचा पराभव झाल्यास भविष्यात जयंत पाटील यांना चुचकारण्याच्या उद्देशाने आणि नवी संभावित राजकिय गणिते नजरेसमोर ठेवत जयंत पाटील यांच्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई मागे घेण्याचा विचार भाजपाकडून करण्यात येत असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.

Check Also

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी तृतीयपंथी उमेदवारांकरिता नियम निश्चित

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणा-या पोलीस उपनिरीक्षक मुख्य स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीकरिता तृतीयपंथी उमेदवारांसाठी शारीरिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *