Breaking News

आता आशिष शेलारांच्या आरोपांना शिंदे-फडणवीस सरकारकडून केराची टोपली

राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कार्यरत असताना भाजपाचे नेत्या चित्रा वाघ यांनी मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात मुलीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा मुद्दा चांगलाच लावून धरला होता. त्यानंतर भाजपाचे नेते तथा विद्यमान प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीतील पाच मंत्र्यांकडील कथित स्पेशल व्यक्तींची नावे घेत आरोप ऐन पावसाळी अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला केला. मात्र आता त्यावेळी घेतलेल्या नावाच्या व्यक्तीलाच मित्रा या संस्थेच्या अध्यक्ष पदी विद्यमान मुख्यमंत्र्यांनी नियुक्त केल्याने चित्रा वाघ यांच्यानंतर आता आशिष शेलार यांच्या आरोपांना शिंदे-फडणवीस सरकारने केराची टोपली दाखविल्याचे दिसून येत आहे.

उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीतील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि अन्य एका मंत्र्यांकडे काही विशिष्ट व्यक्ती कार्यरत होत्या. तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील अजय आशर आणि तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडील गिरीष पवार यांची उद्योग विभाग आणि नगरविकास विभागात होत असलेल्या हस्तक्षेपाची आणि त्यांना असलेल्या अधिकाराची त्यावेळी मंत्रालयात चांगलीच चर्चा रंगली होती. त्यावेळी पावसाळी अधिवेशनात भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी या पाच मंत्री आणि त्यांच्याकडील पाचही व्यक्तींची त्यात अजय आशर यांच्याही नावाचा उल्लेख करत विधानसभेत विभागाचे कामकाज मंत्री चालवितात की हे लोक चालवितात का? असा सवाल केला.

मात्र त्यावेळी महाविकास आघाडीतील या पाचही मंत्र्यांनी आणि राज्य सरकारकडून कोणतेही उत्तर दिले नाही. परंतु आता राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकत भाजपाच्या मदतीने राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केंद्राच्या धर्तीवर स्थापन केलेल्या मित्रा या संस्थेच्या उपाध्यक्ष पदी अजय आशर यांची नियुक्ती केली आहे.

त्यामुळे यापूर्वी ठाकरे सरकारच्या काळात ज्या संजय राठोड यांच्या विरोधात भाजपाने रान उठविले. त्याच संजय राठोड यांना या शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा एकदा सन्मानाने मंत्री पदी विराजमान केले. त्यामुळे भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या आरोपांना भाजपानेच केराची टोपली दाखविल्याचे दिसून आले. त्या पाठोपाठ आता आशिष शेलार यांनीही अजय आशर यांच्यावर केलेल्या आरोपांना आता शिंदे-फडणवीस सरकारने केराची टोपली दाखविल्याने भाजपासाठी पूर्वी असलेले कलंकित आता स्वच्छ सुंदर ठरत असल्याची चर्चा राजकिय आणि मंत्रालयातील अधिकारी वर्गात सुरु झालेली आहे.

Check Also

देशातील तरूणाईच्या रोजगाराबाबत चिंताजनक स्थिती

भारतातील तरुणांच्या रोजगाराची सद्यस्थिती आणि दृष्टीकोन यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या अलीकडील अहवालात देशाच्या व्यापकपणे बोलल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *