Breaking News

ममता बॅनर्जींच्या गाठी-भेटी आणि युपीएच्या नेतृत्वावरून वादंग राज्यात काँग्रेसला भीती वाटतेय का?

मराठी ई-बातम्या टीम

नुकत्याच पश्चिम बंगालच्या तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख तथा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. या दौऱ्या दरम्यान त्यांनी शिवसेनेचे युवराज तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे आणि प्रवक्ते संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि संयुक्त पुरोगामी आघाडीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीमध्ये एकप्रकारे वादंग निर्माण झाले.

देशात भाजपा अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आघाडी निर्माण करण्यासाठी सध्या अनेकांकडून नवनव्या मित्र पक्षांची आणि पर्यायांचा विचार पुरोगामी राजकिय पक्षांकडून केला जात आहे. शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीमागे फक्त भाजपा विरोध हा एकमेव अजेंडा नाही तर त्या पाठीमागील राजकिय गणितं ही वेगळी आहेत. वास्तविक पाहता शरद पवार आणि तृणमुल नेत्या ममता बॅनर्जी हे दोघेही जण मुळचे काँग्रेसवाले. या दोघांनी फक्त चार ते पाच वर्षाच्या पुढे मागे काँग्रेसपासून फारकत घेतली. परंतु या दोघांच्याही राजकिय जीवनात सध्या काँग्रेसचीच अडचण होत असल्याने या दोघांनीही काँग्रेसला नामोहरण करण्याची एकही संधी आता पर्यत त्यांनी सोडली नाही.

काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या परदेशी जन्माच्या मुद्यावरून पक्षातून बाहेर पडल्यानंतर शरद पवार, तारीख अन्वर आणि पी.ए.संगमा या तिघांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. कालांतराने पी.ए.संगमा हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले. तर तारीक अन्वर हे बिहार विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर पुन्हा स्वगृही काँग्रेसमध्ये गेले.

तर ममता बँनर्जी यांनी त्यावेळी स्थानिक काँग्रेसच्या कारभाराविरोधात आणि सिंगूर येथील टाटाला जमिन देण्याच्या विरोधात आवाज उठविला. त्यांची मनधरणी करण्यासाठी चक्क सोनिया गांधी यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या माघारी फिरल्या नाहीत. उलट त्यांनी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची स्थापना करत स्वतंत्र निवडणूका लढविण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीत डावे पक्षही सहभागी असल्याने आणि पश्चिम बंगालमध्ये डावे सत्तेवर असल्याने काँग्रेसलाही डाव्यांच्या विरोधात भूमिका घेता आली नाही. त्याचा नेमका फायदा ममता बॅनर्जी यांनी उचलित तृणनूलची बांधणीही केली आणि एकहाती सत्ता मिळवली. त्यानंतर बॅनर्जी यांनी कधीच काँग्रेसला विचारले नाही. पहिल्या पाच वर्षात सत्तास्थानी बसल्यानंतर आणि केंद्रात मोदी-शाह यांचा भाजपामध्ये उदय झाल्यानंतर भाजपाच्या नव्या नीतीनुसार काँग्रेसमुक्त भारताच्या रणनीतीचा भाग म्हणून काँग्रेसच्या विरोधात प्रादेशिक पक्षांना मोठे करणे आणि नंतर त्यांनाच संपविणे या धोरणाची अंमलबजावणी सुरु झाली.

त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला आधीच घरघर लागलेली असताना त्यांनी डाव्यांनाही लावून टाकली. तर तृणमूलच्या विरोधात चांगलीच रणनीती आखत ममता बॅनर्जी यांना चांगलेच घेरण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी बॅनर्जी यांच्या जवळचे आणि त्यांच्या विश्वासू असलेल्या नेत्यांनाच चक्क भाजपात आणले. तसेच पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूकीत भाजपाने ज्या पातळीवर जावून प्रचार केला ते तर साऱ्या देशांनी पाहिले. तरीही ममता बॅनर्जी यांनी एकहाती विजय मिळवित प.बंगालमधील सत्ता कायम राखली.

इकडे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना १५ वर्षाहून अधिक काळ लोटला तरी त्यांना स्वबळावर राष्ट्रवादीची सत्ता स्थापन करता आली नाही. मात्र देशाचा  पंतप्रधान होण्याची मनिषाही त्यांची कधी लपून राहीली नाही.

त्यातच भाजपाच्या आक्रमक राजकीय धोरणामुळे मधल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच राहते की नाही असा प्रश्न निर्माण झाला. परंतु प्रादेशिक पक्षांच्या राजकिय अस्तित्वाचे गणित मांडत राज्यातील शिवसेनेला सोबत घेत काँग्रेसच्या मदतीने महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग केला. त्यात त्यांना यशही आले. परंतु पूर्वीच्या काँग्रेसच्या राजकिय ताकदीत आता मोठ्या प्रमाणावर घट झाल्याने आता काँग्रेस नावापूरतीच शिल्लक असा एक समज राजकिय आणि सामाजिकस्तरावर झालेला आहे. तो समज खोडून काढण्याचा प्रयत्न ना काँग्रेस नेत्यांकडून होतोय ना पक्षाकडून होतोय. त्यातच काँग्रेस पक्षाची संघटना वाढताना दिसत नाही ना ती कमीही झाल्याचे दिसत नाही. राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसमधील अंतर्गत दुफळी काही केल्या अद्याप मिटायला तयार नाही. त्यामुळे रोज नवनवी माहिती काँग्रेसमधील दुफळींबाबत पुढे येते. त्यामुळे त्यांच्या मतदारांमध्ये आणि राजकिय क्षेत्रात भाजपाला काँग्रेसचा पर्याय या शक्यतेवर आजही विश्वास बसताना दिसत नाही.

त्यातच काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बरी नसल्याने आणि त्यांचे वयोमानही झालेले असल्याने त्या पूर्वी इतक्या सक्रिय नसल्याची बाब आता लपून राहीलेली नाही. त्यामुळे युपीए अर्थात संयुक्त पुरोगामी आघाडीचे नेतृत्व करण्याची पर्यायाने देशाचे पंतप्रधान होण्याची इच्छा शरद पवार, ममता बॅनर्जी यांच्यापासून आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचीही लपून राहिलेली नाही. मात्र हा संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेतृत्वाचा लंबक जर आता सोनिया गांधी अर्थात काँग्रेसकडून तो शरद पवार अथवा ममता बॅनर्जी किंवा उध्दव ठाकरे यांच्याकडे जर सरकला तर काय? या एकाच भीतीने काँग्रेसमधील नेते गर्भगळीत झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते ममता बॅनर्जी यांच्या त्या प्रश्नावर आपली भूमिका हिरीरीने मांडण्याचा प्रयत्न करत असून पुन्हा एकदा भाजपाच्या आक्रमक भूताकडेही अंगुलीनिर्देश करत आहेत.

राष्ट्रीय राजकारणात जरी ममता बॅनर्जी आणि काँग्रेसमध्ये राजकिय वाद असले तरी राज्यात काँग्रेस महाविकास आघाडीत सहभागी असल्याने काँग्रेसचे मन दुखावले जावू नये यादृष्टीकोनातून शरद पवार आणि शिवसेनेने ममता बॅनर्जी यांनी मांडलेली भूमिका योग्य असल्याचे सांगत दुसऱ्याबाजूला काँग्रेसशिवाय आघाडीचा पर्याय शक्य नसल्याचे स्पष्ट करावे लागले.

दरम्यान, आगामी काळातही भाजपाला रोखण्यासाठी सध्या तरी महाविकास आघाडीतील तिघांनाही एकत्र राहणे गरजेचे असल्याने या तिघांकडूनही अद्याप नेतृत्वावरून टोकाची भूमिका घेतलेली नाही हे विशेष. त्यामुळे ममता बॅनर्जीच्या निमित्ताने राज्यात निर्माण झालेलं राजकिय वादळं सध्या तरी पेल्यातील ठरलेलं असलं तरी त्यामागे राष्ट्रीय राजकारणाची एक किनार आहे. त्यामुळे त्याचे प्रतिबिंब आज नाही तर उद्या ते उमटल्याशिवाय राहणार नाही.

Check Also

विधिमंडळ आणि परिसरात आमदारांच्या वर्तनासाठी जारी केली ही आचारसंहिता विधिमंडळ आणि परिसरात आमदारांच्या वर्तनासाठी जारी केली ही आचारसंहिता

मराठी ई-बातम्या टीम अधिवेशन काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि भाजपा आमदार नितेश राणे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *