Breaking News

शिष्टाचारावरून तहसीलदाराच्या पत्राला वन अधिकाऱ्याचे खरमरीत उत्तर

राजकारणात मानापमान नाट्य गावपातळीवरून ते राष्ट्रीय पातळीवर सातत्याने आपल्याला अनेकविध पध्दतीने पहायला मिळते. मात्र राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या दोन वेगवेगळ्या विभागातील पदे समकक्ष कोणती आणि वरिष्ठ कोणती याचा उलघडा न झाल्याने पत्र पाठविण्याच्या पध्दतीवरून वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आणि महसूल यंत्रणेतील तहसीलदार यांच्यात पत्राद्वारे चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे तहसीलदारांनी शिष्टाचाराची आठवण करून देत पत्र लिहीले त्यास वन अधिकाऱ्याने खरमरीत पत्र लिहीत चांगलेच प्रत्युत्तर दिले. त्यामुळे या पत्राची महसूल आणि वनविभागात चांगलीच चर्चा रंगली आहे.

झाले असे की, पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील मौजे देवघर येथील वन विभागाशी संबधित असलेली माहिती मुळशी तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण यांना पौड वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.जी.चव्हाण यांनी पत्र पाठवित माहिती मागविली. मात्र त्या पत्रातील भाषेला तहसीलदार अभय चव्हाण यांनी आक्षेप घेत तहसीलदार पदापेक्षा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे अर्थात एस.जी.चव्हाण यांचे पद हे कनिष्ठ असल्याचे पत्राद्वारे सांगत पत्र पाठविताना शिष्टाचार पाळण्याचा सल्ला वनपरिक्षेत्र अधिकारी एस.जी.चव्हाण यांना दिला.

त्यावर सदर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.जी.चव्हाण यांनी तहसीलदार अभय चव्हाण यांना उलट टपाली खरमरीत पत्र पाठवित तहसीलदार आणि वनपरिक्षेत्र अधिकारी ही दोन्ही पदे समकक्ष असल्याचे तहसीलदार अभय चव्हाण यांना पत्राद्वारे सुनावले.

वनपरिक्षेत्र अधिकारी एस.जी.चव्हाण यांनी पत्राद्वारे म्हणाले की, मौजे येथील देवघर येथील दस्तऐवजप्रकरणी जो अर्ज पाठविण्यात आला तो अर्ज या कार्यालयाकडून नव्हे तर वनविभागाच्या तालुकास्तरीय कार्यालय प्रमुखाकडून शासकिय कामासाठी तुम्हाला पाठविण्यात आला. तसेच ते पत्र तालुकास्तरीय कार्यालय प्रमुखास महसूल अभिलेख जतन करणारे अधिकारी म्हणून या अर्थाने हा पत्रव्यवहार करण्यात आल्याचे बाब निदर्शनास आणून दिली.

तसेच शासन निर्णयानुसार पत्रातील भाषेसंदर्भात महोदय आणि आपला हे दोनच शब्द वापरणेबाबत त्या निर्णयात नमूद करण्यात आलेले आहे. त्यामध्ये आपला विश्वासू असा शब्दप्रयोग करण्याचा उल्लेख नाही. त्यामुळे आपल्या कार्यालयासही हा शिष्टाचार लागू होत असल्याची आठवण तहसीलदार अभय चव्हाण यांना करून दिली.

महाराष्ट्र वननियमावली २०१४ च्या नियम क्रमांक २ (क) नुसार महसूल खात्याच्या व्यवस्थापना खालील राखीव वने अथवा संरक्षित वने यांच्याबाबत “मुख्य वनसंरक्षक, उप वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी” म्हणजे अनुक्रमे “विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि तहसीलदार” ज्यांचे कार्यक्षेत्रात अशी वने येतात. या अर्थाने वनपरिक्षेत्र अधिकारी हे पद तहसीलदार पदास समकक्ष पद असल्याची आठवणही तहसीलदार अभय चव्हाण यांना करून दिली.

त्यामुळे हे पत्र सध्या महसूल आणि वन विभागातील अधिकाऱ्यांमध्ये चांगलेच व्हायरल होत असून त्यावरून खुमासदार चर्चाही रंगली आहे.

तहसीलदार आणि वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे हेच ती पत्रेः- (पत्र वाचायला विसरू नका)

 

Check Also

केंद्रीय निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदी यांना दिली आचारसंहितेतून सूट?

एखाद्या मतदारसंघातील किंवा राज्यातील विधिमंडळ अथवा संसदेच्या लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर झाल्यानंतर त्या त्या राज्याच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *