Breaking News

युक्रेनच्या अध्यक्षांनी साधला रशियन जनतेशी हृदयसंवाद: वाचा काय नेमके म्हणाले भक्ती बिसुरे कानोलकर (Bhakti Bisure Kanolkar) यांनी भाषणाचा केलेला भावानुवाद

रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. या कठीण प्रसंगी युक्रेनच्या अध्यक्षांनी रशियन नागरिकांशी आणि जगाशी बोलण्याचा प्रयत्न केला आहे. एक संवेदनशील, समंजस नेतृत्व कसे असते आणि अशा संकट प्रसंगी त्याचा कस कसा लागतो, ते अशा वेळी दिसून येते.
आपण प्रत्येकाने हे भाषण वाचले पाहिजे. जग तिसऱ्या महायुध्दाच्या खाईत लोटायचे नसेल तर हे सारे समजून घ्यायला हवे.
अजून आपण कोविड Pandemic मधून नीट सावरतो आहोत, मागील दोन वर्षात आपण पन्नास लाखाहून अधिक लोकांना गमावले आहे. आणि अशा अवस्थेत जगाला पुन्हा युध्दाच्या खाईत ढकलणाऱ्या पुतीन सारख्या नेतृत्वाची ‘ फ्लॉवर नहीं फायर है ‘ अशा सवंग भाषेत आरती ओवाळताना आपला थोर मीडिया दिसतो आहे.
अशावेळी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वालादोमोर झेलेंस्की यांचे हे भाषण आपल्याला ग्लोबल जगण्याचे भान देणारे आहे.
——————————-
रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरुन संपर्क साधायचा मी प्रयत्न केला पण माझ्या हाती फार काही लागलं नाही. नुसतीच शांतता. खरंतर ही शांतता डॉनबासमध्ये असायला हवी. तशी ती नाही म्हणुन मी रशियन नागरिकाशीच बोलायचं ठरवलं. आज एक राष्ट्राध्यक्ष म्हणून नाही, युक्रेनी नागरिक म्हणून मी बोलतो आहे. रशिया-युक्रेनची थोडी थोडकी नाही, २००० किलोमीटर बॅार्डर सामाईक आहे. या सीमेवर किमान दोन लाख रशियन सैन्य तैनात आहे. रशियन नेतृत्वानंच या सैन्याला आमच्यावर, एका परकीय देशाच्या भूभागावर हल्ला करायचे आदेश दिलेत. हा हल्ला फक्त आमच्यावर नाही. संपूर्ण युरोप खंडात युद्ध निर्माण करण्याच्या दिशेने उचललेलं हे एक पाऊल आहे. कधी काय घडेल, काय कारण मिळेल आणि युद्धाची ठिणगी पडेल याचीच चर्चा जगभर सुरु आहे. या परिस्थितीत अक्षरशः एक चिमुकली ठिणगीसुद्धा सगळं काही भस्मसात करायला पुरेशी ठरु शकते.
ही ठिणगी नव्हे क्रांतीची ज्योत आहे, ती युक्रेनला स्वातंत्र्य बहाल करेल असा दावा केला जातोय. पण आम्ही युक्रेनी आत्ताही स्वतंत्रच आहोत. आम्हाला भुतकाळाचा विसर पडलेला नाही. आम्ही आमचं भविष्य घडवतोय. टिव्हीवरच्या बातम्यांमध्ये दिसणारा युक्रेन आणि प्रत्यक्षातला युक्रेन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आम्ही नाझी आहोत असं तुम्हाला सांगण्यात येतंय, पण नाझीवाद संपवण्यासाठी लाखो जीव गमावलेला देश नाझी कसा? माझ्या आजोबांनी अख्खी हयात रशियन पायदळातर्फे युद्ध लढण्यात खर्ची घातली. स्वतंत्र युक्रेनमध्ये कर्नल म्हणून ते मृत्यूला सामोरे गेले. तरी मी नाझी कसा? आम्ही रशियन संस्कृतीचा तिरस्कार करतो असं ते म्हणतात, पण मुळात संस्कृतीचा – मग तो कुठल्याही असेल – तिरस्कार कसा करायचा असतो? उलट दोन शेजारी एकमेकांच्या संस्कृती समृद्धच करतात. ते एकमेंकापासून वेगळेही असतात आणि एकमेकांसारखेही! आपण वेगळे आहोत, पण म्हणून आपण एकमेकांचे शत्रु नाही.
आम्हाला आमचा इतिहास स्वतः लिहायचाय. शांतपणे, खरेपणानी आणि सौहार्दाने. मी डॉनबासवर बॉम्ब टाकायचा, हल्ला करायचा आदेश दिलाय असं ते म्हणतात. पण हल्ला किंवा बॉम्ब कुणावर? माझ्या अत्यंत आवडत्या डॉनेट्स्कवर? की आर्टेमावर? डॉनबास अरिनामध्ये मी फुटबॉल मॅचेस पाहिल्या आहेत. मॅचेस हरल्यानंतर ते दुःख पचवायला पार्क शेर्बाकोव्हामध्ये मद्य प्यायलोय. माझ्या एवढ्या आवडत्या जागांवर बॉम्ब आणि हल्ले करायचे आदेश मी देऊ? लुगांस्कला माझ्या सगळ्यात जवळच्या मित्राची आई राहते. त्याच्या वडिलांचं दफन तिथे केलंय, तिथे बॅाम्ब टाकायला मी कसं सांगेन? मी रशियनमध्ये तुमच्याशी बोलतोय, तरी असे कैक रशियन्स आहेत, ज्यांना मी सांगतोय त्या जागा, रस्ते, प्रसंग यातलं काही म्हणजे काही कळत नाहीत. हे सगळं तुमच्यासाठी परकं आहे – फॉरेन. अनोळखी. हा आपला देश, आपली मातृभूमी, आपला इतिहास आहे. तरी कुणाविरुद्ध का आणि कशासाठी लढायचंय?
तुमच्यातले कित्येकजण युक्रेनला येऊन गेले आहेत. अनेकांचे इथे नातेवाईकही आहेत. तुमच्यापैकी काही जणं इथल्या विद्यापीठांमध्ये शिकले. युक्रेनशी तुमचं जिव्हाळ्याचं नातं आहे. आमची माणसं, आमची तत्व – एकुणच आम्ही कसे आहोत हे तुम्ही जाणता. त्या सगळ्याला मनापासून स्मरुन तुमच्या मनाचं ऐका. युक्रेनच्या माणसांना, इथल्या सरकारला शांतता हवीये. फक्त शांतता. आम्ही फक्त शांतता मिळवण्यासाठीच प्रयत्न करतो आहोत. आम्ही एकटे नाही. आमच्याबरोबर अनेक जण आहेत.
कारण काहीही गमावून शांतता मिळवण्याची आमची तयारी नाही. प्रत्येक युक्रेनीला स्वतःचं भवितव्य ठरवण्याचा हक्क देणारं, माणसांचा सुरक्षित, निर्धोक आयुष्याचा हक्कं मान्य करणारं शांततामय भविष्य आम्हाला हवंय. आम्हाला युद्ध नकोय. कुठल्याही प्रकारचं युद्ध आम्हाला नकोय.
पण एक सांगतो, आम्हाला युद्ध नको असलं तरी, आमच्या अस्तित्वावर, आमच्या मुलाबाळांच्या सुरक्षिततेवर घाला घालण्याचा प्रयत्न कुणी केला तर आम्ही त्याचा प्रतिकार मात्र जरुर करु. मूग गिळून गप्प बसणार नाही. हल्ला करणार नाही, पण प्रतिकार जरुर करु. तुम्ही आमच्यावर हल्ला केलात तर आम्ही छातीवर वार झेलू, पाठ दाखवुन पळणार नाही. युद्ध ही साधी गोष्ट नाही. त्याची खुप मोठी किंमत असते आणि एकट्यादुकट्याला नाही, संपूर्ण जगाला ती चुकवावी लागते. पैसा, प्रतिष्ठा, जीवनमान, स्वातंत्र्य सगळं काही पणाला लागतं. त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे माणसं आपले जीवलग गमावतात. दुःख, वेदना, रक्तपात आणि शेकडो, हजारो, लाखों माणसांचे मृत्यू याशिवाय युद्धातून फार काही साध्य होत नाही.
युक्रेनपासून रशियाला धोका आहे असं तुम्हाला सांगितलं जातंय. हे कालही खरं नव्हतं आणि आज उद्या कधीही नसेल. तुम्हाला नाटोकडून सुरक्षेची हमी हवीये, आम्हालाही ती हवीये. तुमच्या देशापासुन, रशियापासून सुरक्षिततेची हमी आम्हाला हवीये. बुडापेस्ट कराराचं पालन आम्हाला हवंय. युक्रेनची सुरक्षितता ही आमच्या शेजाऱ्यांच्या सुरक्षिततेवर अवलंबुन आहे हे आम्ही जाणतो. म्हणूनच आम्ही आज फक्त आमच्या नाही, संपूर्ण युरोपच्या सुरक्षिततेबद्दल बोलतो आहोत. आमचं पहिलं उद्दिष्ट मात्र युक्रेनमध्ये शांतता नांदावी, आमचे नागरिक सुरक्षित असावे हेच आहे. तुम्हा रशियन्सना, संपूर्ण जगाला आम्हाला हे सांगायचं आहे, की युद्धानं काहीही साध्य होणार नाही, उलट सगळ्यांच देशांची सुरक्षितता धोक्यात येईल.
याचा सगळ्यात जास्त त्रास मानजातीला होणार आहे. हे अजिबात घडू नये असं वाटणारी मानवजात आहे आणि हे रोखण्याची क्षमताही फक्त मानवजातीत आहे. अशी शेकडो हजारो माणसं आहेत. नेते, पत्रकार, लेखक, कवी, अभिनेते, संगीतकार, कलाकार, वैज्ञानिक, ब्लॉगर्स, टिकटॉकर्स आणि हो, अगदी साधी, गरीब, सामान्य, अतिसामान्य माणसं – बायका, पुरुष, लहान-मोठे, वडिल, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कित्येक रशियन माता! आजुबाजुला सुरु असलेलं हे सगळं थांबवण्याची क्षमता तुमच्यात आहे हे मी जाणतो.
रशियन वाहिन्या माझं भाषण दाखवणार नाहीत याची मला कल्पना आहे. पण तरी रशियन्सनी ते पहायला, ऐकायलाच हवं असं मला वाटतं. वास्तव काय आहे हे रशियन नागरिकांना समजायला हवं. वास्तव हेच आहे, की खुप उशिर होण्याआधी हे सगळं थांबायला हवं. युद्ध थांबायला हवं. रशियन नेत्यांना आमच्याशी बोलायचं नसेल, तर त्यांनी किमान तुमच्याशी तरी बोलावं. तुम्हाला युद्ध हवंय का हे त्यांनी विचारायला हवं.
तुमचं उत्तर काय असेल, काय आहे, हे मी जाणतो. पण ते तुम्ही देणंच जास्त महत्त्वाचं आहे! बाकी, सगळेच तुम्ही जाणते आहात, मी अधिक काय सांगावं?

नमस्कार. धन्यवाद.
: वालोदोमीर झेलेन्स्की
राष्ट्राध्यक्ष युक्रेन
(अनुवाद : भक्ती बिसुरे कानोलकर)

Check Also

बिल्कीस बानो: या मुद्यांच्या आधारे न्यायालयाने ठरविला गुजरात सरकारचा निर्णय अवैध

देशातील गोध्रा येथील जातीय दंगली दरम्यान बिल्कीस बानो या मुस्लिम गरोदर महिलेवर बलात्कार करून तिच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *