Breaking News

राज्यसभा निवडणूकः मुदत संपली, कोण कोणाला कात्रजचा घाट दाखविणार ? भाजपा आणि महाविकास आघाडी आमने-सामने

राज्यसभा निवडणूकीसाठी आज अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आणि वेळेची मुदत दुपारी ३ वाजेपर्यंतची वेळ होती. परंतु घोडेबाजार टाळण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांची सागर या निवासस्थानी भेट घेतली. मात्र या भेटीत सर्वमान्य तोडगा निघाला नसल्याने अखेर भाजपा आणि महाविकास विकास आघाडी एकमेकांसमोर शड्डू ठोकल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सहाव्या जागेवरून कोणकोणाला कात्रजचा घाट दाखविणार याबाबत राज्यात उत्सुकता निर्माण झाली आहे.

संभाजी राजे यांनी शिवसेनेत प्रवेश करून शिवबंधन बांधून घेण्यास नकार दिल्यानंतर कोल्हापूरचे शहरप्रमुख निष्ठावंत शिवसैनिक संजय पवार यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहिर करण्यात आली. तर शिवसेना आणि महाविकास आघाडीला शह देण्यासाठी म्हणून भाजपानेही कोल्हापूरचेच धनंजय महाडिक यांना उमेदवार जाहीर केली.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जशी मतांची कमतरता भाजपाकडे आहे. तशी महाविकास आघाडीकडेही मतांची कमतरता असल्याचे स्पष्ट करत या निवडणूकीत अपक्ष आमदार आणि छोटे पक्षांच्या आमदारांवरच सारी भिस्त असल्याचे स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर भाजपाकडे मूळ १०६ आणि अपक्षांची मिळून एकूण ११३ मते आहेत. यापैकी ८४ मते केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि माजी मंत्री डॉ.अनिल बोंडे यांना गेल्यानंतर २८ भाजपाकडे शिल्लक रहात आहेत. तरीही भाजपाला आणखी दोन अतिरिक्त मते मिळाल्याचा दावा करण्यात येत असल्याने भाजपाकडे ३० मते अतिरिक्त असल्याचे सांगण्यात येत आहे.

तर महाविकास आघाडीकडे शिवसेनेची ५५, काँग्रेसची ४४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ५३ मते असे मिळून १५३ मते हक्काची आणि अपक्षांनी पाठिंबा दिलेली बच्चु कडू यांच्या प्रहार संघटनेची २, राजेंद्र पाटील- यड्रावकर, शंकरराव गडाख, किशोर जोरगेवार, अग्रवाल, बालदी, बहुजन विकास आघाडीची २, सपा २, सीपीआय (एम) १, संजयमामा शिंदे, आशिष जैयस्वाल, नरेंद्र भोंडेकर, राजकुमार पाटील, देवेंद्र भुयार, शंकरराव महाडीक यांच्यासह १४ आमदारांचा पाठिंबा महाविकास आघाडीला आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाले आहे. तर पंढरपूरच्या पोटनिवडणूकीत भाजपाने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील दोन आमदारांची संख्या २ ने घटली आहे. याची एकूण गोळाबेरीज केली तर महाविकास आघाडीकडे १६८ सदस्यांची संख्या आहे. तर २ आमदार अर्थात नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे दोघेजण तुरुंगात असल्याने एकूण थेट ४ आमदारांच्या मतांचा तुटवडा महाविकास आघाडीला बसत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात महाविकास आघाडीकडे १६८ मते हाती असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीच्या तीन उमेदवारांना राज्यसभेवर जाण्यासाठी १२६ मते लागणार आहेत. तर चवथा उमेदवाराच्या विजयासाठी अतिरिक्त ४२ मते लागणार आहेत. ही ४२ मते महाविकास आघाडीकडे अतिरिक्त असल्याचे दिसून येते. त्यामुळे १६८ मतांच्या आधारे महाविकास आघाडीचे ४ ही उमेदवार निवडूण जात असल्याचे दिसून येत आहे. परंतु दगाफटका नको म्हणून आघाडीकडून समझौता करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

दरम्यान , महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपा नेत्यांची भेट घेतली आहे. सांसदीय राजकारणातील संख्याबळाच्या गणितात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे तरबेज आहेत. त्यामुळे ऐनवेळी कोणते गणित कसे फिरवायचे आणि कोणत्या गणितात कसा मोडता घालायचा याचे डावपेच त्यांच्याशिवाय महाराष्ट्रात तरी अन्य कोणाला जमल्याचे तरी दिसून येत नाही. त्यांनी पुढाकार घेतला तर भाजपामध्ये असलेले अनेक विद्यमान आमदार महाविकास आघाडीला करू शकतील. मात्र निवडणूकीत उमेदवार शिवसेनेचा आहे. शिवसेनेत अंतिम शब्द हा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा चालतो. आणि त्यातच या निवडणूकीची सर्व जबाबदारी शिवसेनेचे नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
त्यातच सत्ताधारी महाविकास आघाडीतील अपक्षांना आणि भाजपातील अपक्षांना राज्यसभा निवडणूकीच्या निमित्ताने चुचकारण्याचे प्रयत्न महाविकास आघाडी आणि भाजपाकडून करण्यात येत आहे. सत्तेत असूनही घोडेबाजार टाळण्यासाठी आणि राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी यादृष्टीकोनातून महाविकास आघाडीने दोन पावले मागे सरकत भाजपाला मनविण्याची तयारी केली. परंतु सध्या भाजपा समजूतीसाठी तयार झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे येणाऱ्या १० मे रोजी भाजपा महाविकास आघाडीला कात्रजचा घाट दाखविणार की, महाविकास आघाडी भाजपाला कात्रजचा घाट दाखविणार हे कळेलच. मात्र कात्रजचा घाट दाखविण्यात निपुण असलेले नेतृत्व सध्या महाविकास आघाडीकडे आहे.

Check Also

अखेर मालदीव बरोबरचे संबध दृढ करण्यासाठी चीन घेतोय पुढाकार

साधारणतः दोन महिन्यापूर्वी मालदीव मधील निवडणूका पार पडल्या या निवडणूकीत भारतीय वंशाचे मोहम्मद मोईझु यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *