Breaking News

UPSC परिक्षेत दिल्लीची श्रुती शर्मा पहिली तर विदर्भातील तिघे उत्तीर्ण एकाचा निकाला राखून ठेवला

यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. यावेळी परीक्षेमध्ये मुलींनी हॅट्ट्रिक मारली आहे. यावेळी श्रुती शर्मा यूपीएससी परीक्षेत अव्वल ठरली आहे. श्रुती शर्मानंतर अंकिता अग्रवाल हिने दुसरा तर गामिनी सिंगला हिने तिसरा क्रमांक पटकावला आहे. UPSC CSE २०२१ अंतिम निकालामध्ये एकूण ६८५ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय एका उमेदवाराचा निकाल आता रोखण्यात आला आहे. आणि तात्पुरत्या निवडीसाठी ८० उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.

परीक्षार्थींचे गुण निकाल जाहीर झाल्यानंतर सुमारे १५ दिवसांनी जाहीर केले जातील. यापूर्वी आयोगाने नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२१ चा निकाल १७ मार्च रोजी जाहीर केला होता. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती ५ एप्रिल ते २६ मे २०२२ या कालावधीत घेण्यात आल्या. यूपीएसी नागरी सेवा परीक्षा २०२१ च्या भरतीद्वारे, आयएएस, एएफएस, आयपीएस आणि गट अ आणि गट ब ची ७४९ पदे भरली जातील. तसेच महाराष्ट्रासह उपराजधानीच्या निकालाचा टक्का वाढला आहे. भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूरमधून सहा उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या. यातील तीन उमेदवारांनी या परीक्षेत बाजी मारली असून यशाचा झेंडा फडकविला आहे.

सेवाग्रामच्या महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेची विद्यार्थिनी डॉ. आकांक्षा तामगाडगे हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. तिची देशपातळीवरील रँक ५६२ आहे. तिने परराष्ट्र सेवेत जाण्याचा मानस व्यक्त केला आहे. ती २०१८ मध्ये एमबीबीएस उत्तीर्ण झाल्यानंतर परीक्षेच्या तयारीस सुरुवात केली.

वडील डॉ. मिलिंद व आई डॉ. माधुरी यांनी सतत प्रोत्साहन दिल्याचे ती सांगते. पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्यापेक्षा केंद्रीय परीक्षा देण्याकडे कल असल्याने ती पुण्यात राहून खासगी वर्गात शिकली. तिथे तयारी करीत अखेर तिसऱ्या प्रयत्नात ती यशस्वी झाली.

ती वणी येथील राहणार असून वडील स्वतःचा दवाखाना चालवितात, तर आई शासकीय सेवेत वैद्यकीय अधिकारी आहे. तिचे गुरू डॉ. इंद्रजित खांडेकर सांगतात की आकांक्षा एक अत्यंत मेहनती, अभ्यासू विद्यार्थिनी आहे. ती पदवी सुद्धा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली होती.

गेल्या वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२० ची मुख्य मुलाखत फेरी २ ऑगस्ट ते २२ सप्टेंबर २०२१ या कालावधीत घेण्यात आली होती. त्यानंतर २४ सप्टेंबर २०२१ रोजी अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. या वर्षी मुलाखतीची प्रक्रिया २६ मे २०२२ रोजी संपली. त्यामुळे UPSC CSE २०२१ चा अंतिम निकाल सोमवारी जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त केली होती.
यात नागपूरच्या भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रातील तीन विद्यार्थी पात्र ठरले होते.

मोदींकडून अपयशी विद्यार्थ्यांना आधार तर यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन
मोदींनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं, लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्वांचे अभिनंदन. भारताच्या विकासाच्या प्रवासाच्या महत्त्वाच्या काळात आपली प्रशासकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या या तरुणांना माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा.
ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळालं नाही त्यांची निराशा मी समजू शकतो. मात्र, हे सर्व तरूण ज्या क्षेत्रात काम करतील तेथे उत्तम काम करतील आणि देशाचा गौरव वाढवतील, असं मला वाटतं. त्यांनाही माझ्या शुभेच्छा, असंही मोदींनी म्हटले.

Check Also

केंद्रीय निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदी यांना दिली आचारसंहितेतून सूट?

एखाद्या मतदारसंघातील किंवा राज्यातील विधिमंडळ अथवा संसदेच्या लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर झाल्यानंतर त्या त्या राज्याच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *