ईव्हीएममधील छेडछाड व्यतिरिक्त मतदानादरम्यान मतदारांना पैसे, मद्य किंवा इतर प्रलोभनाच्या साहित्याचे वाटप केल्याबद्दल दोषी आढळल्यास उमेदवारांना किमान पाच वर्षांसाठी अपात्र ठरवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्देशासह विविध आदेश देण्याची मागणी याचिकाकर्ते सामाजिक संस्थेचे अध्यक्ष के.ए.पॉल यांनी जनहित याचिकेतून केली होती. परंतु, जेव्हा तुम्ही निवडणूक जिंकता, तेव्हा ईव्हीएममध्ये छेडछाड होत नाही. तुम्ही निवडणूक हरता तेव्हा ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाते, अशी टिपण्णी न्या. विक्रम नाथ आणि न्या. प्रसन्न वराळे यांच्या खंडपीठाने केली.
काय घडले न्यायालयात
याचिका सुनावणीसाठी असता तुम्ही एक मजेशीर जनहित याचिका केली आहे. तुम्हाला अशा उत्कृष्ट कल्पना कुठून सुचतात आणि कशा?, अशी विचारणा खंडपीठाने याचिकाकर्त्यांना केली. आपण एका संस्थेचा अध्यक्ष आहोत. ज्या संस्थेने जवळपास ४० लाख विधवा आणि तीन लाखांहून अनाथ मुलांची सुटका केल्याची माहिती याचिकाकर्त्यानी न्यायालयाला दिली. त्यावर तुम्ही या राजकीय आखाड्यात का उतरला आहात? तुमचे कामाचे क्षेत्र खूपच वेगळे आहे, असे खंडपीठाने अधोरेखीत केले. त्यावर आपण १५० हून अधिक देशांना भेट दिल्यानंतर तिथे निवडणूकासाठी मतपत्रिकेचा अवलंब केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे भारतानेही या देशांमध्ये मतदानासाठी राबविणाऱ्या जाणाऱ्या मतपत्रिकेचे अनुकरण केले पाहिजे, असा दावा पॉल यांच्यावतीने करण्यात आला. परंतु, तुम्ही इतर जगापेक्षा वेगळे का होऊ इच्छित नाही?, ९ हजार कोटी रुपये जप्त केल्याचा दावा याआधीच निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. तसेच पुन्हा प्रत्यक्ष मतपत्रिकेकडे आपण वळलो तर भ्रष्टाचार होणार नाही का?, अशी विचारणा खंडपीठाने याचिकाकर्त्यांना केली. निवडणुकांमध्ये पैशांचे वाटप होते, हे सर्वश्रूत आहे, असे याचिकाकर्त्याने सांगितल्यानंतर आम्हाला कोणत्याही निवडणुकीसाठी कधीही पैसे मिळाले नाहीत’, अशी मिष्किल टिप्पणी खंडपीठाने केली.
ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाऊ शकते अस दावा टेस्लाचे सीईओ आणि सह-संस्थापक इलॉन मस्क यांनी केला आहे. तसेच टीडीपीचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू, आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनीही ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाऊ शकते, असा दावा केल्याचा दाखला पॉल यांनी न्यायालयाला दिला. परंतु, चंद्राबाबू नायडू जेव्हा हरले तेव्हा ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाऊ शकते, असा दावा केला. यावेळी जगन मोहन रेड्डी यांनीही पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतरच ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याकडे खंडपीठाने याचिकाकर्त्यांचे लक्ष वेधले आणि याचिका निराधार असल्याचे निरीक्षण नोंदवून याचिका फेटाळून लावली.
याआधी एप्रिल महिन्यातही ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा संशय “निराधार” असल्याचे सांगून सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम यंत्रे सुरक्षित असल्याचे स्पष्ट करताना जुन्या प्रणालीवर परत जाण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या होत्या.