Breaking News

क्रांती रेडकरांचे की वानखेडेंच्या वडिलांचे म्हणणे खरे ? समीर वानखेडेच्या जातप्रमाणपत्रावर ज्ञानदेव वानखेडेंची परस्पर विधाने

मुंबई: प्रतिनिधी

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी नोकरी मिळवताना मागासवर्गीय असल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केल्यानंतर समीर वानखेडे यांच्या जातीबद्दल पत्नी क्रांती रेडकर आणि वानखेडेचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी परस्पर विरोधी विधाने केल्याने यातील नेमकी कोणाचे म्हणणे खरे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नवाब मलिक यांच्या आरोपनंतर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे हे एका मराठी वृत्त वाहीनीला लाईव्ह सामोरे जात आम्ही मागासवर्गीयच असल्याचा दावा करत अखिल भारतीय वाल्मिकी समाजकडून देण्यात आलेले जात प्रमाणपत्र सादर केले. तसेच नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपाच्या विरोधात आपण न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगत अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल होत असेल तर तो ही दाखल करणार असल्याचा इशारा मलिक यांना दिला.

दरम्यान समीर वानखेडेंच्या लग्नाच्या वेळी दोन्ही कुटुंबीय मुस्लीम असल्याचा दावा त्यांचं लग्न लावणाऱ्या काझींनी केल्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, लग्नाच्या वेळी दोन वेगवेगळे धर्म असतील तर निकाह होत नाही. मुस्लीम धर्माच्या नियमानुसार दोघं एकाच धर्माचे (इस्लाम) असतील तरच निकाह कबूल होतो. हिंदू-मुस्लीम यांच्यात निकाह होत नाही. त्यामुळे कदाचित माझ्या पत्नीने तिथे मुस्लीम वगैरे लिहिलं असेल. प्रेमाने काहीतरी लिहिलं असेल. पण माझ्या सर्व कागदपत्रांमध्ये हिंदूच असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच मी मुस्लिम मुलीशी लग्न केल्याने मला कोणी सोनू, पप्पू किंवा दाऊद या नावाने बोलावले असतील. परंतु दाऊद या नावाने मला तरी कोणी बोलावल्याचे आठवत नसल्याचे सांगत मी हिंदू मागासवर्गीयच असून माझे वडील आणि त्यांचे वडील हे मागासवर्गीयच होते असा दावा केला. त्याचबरोबर मी कधीही मुस्लिम धर्म स्विकारला नाही की, झालो नाही. मी मागासवर्गीय असल्याने माझा मुलगाही हिंदू मागासवर्गीय असल्याचा दावाही त्यांनी केला.

तर समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनीही एका मराठी वृत्त वाहीनीशी बोलताना माझे पती समीर वानखेडे हे हिंदू मागासवर्गीयच आहेत. त्यांनी डॉ.शबाना कुरेशी यांच्याशी केवळ आईच्या इच्छेखातर मुस्लिम पध्दतीने लग्न केले. त्यानंतर त्यांचा पहिला विवाह हा आंतरजातीय विवाह असल्याने स्पेशल मॅरेज अॅक्ट खाली त्यांनी नोंदणी करत त्यावर हिंदू-महार अशी जात लिहिल्याचे सांगत नोंदणीकृत केलेले मॅरेज सर्टिफीकेटही दाखविले.

दुसरीकडे एका हिंदी वृत्तवाहीनीशी बोलताना क्रांती रेडकरने समीर यांची आई समीर यांच्या वडिलांना प्रेमाने दाऊद हाक मारायची. निकाह नाम्यामध्ये समीर दाऊद वानखेडे असं नाव लिहिलं आहे तो योग्य आहे? असा प्रश्न क्रांतीला विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना क्रांतीने समीरची आई समीरच्या वडिलांना प्रेमाने या नावाने बोलवायची, म्हणून कदाचित यामुळे त्यांनी तिथे टोपणनाव लिहिलं असेल असं उत्तर दिले.

Check Also

नव्या वर्षात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद कोणाकडेः मध्यावधी निवडणूकांचे स्पष्ट संकेत

२०१४ मध्ये लोकसभेचा पाच वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मार्च …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *