Breaking News

मोठी बातमी: पंजाबमध्ये मोर्चेकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखले १५ ते २० मिनिटे रस्त्यातच पंतप्रधानांना थांबावे लागले

मराठी ई-बातम्या टीम

पंजाब विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंजाब दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोर्चेकऱ्यांच्या प्रखर विरोधामुळे अखेर दौरा रद्द करण्याची वेळ आली. परंतु भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी या प्रकारास पंजाबच्या काँग्रेसला जबाबदार धरले असून मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी हे साधे फोन घ्यायला तयार नसल्याचा आरोप केला.

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणार असल्याची माहिती मिळताच येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या दौऱ्यास विरोध करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाबमधील फिरोजपूर येथील नियोजित जाहीर सभेच्या कार्यक्रमासाठी जाण्यासाठी निघाले असता हुसेनवाला येथील उड्डाण पूलावरून जाताना रस्त्याच्या दुसऱ्याबाजूला मोर्चेकऱ्यांनी बसेस, ट्रॅक्टर लावून रस्ता अडविल्याचे दिसून आले. त्यामुळे मोदींचा ताफा सुरक्षेच्या कारणास्तव उड्डाणपूलावरच थांबविण्यात आला.

मोर्चेकऱ्यांनी लावलेल्या वाहनांना हटविण्यासाठी स्थानिक पोलिस प्रशासन आणि राज्य सरकारशी संपर्क साधण्याचा प्रयत्न भाजपाच्या नेत्यांनी सुरु केले. मात्र पजाब सरकारमधील कोणीही भाजपा नेत्यांना प्रतिसाद देत नसल्याने अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १५ ते २० मिनिटे रस्त्यावर थांबावे लागले. मात्र अखेर निर्णय होत नसल्याने त्यांचा फिरोजपूर येथील नियोजित दौरा रद्द करण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सभेच्या स्थानी जाहीर केले.

दरम्यान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी पंतप्रधानाकडून हजारो कोटींच्या विकास कामांची घोषणा करण्यात येणार होती. परंतु त्यांच्या दौऱ्याला कमकुवत मानसिकतेतून विरोध करण्यात येत असल्याबाबत पंजाब सरकारवर आरोप करत जाहिर सभेसाठी येणाऱ्या वाहनांना आणि लोकांना रोखण्यासाठी पंजाब पोलिसांना आदेश दिल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

पंजाबमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफा अडवणूक प्रकरणाची केंद्रीय गृहमंत्रालयाने गंभीर दखल घेतली असून यास जबाबदार असणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कडक कारवाई करण्याची सूचना पंजाब सरकारला केली.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *