राज्य आणि केंद्र सरकारकडून मुंबई ते अहमदाबाद दरम्यान देशातील पहिली बुलेट ट्रेन बुलेट प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. परंतु या प्रकल्पास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विरोध दर्शविल्याने हा प्रकल्प होणार की नाही अशी शक्यता निर्माण झालेली असतानाच दुसऱ्याबाजूला राज्याचे मुख्य सचिव नित्य नेमाने या प्रकल्पाचा आढावा घेत आहेत. तसेच त्यांनी नुकताच एक दिवसाचा दिल्ली दौऱा केला. परंतु दौऱ्यानंतर नियोजित असलेली बैठक एक दिवस आधीच घेवून टाकली. त्यामुळे मंत्रालयातील प्रशासनात वेगवेगळ्या तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
राज्याच्या मुख्य सचिव पदाची धुरा मनुकुमार श्रीवास्तव यांनी स्विकारल्यानंतर दोन दिवसांपूर्वी पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर केला. या दौऱ्यात त्यांनी त्यांनी पंतप्रधान कार्यालय आणि इतर महत्वाच्या सचिवांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु दिल्ली दौऱ्यावरून परतल्याबरोबर मुख्य सचिवांनी नियोजित असलेली बुलेट ट्रेनच्या कामकाजाच्या आढाव्याची बैठक एक दिवस आधीच घेतली. विशेष म्हणजे ही बैठक एक दिवस आधीच घेण्यात येणार असल्याचा निरोप मुख्य सचिवांनी सकाळी १० वाजता सर्व विभागाच्या प्रमुख सचिवांना दिला आणि १२.३० ते १ वाजता सदरची आढावा बैठक घेत त्या विषयीचा अहवाल केंद्रास पाठवून दिल्याचे सांगण्यात येत आहे.
मराठी ई-बातम्या या संकेतस्थळास उपलब्ध झालेल्या कागदपत्रानुसार मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला दिवसेंदिवस उशीर होत असल्याबाबतचा अहवाल केंद्र सरकारने तयार केला. त्या अहवालात महाराष्ट्र सरकारकडून जमिन अधिग्रहण, वन विभागाकडून परवानग्या आणि, वाईल्ड लाईफ विभागाकडून अद्याप परवानग्या मिळालेल्या नसल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पास उशीर होत असल्याची बाब केंद्र सरकारने राज्याला पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार या विभागाच्या परवानग्याबाबतचा निर्णय घेवून पुढील कारवाई कऱण्याचे आदेश केंद्राने राज्य सरकारला दिले होते. यासंदर्भातील पत्र आणि अहवालाची प्रत मार्च महिन्याच्या अखेरीस राज्य सरकारला मिळाली. त्यानुसार २४ मार्चला मुख्य सचिव कार्यालयाकडून संबधित सर्व विभागांना ७ एप्रिल रोजी बैठक घेण्यात येणार असल्याचे पत्र पाठविण्यात आले.
परंतु तत्पूर्वीच मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव ४-५ एप्रिल २०२२ रोजी हे दिल्ली दौऱ्यावर गेले. आणि दौऱ्यावरून परतताच लगेच दुसऱ्या दिवशी अर्थात ६ एप्रिललाच मुख्य सचिवांनी सकाळी सकाळी बुलेट ट्रेन प्रकल्पाचा आढावा बैठक घेणार असल्याचे मेसेज सर्व संबधित अधिकाऱ्यांना पाठवित दुपारी बैठक घेवून टाकली. त्यामुळे मुख्य सचिवांनी दिल्ली दौऱ्यानंतर एक दिवस आधीच का बैठक घेतली याची चर्चा मंत्रालयात सुरु झाली असून मुख्य सचिव महाराष्ट्राचे आणि आदेश केंद्राच्या हुकूमाबर काम करतात का असा सवालही काही सनदी अधिकाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
