Breaking News

खाते वाटपात भाजपाच्या तुलनेत शिंदे गटाला काय मिळाले आणि आणखी काय मिळणार? महत्वाची खाती वगळता तोफेच्या तोंडी शिंदे गटाचे मंत्री

हिंदूत्वाच्या मुद्यावरून आणि आम्हाला चांगली खाती पाहिजेत असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेतील ४० आमदारांनी बंडखोरी करत भाजपासोबत जात राज्यात स्थापन केली. उशीराने का होईना राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यानंतर या मंत्र्यांना खात्याचे आज वाटपही करण्यात आले. आज झालेल्या खातेवाटपात राज्याच्या दिशाधोरण आणि क्रिमची ओळखली जाणारी महत्वाची खाती अनेक खाती भाजपाने स्वत:कडे ठेवल्याचे दिसून येत आहे. तर तुलनेने कमी पण सर्वसामान्यांशी निगडीत अनेक खाती शिंदे गटाच्या वाट्याला आल्याचे दिसून येते.

ज्या बंडखोर आमदारांनी हिंदूत्वाच्या मुद्यावर आणि चांगल्या खात्याची अपेक्षा करत एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाणे पसंत केले ते अब्दुल सत्तार. अब्दुल सत्तार यांना कृषी खाते मिळाले आहे. हा विभाग राज्यातील शेतकऱ्यांशी निगडीत आहे. त्यामुळे दर पावसाळ्यात आणि पिक विमा योजनेवरून सतत चर्चेत असतो. तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय आणि पीक कर्ज हे दोन्ही विषय राज्याच्या दृष्टीने संवेदनशील म्हणून ओळखले जातात. त्यांच्याबरोबर मंत्री संजय राठोड यांना अन्न व औषध प्रशासन हे खाते देण्यात आले आहे. हा विभाग फारसा कधी चर्चेत येत नाही. मात्र जेव्हा येतो तेव्हा त्याला नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागते. कोरोना काळात रेमडेसवीर या औषधावरून हा विभाग बऱ्याच वर्षानंतर चर्चेत आला होता.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात संजय राठोड यांच्याकडे वन खाते आले होते. तर अब्दुल सत्तार हे महसूल राज्यमंत्री होते. गतवेळच्या तुलनेत त्यांना थेट बढती मिळत कॅबिनेट मंत्री पद मिळालेले असले तरी त्यांना फारसे करून दाखविण्यासारखे या दोन्ही खात्यांमध्ये नाही.

त्यानंतर शिंदे गटातील पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडेही महाविकास आघाडी सरकारच्या काळात हेच खाते होते. आताही तेच खाते त्यांना मिळाले आहे. मात्र त्यांनी राज्याच्या किती ग्रामीण भागात पाणी पुरवठा योजना पोहोचविली आणि किती ग्रामीण भाग टँकरमुक्त केले हा संशोधनाचा विषय ठरेल.

दादा भुसे यांच्याकडे पूर्वी कृषी हे तुलनेने चांगले खाते महाविकास आघाडी सरकारच्या काळात होते. मात्र आता त्यांच्याकडे बंदरे व खनिकर्म हे खाते देण्यात आले आहे. राज्यात बंदर निर्मितीची स्वतंत्र अशी योजना नाही. जी काही योजना येते ती केंद्र सरकारकडून येते त्याची फक्त अंमलबजावणी करण्याचे काम या खात्याकडे आहे.

संदीपान भुमरे हे ही हिंदूत्व आणि चांगले खाते मिळावे म्हणून शिंदे गटात गेले. मात्र त्यांनाही महाविकास आघाडी सरकारच्या काळात जे खाते होते. तेच खाते अर्थात रोजगार हमी योजना व फलोत्पादन हेच खाते मिळाले आहे. राज्यात रोजगार हमी योजनेची कामे आधीच कमी झालेली आहेत. त्यात केंद्र सरकार या विभागाचा निधीही कमी केला आहे. तर फलोत्पादन आणि त्याच्या निर्यातीसंदर्भात केंद्राच्या धोरणानुसार राज्यात काम करावे लागते. त्यामुळे भुमरे यांनाही वेगळा ठसा दाखविण्याची संधी या खात्यात नाही.

उदय सामंत यांच्याकडे महाविकास आघाडी सरकारच्या काळात उच्च व तंत्रशिक्षण खाते होते. मात्र आता त्यांच्याकडे उद्योग हे खाते सोपविण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्याकडे या खात्याचा पदभार होता. मात्र त्यांच्या काळात येथील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस आली. तर मातोश्रीची बोलणीही खावी लागली. मात्र सध्या कोकणात नाणार प्रकल्प, जिंदाल यांचा ऊर्जा प्रकल्प, नवी एमआयडीसी यामुळे या विभागाचे जरा महत्व जास्त आहे. तसेच हे खाते मलाईदार खाते म्हणूनही ओळखले जाते.

महाविकास आघाडी सरकारमध्ये संधी न मिळालेले आणि शिंदे गटाचे कट्टर समर्थक तानाजी सावंत यांना सार्वजनिक आरोग्य विभाग देण्यात आलेला आहे. राज्यातील मरणासन्न आरोग्य यंत्रणेला ते नव संजीवनी देणार की त्या यंत्रणेला व्हेंटीलेटरवर आणणार याचे काळ आगामी काळच देईल. मात्र हे खाते लोकांशी संबधित असल्याने राज्यात कुठेही खुट्ट झाले तरी तोफेच्या तोंडी त्यांनाच सामोरे जावे लागणार आहे.

शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांना आदित्य ठाकरे यांच्या पर्यटन विभागात रस होता. मात्र त्यांना आता शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग हे खाते देण्यात आले आहे. हे दोन्ही विभाग दैनंदिन पध्दतीने लोकांशी निगडीत असल्याने हा विभाग सांभाळताना एकप्रकारे तारेवरची कसरत असते. त्यामुळे केसरकर हे दोन्ही विभाग कसे सांभाळणार हे पाहणे औस्तुक्याचे ठरेल.

तर थेट उध्दव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करणारे शंभुराज देसाई यांना मलाईदार राज्य उत्पादन शुल्क हे खाते मिळालेले आहे. यापूर्वी महाविकास आघाडीच्या काळात ते गृह राज्यमंत्री ग्रामीण होते. गतवेळच्या तुलनेत त्यांची बढती झाल्याचे दोन्ही बाबतीत दिसून येते.

याशिवाय सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामाजिक न्याय, परिवहन, सार्वजनिक बांधकाम, पणन ही चांगली खाती आहेत. तर माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, मदत व पुर्नवसन, आपत्ती व्यवस्थान, मृद व जलसंधारण, पर्यावरण, अल्पसंख्याक ही खाती बिन महत्वाची खाती म्हणून ओळखली जातात. ही सर्व खाती शिंदे गटाच्या आमदारांना दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी मिळण्याची शक्यता आहे.

Check Also

अखेर मालदीव बरोबरचे संबध दृढ करण्यासाठी चीन घेतोय पुढाकार

साधारणतः दोन महिन्यापूर्वी मालदीव मधील निवडणूका पार पडल्या या निवडणूकीत भारतीय वंशाचे मोहम्मद मोईझु यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *