Breaking News

म्हाडा घेणार ठाण्यात ६५ एकर जमिन तर राज्य सरकार देणार कामगारांची देणी

मुंबई: विशेष प्रतिनिधी

एकाबाजूला मुंबईत म्हाडाच्या मालकी हक्काच्या जमिनींचा साठा जवळपास संपुष्टात येत असल्याने परवडणारी घरे निर्माण करणे जिकरीचे बनत चालले आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने ठाणे येथील रेल्वे स्टेशन लगत असलेल्या मफतलाल उद्योगासाठी दिलेली ६५ एकर जमिन परत घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून या जमिनीवर परवडणाऱ्या दरातील घरांच्या निर्मितीचा प्रकल्प उभारण्याचा विचार म्हाडाकडून करण्यात येत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

मागील काही वर्षापासून मफतलाल कंपनी जवळपास बंदच झाल्याचे दिसून येत आहे. तसेच तेथील जवळपास हजार एक कामगारांची देणीही अद्याप कंपनीने अदा केलेली नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने दिलेली ही जमिन परत घेवून त्यावर परवडणाऱ्या घरांचा प्रकल्प सुरु करण्याचा मानस म्हाडाचा आहे. त्यासाठी  या कामगारांची देणी राज्य सरकारमार्फत देण्याचा विचार सध्या सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

सद्यपरिस्थितीत कामगारांच्या देणीसाठी ४०० ते ४५० कोटी रूपयांची देणी असून मफतलाल कंपनीला त्या जमिनीच्या बदल्यात २५० ते ३०० कोटी रूपये द्यावे लागतील असा अंदाज आहे. त्यानुसार इतकी रक्कम खर्च केल्यास ती जमिन राज्य सरकार अर्थात म्हाडाला परत मिळू शकते अशी अटकळ बांधली जात आहे. ही जमिन मिळाल्यास या ६५ एकर जमिनीवर परवडणाऱ्या घरांचा एक मोठा प्रकल्प सुरु करण्याचा विचार आहे. ही जमिन मिळाल्यास आशिया खंडातील जवळपास सर्वात मोठा प्रकल्प हा ठरेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यासंदर्भात मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे नुकतीच झाली असून मफतलाल कंपनी आणि त्याच्या कामगारांना द्याव्या लागणाऱ्या रकमेचा आढावा घेण्यात आला. याशिवाय ही देणी कशी देता येतील आणि ती जमिन म्हाडाला कशी मिळेल या अनुषंगाने चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

परंतु, मफतलाल या कंपनीकडून सदरची जमिन परत घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उद्योग विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास ही जमिन म्हाडाला मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.

काही महिन्यापूर्वी याच परिसरातील रेमण्ड कंपनीच्या जमिनीला महसूल विभागाने चेंज ऑफ युज आणि त्यामधून जाणाऱ्या रस्त्याला मान्यता दिली. त्यामुळे येथील जमिनीला आता चांगला भाव मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच ठाणे रेल्वे स्टेशन लगत ही जमिन असल्याने त्यास मागणीही मोठ्या प्रमाणावर असल्याचे अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *