Breaking News

मंत्री देशमुखांचा मोठा निर्णय: कोविड रूग्णासोबत एक नातेवाईक आता राहू शकणार सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांनी सतर्क राहावे

मराठी ई-बातम्या टीम

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोविड रूग्ण रूग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याच्यासोबत कोणत्याही नातेवाईकासच नव्हे तर त्याची पत्नी, मुलगा यापैकी कोणालाही रूग्णालयात प्रवेश देण्यात येत नव्हता. मात्र आता राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी या नियमात बदल करत कोविडचा रूग्ण दवाखान्यात दाखल झाल्यानंतर संसर्गाचा जास्त फैलाव होवू नये यासाठी त्या कोविड रूग्णासोबत एक नातेवाईक दवाखान्यात राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.

राज्यातील सध्याची परिस्थिती आणि वैद्यकीय शिक्षण विभाग करत असलेल्या उपाययोजना याबाबतची आढावा बैठक आज वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, उपसचिव प्रकाश सुरवसे, डॉ. संजय बिजवे यांच्यासह शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि अधीक्षक उपस्थित होते.

​ राज्यात कोविड विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढताना सध्या दिसत आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांच्या अधिष्ठातांनी आवश्यक ती पूर्वतयारी करावी.  आवश्यक त्या उपाययोजना करण्यारबरोबरच सज्ज राहून इतर संबंधित विभागांबरोबर समन्वयाने काम करावे, अशा सूचना त्यांनी आज दिल्या.

राज्यातील कोविड संसर्गाने बाधितांची संख्या वाढत आहे, ती आटोक्यात आणण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देत चाचण्यांची संख्या वाढविण्यात यावी. सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांना गृह अलगीकरणात ठेवताना त्यांच्यावर आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून योग्य प्रकारे उपचार आणि देखरेख करण्यात यावी. तसेच रुग्णालयामध्ये रुग्ण दाखल झाल्यानंतर रुग्णाबरोबरच केवळ एकच नातेवाईकाला बरोबर राहण्याची परवानगी देण्यात यावी जेणेकरुन अधिक संसर्ग पसरणार नाही. कोविडची गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात बेडची उपलब्धता व्हावी, यासाठी कोविड रुग्णावर उपचारांसह देखभालीसाठी कोविड सेंटर, कोविड हेल्थ सेंटर व कोविड रुग्णालये सज्ज ठेवण्यात यावीत कोविडचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत असल्याने व्हेंटिलेटर्स, सीटी स्कॅन मशीन, एमआरआय मशीन्स, ऑक्सीजन मशीन्स सर्व सुस्थितीत आहेत किंवा नाही याची सुध्दा चाचपणी तातडीने करुन घ्यावी. नादुरुस्त असल्यास तातडीने दुरुस्त करुन घेण्यात यावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

सर्व अधिष्ठाता आणि अधीक्षकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा करुन ठेवावा. उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या अत्यावश्यक औषधांचा तुटवडा होऊ नये, त्याचा पुरवठा सुरळीत सुरु रहावा याची दक्षता घ्यावी. तसेच आरोग्य यंत्रणेत आवश्यक मनुष्यबळासंदर्भात आढावा घेऊन त्यासंदर्भात नियोजन करावे, अशा सूचना दिल्या. याशिवाय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये येणाऱ्या प्रत्येकाने योग्य प्रकारच्या मास्कचा वापर, सॅनिटायझर याचा वापर करणे आवश्यक असून यासाठी रुग्णालयाने लक्ष द्यावे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये अहोरात्र काम करणारे डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक, पॅरामेडिकल कर्मचारी यांना सुध्दा आता कोविडची लागण होताना दिसत असल्याने यांना बुस्टर डोस तातडीने देण्यासाठी संबंधित अधिष्ठाता यांनी तातडीने प्रयत्न करावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

येणाऱ्या काळात सर्व अधिष्ठाता यांनी सर्व महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सोईसुविधा, ऑक्सिजनची उपलब्धता, व्हेंटिलेटर्सची संख्या यांच्यासह तांत्रिक साहित्य तयार ठेवावे. रुग्णालयात प्रत्यक्ष काम करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना संरक्षणात्मक साधने उपलब्ध करुन द्यावीत. राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी यापुढील काळात आणखी दक्ष राहावे असेही ते यावेळी म्हणाले.

या बैठकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, ऑक्सिजनचा साठा, उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटर्सची संख्या, रेमीडिसीव्हीरची उपलब्धता, रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना, गरज पडल्यास अतिरिक्त डॉक्टर्सची उपलब्धता अशा विविध विषयांचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *