वायव्य पाकिस्तानमध्ये गुरुवारी शिया मुस्लिम नागरिकांना घेऊन जाणाऱ्या प्रवासी वाहनांवर बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केला, किमान ५० लोक ठार झाले आणि २० जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. पोलिसांच्या माहितीनुसार अलीकडच्या काही वर्षांतील या भागातील सर्वात प्राणघातक हल्ला असल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राच्या संकेतस्थळाने पीटीआयच्या हवाल्याने दिली.
अलिकडच्या काही महिन्यांत सुन्नी आणि शिया मुस्लिमांमध्ये प्राणघातक सांप्रदायिक संघर्ष झाला. त्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील कुर्रम जिल्ह्यात अतिरेक्यांनी वाहनांवर हल्ला केला, आतापर्यंत कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
ही वाहने पाराचिनार ते खैबर पख्तुनख्वाची राजधानी पेशावरकडे जात असताना बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या हल्ल्यात आठ महिला आणि पाच मुलांसह ५० लोक ठार तर इतर २० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत असून बहुतेक बळी शिया समुदायाचे असल्याचेही सांगण्यात येत आहे.
एका स्थानिक पत्रकाराने सांगितले की, तालिबानचे वर्चस्व असलेल्या भागात वाहनांवर हल्ला करण्यात आला. ताफ्यात २०० हून अधिक वाहने होती, असे स्थानिक मीडियाच्या वृत्तात म्हटले आहे.
खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन खान गंडापूर यांनी या हल्ल्याचा निषेध केला आणि प्रांतीय कायदा मंत्री, प्रादेशिक खासदार आणि मुख्य सचिवांसह एका शिष्टमंडळाला परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तात्काळ कुर्रमला भेट देण्याचे आदेश दिले. प्रांतातील सर्व रस्त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रांतीय महामार्ग पोलिस युनिट स्थापन करण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना दिले.
गंडापूर यांनी शोकसंतप्त कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त केल्या आणि पीडित कुटुंबांना आर्थिक मदत जाहीर केली. “निर्दोष नागरिकांना लक्ष्य करणे अत्यंत दुःखद आणि निषेधार्ह आहे. या घटनेत सहभागी असलेले लोक कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाहीत,” अशी संवेदनाही मुख्यमंत्री अली जमीन खान यांनी व्यक्त केली.