Breaking News

तहसीलदाराने उघडकीस आणले जमिन हडप करण्याचा प्रकार, मंत्र्याकडून मात्र दबाव

मागील काही वर्षात कोकणात अनेकविध प्रकल्प येत आहेत. या पार्श्वभूमीवर कोकणात जमिनीला सध्या सोन्याचा भाव आलेला आहे. त्यामुळे मिळेल त्या जमिनी थेट गुंतवणूकदारांच्या घशात घालण्याचा प्रकार सध्या सुरु आहे. तर काही जणांकडून जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करून जमिन लाटण्याचे प्रकारही सध्या सुरु झाले आहे. अशीच एक २१० एकर जमिन हडपण्याचा प्रकार स्थानिक तहसीलदाराने उघडकीस आणला. मात्र जमिन हडपायला मदत केली नाही म्हणून राजकीय लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली त्या तहसीलदारावर कारवाईचा बडगा महसूल प्रशासनाने उगारला असून त्यासाठी भाजपाच्या एका मंत्र्याकडून धावाधाव सुरु असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

सावंतवाडी येथील एक २१० एकर जमिन अशीच बनावट कागदपत्रांच्या आधारे एका व्यक्तीने हडप करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही जमिन हडप करण्यापूर्वी संबधित व्यक्तीने त्या तहसीलदाराशी दोस्ती केली. दोस्ती केल्यानंतर संबधित व्यक्तीने त्या तहसीलदारावर दबाव आणि भ्रष्ट मार्गाने सातबाऱ्यावर तो जो सांगेल त्या व्यक्तीचे नाव चढविण्यासाठी आग्रह धरू लागला. परंतु तहसीलदाराने त्या व्यक्तीचा आग्रह धुडकावून लावत असे कृत्य करण्यास नकार दिला.

त्यानंतर संबधित व्यक्तीने या तहसीलदारा विरोधात एका प्रसारमाध्यमाच्या सहाय्याने मोहिमच उघडली. आणि तेथील स्थानिक खासदाराच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पर्यंत हे प्रकरण पोहोचविले. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले. याप्रकरणाची चौकशी सुरु असतानाच आता संबधित तहसीलदारावर कारवाई व्हावी याकरिता त्या संबधित व्यक्तीने आता राज्य मंत्रिमंडळातील भाजपाच्या मंत्र्याच्या माध्यमातून महसूल विभागावर दबाव आणून कारवाई कऱण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. विशेष म्हणजे नुकतेच या भाजपाच्या मंत्र्याने या २१० एकर जमिनीच्या लगत स्वतःही शेकडो एकर जमिन खरेदी केल्याने आता त्यांनाही या २१० एकर जमिनीत रस निर्माण झाल्याची चर्चा सावंतवाडीत सुरु झाली आहे.

तसेच त्या तहसीलदारावर कारवाई करावी या उद्देशाने या भाजपाच्या मंत्र्यांने दोन वेळा महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर यांची दोन वेळा भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र करीर यांच्याशी थेट भेट होऊ शकली नाही.
कोकणातील अशा कुळ कायद्यांतर्गत असलेल्या जमिनी खोटी कागदपत्रे बनवून हडुप करण्याचा प्रकार कोकणात सर्रास सुरु आहे. यामध्ये निशाणबाजीच्या खेळात पंच म्हणून काम करणारा एक व्यक्ती सुत्रधाराच्या भूमिकेत असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे शासनाचा महसूल आणि खाजगी व्यक्तींच्या मालमत्ता अशा प्रकारे हडप करणाऱ्यांना महसूल विभाग पाठीशी घालणार की सजग अधिकाऱ्याच्या मागे उभे राहणार याबाबतचे उत्तर लवकरच मिळेल अशी आशा करायला हरकत नाही.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *