Breaking News

भाजपाही करणार मुख्यमंत्री शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम पण(?) घोटाळ्यातील दलाल आणि संबधितांचे कनेक्शन गोळा करण्याचे काम सुरु

उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील नंबर दोनचे नेते राहिलेले विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार ते मागील आठ वर्षात नगरविकास मंत्री म्हणून काम करत असतानाच्या काळात एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या व्यक्तींनी आणि समर्थकांनी केलेल्या कामांची माहिती गोळा करण्यास सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती पुढे आली असून त्यासाठी भाजपाची खास टीम करेक्ट कामगिरीसाठी कामाला लागल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

एमएमआरडीएच्या मेट्रो-६ प्रकल्पातील १३५ प्रकल्पबाधितांच्या बोगस नावांचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर या प्रकल्पात सहभागी असलेल्या दलालांची शोधमोहिम करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या टीमने सुरु केली आहे. यामध्ये एकनाथ शिंदे समर्थक गटात सध्या सहभागी झालेल्या काही मुंबईतील आमदारांच्या आणि मंत्र्याशी संबधित असल्याची माहिती पुढे येत आहे. याशिवाय ठाणे जिल्ह्यातील विविध महानगरपालिका आणि रिअल इस्टेटमधील काही म्होरक्यांची आणि त्यासाठी मदत करणाऱ्या लोकांची यादी तयार करण्याचे कामही या टीमकडून करण्यात येत आहे.

त्यामध्ये पूर्वी एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यात असलेले मात्र त्यांच्यातील हेवेदाव्यामुळे दुखावलेले अनेक जण सध्या सागर बंगल्याच्या संपर्कात येत असल्याचे दिसून येत असून या दुखावलेल्या व्यक्तींकडूनच अनेकदा सागर बंगल्यावर घोटाळ्याची कागदपत्रे पोहोचविली जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यापूर्वी मीरा-भाईंदरचे तत्कालीन आयुक्त बालाजी खतगांवकर यांनी पालिकेच्या सेवेत असलेल्या एका कंत्राटी इंजिनिअरला कायम करतो असे सांगत शिवसेनेच्या माजी राज्यमंत्र्यांच्या एका पीए मार्फत ७ लाख रूपये घेतल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्या प्रकरणाची लोकायुक्तांसमोर सुनावणी झाली. तरीही बालाजी खतगांवकर यांच्यावर नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी त्याच्यावर कारवाई कऱण्याऐवजी त्याला ताफ्यात समाविष्ट केले. या व अशा अनेक कामगिरींची माहिती भाजपाकडून जमविली जात आहे. तसेच शिंदे गटाचा कधी कार्यक्रम करायचा याची खूणगाठही बांधण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे यासह अनेक महत्वाच्या घोटाळ्यातील आणि व्यक्तींची नावे, समृध्दी महामार्ग घोटाळ्यातील काही कागदपत्रेही भाजपा नेत्याच्या सागर बंगल्यावर पोहोचविली गेले असून त्यातून कमाविण्यात आलेल्या पैशांची माहितीही या टीम कडून गोळा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

बाळासाहेब ठाकरे ह्यात असताना आणि त्यांच्यानंतर उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत २५ वर्षे युतीत राहिल्यानंतर या २५ वर्षात उध्दव ठाकरे आणि त्यांच्या समर्थक आमदार, त्यांच्यासोबत असलेले अधिकारी, कार्यकर्त्ये यांची माहिती गोळा करून ठेवली. ज्यावेळी उध्दव ठाकरे यांनी भाजपाची साथ सोडली त्यावेळी या भाजपाकडून त्या घोटाळ्यांची माहिती उघड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सुरुवातीला प्रताप सरनाईक, संजय राऊत, आनंदराव अडसूळ, भावना गवळी यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर राहुल शेवाळे यांचेही एक प्रकरण मध्यंतरी उघडकीस आले. त्यावेळी शेवाळे यांनी शिंदे गटात सहभागी होणे पसंत केले. त्यामुळे ज्या पध्दतीने उध्दव ठाकरे यांचे कुटुंबिय संशयाच्या भोवऱ्यात आले त्या पध्दतीने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील व्यक्तींची माहिती सागर बंगल्यावर पोहोचली गेली आहे. भविष्यात एकनाथ शिंदे यांचा गटही जर भाजपापासून लांब जायला लागला तर याच घोटाळ्यातील कागदपत्रे बाहेर काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गटाचा करेक्ट कार्यक्रम करण्याची रणनीती सागर बंगल्यावर आखली गेली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आणि प्रशासनावर घट्ट पकड केली असून त्यांच्याच आदेशानुसार सरकार सध्या निर्णय घेत असल्याचे सांगण्यात येत असल्याचेही अन्य एका बड्या अधिकाऱ्याने सांगितले.

Check Also

देशातील तरूणाईच्या रोजगाराबाबत चिंताजनक स्थिती

भारतातील तरुणांच्या रोजगाराची सद्यस्थिती आणि दृष्टीकोन यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या अलीकडील अहवालात देशाच्या व्यापकपणे बोलल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *