Breaking News

देशातल्या पहिल्या सहकार परिषदेला काँग्रेसला निमंत्रण पण पवारांना नाही केंद्रीय सहकारमंत्री अमित शहांचा आजपासून महाराष्ट्र दौरा

मराठी ई-बातम्या टीम
देशातील पहिली सहकार परिषद पहिले केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत अहमदनगर येथील प्रवरानगर लोणी येथे देशातील पहिली सहकार परिषद होत आहे. या परिषदेला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, चंद्रकांत पाटील, राज्य सहकारी बँकेचे विद्याधर अनास्कर आदी उपस्थित राहणार आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना या सहकार परिषदेसाठी निमंत्रणच देण्यात आले नसल्याची माहिती पुढे आली आहे.
माजी कृषीमंत्री व भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणीत सहकार परिषद व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी अमित शहा शनिवारी सकाळी १० वाजता शिर्डी विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर ते शिर्डीतील साईबाबाचे दर्शन घेऊन सकाळी ११ वाजता प्रवरानगरमध्ये सहकार परिषदेत सहभागी होतील. यानंतर शेतकरी मेळावा आयोजित केला असून, अमित शाह यात मार्गदर्शन करतील. दुपारी १ नंतर विखे पाटील यांच्या निवासस्थानी भोजन घेणार आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात विखे- पाटील यांचे मोठे राजकीय प्रस्थ आहे. देशाचे पहिले सहकार मंत्री शहा यांना आपल्या मतदारसंघात आणून ताकद दाखविण्यासाठी त्यांनी सहकार परिषदेचे आयोजन केल्याचे मानले जाते. विखेंनी या परिषदेला भाजपाच्या सर्व प्रमुख नेत्यांना पाचारण केले. मात्र, राजकीय विरोधक मानल्या गेलेल्या पवारांना विखेंनी निमंत्रितच केले नाही. विखेंनी एकीकडे पवारांना निमंत्रित केले नाही पण शिष्टाचाराचा भाग म्हणून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांना सहकार परिषदेसाठी निमंत्रित केले. मात्र, पवारांना निमंत्रण नसल्याने बाळासाहेब पाटील यांच्यासह कदम यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमाचे कारण सांगून या परिषदेपासून दूर राहणे पसंत केले.
केंद्र सरकारने सहा महिन्यापूर्वी केंद्रीय सहकार खाते तयार केले. हे खाते अमित शहा यांनी स्वत:कडे ठेवले. अमित शहा हे स्वत: सहकार क्षेत्राशी संबंधित आहेत. सोबतच सहकार खात्याची केंद्रीय पातळीवर धोरणे ठरविण्याबाबत मंथन सुरू आहे. यासाठी अमित शहा मागील महिन्यात शरद पवार अध्यक्ष असलेल्या पुण्यातील वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटमध्ये भेटीसाठी निमंत्रण दिले होते. मात्र, त्यानंतर हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. आता शहा लोणीतील सहकार परिषदेला हजेरी लावत आहेत. तसेच वैकुंठभाई मेहता संस्थेच्या कार्यक्रमात हजेरी लावतील. त्यामुळे रविवारी ऐनवेळी मांजरीकडे शहा यांची पावले वळणार का याकडे लक्ष असेल.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *