Breaking News

सर्व विद्यापीठांच्या परिक्षा ऑनलाईन होणार? मंत्री उदय सामंत यांच्याकडून आज घोषणा होण्याची शक्यता

मराठी ई-बातम्या टीम

मागील काही दिवसांपासून विशेषत: मुंबईसह उपनगरात आणि राज्यात कोरोना व ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर या दोन्ही विषाणूचा संसर्ग टाळण्याच्या उद्देशाने राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परिक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्याचा निर्णय जवळपास झाला असून तशी तयारीही सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूनीही दाखविली आहे. यासंदर्भात आज दिवसभरात उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून जाहीर करण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे काल मुंबईतील पहिली ते अकरावी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तर पुण्यातील पहिली ते आठवीपर्यतच्या शाळाही बंद करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला. यापार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आगामी परिक्षा आणि तास कसे घ्यायचे याविषयीची भूमिका ठरविण्यासाठी काल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची एक बैठक घेतली. या बैठकीला सर्वच विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.

अनेक विद्यार्थ्यांचे पहिले संपून दुसरे सेमिस्टर सुरु आले आहे. ज्या विद्यार्थ्यांचे सेमिस्टर संपले आहे त्यांच्या परिक्षा घेणे आवश्यक आहे. त्यामुळे जर ऑफलाईन परिक्षा घेतल्या तर प्रत्येक वर्गात गर्दी होण्याची शक्यता आहे. आणि या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑफलाईन परिक्षा घेण्याऐवजी ती ऑनलाईन घेण्याची तयारी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी दाखविली आहे. त्याचबरोबर मागील वेळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परिक्षा घेताना काही अडचणींचा सामना करावा लागला होता. परंतु आता त्या अडचणी दूर करण्यात आल्याची माहिती कुलगुरूंनी या बैठकीत दिली.

तसेच मार्च आणि एप्रिलमध्ये कोरोना आणि ओमायक्रॉनच्या केसेस मोठ्या प्रमाणावर वाढण्याचा अंदाज आहे. त्या कालावधीत विलगीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर इमारती लागणार आहेत. त्यासाठी पुन्हा एकदा महाविद्यालयांची वसतिगृहे राज्य सरकार ताब्यात घेण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना वसतिगृहाचा पर्याय दिल्यास वसतिगृहे कोरोना हॉटस्पॉट ठरू शकतील. त्यामुळे सध्या प्रत्येक महाविद्यालयांनी ऑनलाईन शिक्षणावर आणि परिक्षांवर भर देवून वसतिगृहातून विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पाठवून ऑनलॉईनच तासिका घ्याव्यात अशा सूचनाही या बैठकीत करण्यात आल्या. त्यास सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनीही तयारी दर्शविल्याचे सांगण्यात येत आहे.

यासंदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता असून आज दिवसभरात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे त्याबाबतची अधिकृत घोषणा करणार आहेत.

Check Also

सरत्या वर्षातील न्युजमेकर्स अर्थात महत्वाच्या घटना माहित आहेत का? जाणून घ्या त्याबद्दल २०२१ वर्षातील या लोकांनी देशातील राजकिय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रासमोर नवं आदर्श ठेवला

मराठी ई-बातम्या टीम २०२१ वर्ष संपायला काही तासांचा अवधी शिल्लक असून त्यानंतर २०२२ या नव्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *