Breaking News

राज्यात २ दिवसांची टोलमाफी अमित शाहंसाठी की आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या शिष्यगणांसाठी ? महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम १६ एप्रिलला पण टोल माफी दोन दिवसांची, गौडबंगाल काय

मागील ८ वर्षापासून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार आहे. मात्र परंतु श्रीलंका देश दिवाळखोरीत निघाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने मोफत सवलतींवरून आपल्या प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांवर सातत्याने टीका करत असतात. मात्र आता एकप्रकारे भाजपाच्याच सहभागाने महाराष्ट्रात स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या कार्यक्रमास दस्तुरखुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उपस्थित राहत असताना त्यांच्याच सरकारकडून दोन दिवसांची राज्यातील सर्व टोल नाक्यांवर टोल माफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने मोफत सवलतींवर पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला त्यांच्याच सरकारने हरताळ फासला की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.

राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी मुंबईत येवू आणि जाऊ इच्छिणाऱ्या वाहनांसाठी तब्बल दोन दिवसांची टोलमाफी देण्याचा निर्णय राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या एक दिवस आधीपासूनच ही टोल माफी देण्यात येत असल्याने या निर्णया मागचे गौडबंगाल नेमके काय असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे सामाजिक काम मोठे आहे. तसेच त्यांचा शिष्यगण हा प्रामुख्याने कोकणात असल्याचे सांगण्यात येते. तसेच महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सांस्कृतिक विभागाक़डून प्रदान करण्यात येतो. मात्र या कार्यक्रमासाठी कोकण आणि मुंबईच्या आजपासूच्या परिसरातील नागरिकांना टोल माफी देण्याऐवजी संपूर्ण महाराष्ट्रात टोलमाफी देण्यामागचा उद्देश काय असा सवालही आता उपस्थित करण्यात येत आहे.

यापूर्वीच राज्यातील विविध राज्य रस्ते महामार्गावर आणि राष्ट्रीय महामार्गावर टोलचा झोल आधीच होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यातच कोणत्या टोल नाक्यावरून नेमकी किती वाहने जातात आणि त्यातून किती रूपयांचे उत्पन्न सदरच्या टोल नाक्याच्या ठेकेदारास मिळते आणि राज्य सरकारला तितकेच उत्पन्नाचे आकडे दाखविले जाते का हा संशोधनाचा विषय नेहमीच ठरला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळाच अनागोंदी कारभार असताना आता महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी टोल माफी का देण्यात येत आहे. याचा अर्थ उलघडायला तयार नाही.

राज्याच्या इतिहासात अशा पुरस्कार सोहळ्यासाठी पहिल्यादाच टोल माफी देण्यात आल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारच्या नियोजित कार्यक्रमानुसार २०२२ सालचा महाराष्ट्र भूषण वितरणाचा कार्यक्रम नवी मुंबईतील येथील खारघर येथे होणार आहे. हा पुरस्कार डॉ.श्री. दत्तात्रेय नारायण उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री आणि आमदार उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वतः आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा मोठा शिष्यगणही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मात्र धर्माधिकारी यांचे शिष्यगण हे शक्यतो कोणताही सरकारी सवलत न घेता पदरमोड खर्चाने कार्यक्रमास उपस्थित रहात असल्याची चर्चा सर्वत्र आहे. मात्र या सोहळ्यासाठी अमित शाह हे आवर्जून उपस्थित राहणार असल्याने भाजपा कार्यकर्त्यांना मुंबई उपनगराच्या काना-कोपऱ्यातून खारघरला हजर राहता यावे यासाठी ही टोलमाफी देण्यात आली की काय अशी शंका मंत्रालयातील कर्मचारी- अधिकाऱ्यांकडून विचारण्यात येत आहे.

या टोल माफीची सुरुवात १४ एप्रिलच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून सुरु होणार असून १६ तारखेच्या ११.५९ मिनिटापर्यंत ही टोलमाफी राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत प्रतिदिन किमान ७ लाख येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना टोल माफी मिळणार आहे. त्यामुळे या टोलमाफीचा निर्णय कोणासाठी घेतला याचे कोडे उलगडायला तयार नाही.

हाच तो राज्यभरातील टोलनाक्यासाठीचा टोलमाफीचा आदेशः-

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *