पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसच्या विरोधातील रोष काही आता लपून राहिला नाही. मात्र आता संसदेच्या परिसरात असलेल्या तीन मुर्ती परिसरातील नेहरूंचे निवासस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेहरू संग्रहालयाचे नामांतर करण्यात येणार असून या नामांतरीत इमारतीचे उद्घाटन १४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
दिल्लीत गेलेल्या कोणताही पर्यटक देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचे निवासस्थान म्हणून ओळखले जाणारे तीन मुर्ती परिसरातील नेहरू संग्रहालयाला आवर्जून भेट देतो. तसेच काँग्रेसच्या अनेक पंतप्रधानांनी पदाची शपथ घेतल्यानंतर या ठिकाणाला भेटीही दिल्या आहेत. आता या वास्तूचे नामकरण नवं ‘पंतप्रधान संग्रहालया’ असे करण्यात आले असून त्याचा रितसर उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत खासदारांना मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान संग्रहालयाला आवर्जून भेट देण्याची सूचनाही केली. सर्व माजी पंतप्रधानांच्या देशासाठी दिलेल्या योगदानाचा सन्मान करणारा भाजपा हा एकमेव पक्ष आहे. आतापर्यंत भाजपाचा केवळ एकच पंतप्रधान झाला. बाकी तर त्यांचेच होते. माजी पंतप्रधान कोणत्याही पक्षाचे असोत, पक्षीय राजकारण बाजूला ठेवून त्यांचा आदर करायला हवा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या खासदारांना सांगितले. या बैठकीला भाजपा खासदारांसह भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आदी प्रमुख नेते उपस्थित होते.
नव्या पंतप्रधान संग्रहालयात दुर्मीळ फोटो, भाषणे, व्हिडीओ क्लिप, वृत्तपक्षांची कात्रणे, मुलाखती, माजी पंतप्रधानांचे आणि त्यांच्यावरील मूळ लेखन असा ठेवा आहे. यात माजी पंतप्रधानांच्या कुटुंबीयांकडून गोळा करण्यात आलेल्या त्यांच्या खासगी वस्तूंचाही समावेश आहे. यात अनेक छायाचित्र, पत्र व्यवहार, पेन, आदी वस्तू आहेत.
या प्रकल्पाला २०१८ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. त्यासाठी २७० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. हा प्रकल्प २०२० मध्ये तयार होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनामुळे संग्रहालयाचं बांधकाम रखडलं होते.
दरम्यान, तीन मूर्ती भवन परिसर आणि नेहरू संग्रहालयाचं स्वरुप बदलण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. तसेच या प्रकल्पाही काँग्रेसचा विरोध आहे. नव्या पंतप्रधान संग्रहालयामुळे नेहरू संग्रहालयाचं महत्व कमी करण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोपही काँग्रेसकडून करण्यात आला.
