Breaking News

मुखपट्टीवरून अजित पवारांनी सभागृहातच सर्वपक्षांच्या आमदारांना झापले रात्रीच्या लॉकडाऊनला गांभीर्याने विचार

मराठी ई-बातम्या टीम

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी प्रसिध्द आहेत. भले की ते एखाद्या सभेत बोलत असतील किंवा पक्षाच्या कार्यक्रमात जे मनात आहे ते स्पष्ट बोलून मोकळे होतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे साऱ्यांचेच लक्ष असते. अजित पवारांच्या याच स्वभाव वैशिष्ट्याचा अनुभव राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांबरोबर सर्वच पक्षिय आमदारांना आला.

राज्यातील वाढत्या ओमायक्रॉनच्या संख्येवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज काळजी व्यक्त करत विधानसभेतच मुखपट्टी न लावणाऱ्या आमदारांना झापल्याचे चित्र आज पाह्यला मिळाले.

ओमयक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणुने जगभर नवे संकट निर्माण केले आहे. आपल्याकडे ओमायक्रॉनचे रुग्ण सर्वत्र सापडत आहे. त्या पार्श्वभूमीवर विधिमंडळात आमदारच जर मुखपट्टी लावत नसतील तर त्यांना सदनाच्या बाहेर काढा, अशी थेट विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अध्यक्षांना केली. तसेच रात्रीचा लॉकडाऊन लावण्यावर गांभिर्याने विचार सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.  विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर अजित पवार उठले आणि त्यांनी मुखपट्टी न लावण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. पवार म्हणाले, ओमायक्रॉन संसर्ग सर्वत्र वाढत आहे. युरोपात किमान ५ लाख नागरिक ओमायक्रॉनच्या लाटेत मृत्युमुखी पडतील, असा जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे. पंतप्रधान नव्या विषाणुने मोठ्या चिंतेत आहेत. ओमायक्रॉनपेक्षा अधिक घातक असा नवा कोरोना विषाणू आला आहे, असे  नुकतेच माझ्या माहितीत आले. आपल्याकडे ओमायक्रॉन रुग्ण सर्वत्र आढळू लागले आहेत.

अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी असणारे आमदार मुखपट्टी लावत नसतील तर नागरिकांना काय सांगायचे. जे आमदार सदनात मुखपट्टी लावत नाहीत, त्यांना अध्यक्षांनी बाहेर काढले पाहिजे. याची नोंद अध्यक्षांनी घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

त्यानंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सदनाला तशी सूचना केली. फारच त्रास होत असेल तर बोलताना मुखपट्टी काढली तर चालेल. मात्र मुखपट्टी प्रत्येक सदस्याने लावली पाहिजे, अशी तंबी जाधव यांनी दिली. त्यानंतर लागलीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसह सर्व पक्षिय आमदारांनी खिशात ठेवलेली, गळ्याला लावलेली मुखपट्टी पटापट तोंडावर चढवली.

Check Also

अध्यक्ष निवडणूकीसाठी विधानसभा नियम समितीने नेमके कोणते केले बदल समितीने सुचविलेल्या नियमातील बदलास विधानसभेत मिळाली मंजूरी

मराठी ई-बातम्या टीम हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणूक नियमावलीतील दुरूस्तीवरून सत्ताधारी महाविकास …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *