Breaking News

राष्ट्रपतींच्या हस्ते या खेळाडूंना खेलरत्न पुरस्कारांचे वितरण दिपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार, स्वप्निल कुसळे, सचिन खिल्लारी आणि मुरलीकांत पेटकर यांना अर्जुन पुरस्कार प्रदान

राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडप येथे आयोजित भव्य सोहळ्यात २०२४ च्या मेजर ध्यानचंद खेलरत्न, अर्जुन पुरस्कार आणि इतर राष्ट्रीय खेळ पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज करण्यात आले. पार पडलेल्या या सोहळ्यात देशभरातील अनेक खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांचा आज गौरव करण्यात आला.

यामध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन ब्रॉन्झ मेडल जिंकणारी शूटर मनु भाकर, शतरंज विश्व चॅम्पियन डी गुकेश, हॉकी कर्णधार हरमनप्रीत सिंह आणि पॅरा एथलीट प्रवीण कुमार यांना सर्वोच्च खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्राच्या खेळाडूंचा सन्मान

राष्ट्रीय खेळ पुरस्कारांत महाराष्ट्रातील चार खेळाडूंचा विशेष सन्मान करण्यात आला. यंदा पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये शूटिंगमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या कोल्हापूरच्या स्वप्निल कुसळे यांना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले. रेल्वे कर्मचारी असलेल्या स्वप्निलने नेमबाजीच्या क्षेत्रात महाराष्ट्राला खाशाबा जाधवांनंतर ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. त्याचबरोबर स्वप्निलच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पॅरालिम्पिक २०२४ मध्ये गोळाफेक प्रकारात कांस्यपदक मिळवणाऱ्या सचिन सर्जेराव खिलारी यालाही अर्जुन पुरस्कार देण्यात आला. ४० वर्षांनी शॉटपुट प्रकारात पदक जिंकणारा सचिन हा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. तसेच, महाराष्ट्राचे पॅरा जलतरणपटू मुरलीकांत पेटकर यांनाही अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *