Breaking News

मुंबईसह राज्यासाठी खुषखबर ! १५ ऑगस्टपासून टप्प्याटप्याने निर्बंध शिथिल होणार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची घोषणा

मुंबई: विशेष प्रतिनिधी

मुंबई आणि उपनगरात राहणाऱ्यासाठी अखेर मुंबई लोकल प्रवास आता करता येणार असून राज्यातील सर्व निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकलप्रवास खुला करण्यात येत असून दोन डोस घेवून १४ दिवस झालेल्यांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करत त्यासाठी एका अॅपवर किंवा ऑफलाईन पध्दतीने नोंदणी करून पास काढलेला असेल तरच हा प्रवास करता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सर्वसामान्य नागरीकांबरोबरच, व्यापारी, राजकिय पक्ष आणि मुंबई उच्च न्यायालयाने निर्बंध शिथिल करण्याच्या मागणीवरून दिलेल्या दट्यानंतर अखेर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत निर्बंधात शिथिलता टप्प्याटप्प्याने देणार असल्याची घोषणा केली.

याशिवाय हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स, मंदिरे-धार्मिकस्थळे आदी गोष्टींबाबत उद्या सोमवारी टास्क फोर्सची बैठक झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असून यासाठी आणखी आठ ते १० दिवस लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

परंतु, लस घेतलेली असली तरी आपल्याला कोविड जाईपर्यत काळजी घ्यावीच लागणार असून तिसरी लाट येवू नये. मात्र जर आलीच तर वाढत्या रूग्णसंख्येचा प्रसार पाहून पुन्हा राज्यात लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचा इशारा देत त्यासाठी मी कोविडपासून मुक्तता मिळविणारच हा माझा जन्मसिध्द हक्क असल्याची घोषणा करत या पध्दतीनेच आपल्याला कोविडवर मात करावी लागणार असल्याचा ठाम निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कोविड काही जात नसल्याने आपण लसीकरणाचा वेग वाढवित असून लसींचा पुरवठाही हळू हळू वाढत आहे. जसजशा लसींचा पुरवठा वाढेल तसतशा लसीकरणाचा वेगही वाढविणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, लसीकरण एका ठराविक टप्यापर्यत जोपर्यत होणार नाही. तोपर्यत आपल्याला काही गोष्टी पाळाव्याच लागणार आहेत. ३ री लाट आली तर काय करायचे याचा आढावा घेतोय. सद्यपरिस्थितीत ऑक्सीजनचे १ लाख ३० हजार बेड, आयसीयुचे ३४ हजार आणि व्हेटिलेटर ७ हजार बेड उपलब्ध आहेत. विदर्भात थोडीशी वाढ दिसत होती. पण त्या विषाणूचा अवतार बदलेला असल्याने त्याची माहिती कळेपर्यत या कोरोना व्हेरियंटने जगभरात व्यापून गेला. त्यामुळे विषाणूचा बदलेला अवतार तात्काळ कळावा यासाठी मुंबई महापालिकेच्यावतीने पहिली जनुकिय सिंड्रोम लॅब सुरु करण्यात आली असून या लॅबच्या माध्यमातून आपल्याला विषाणूचा बदलेला अवतार समजून घ्यायला वेळ लागणार नाही.

मागील आठवड्यात काही जिल्ह्यांमध्ये दुकानांच्या वेळा वाढवून दिल्या, बंधन शिथिल करण्यात आली. सध्या राज्यात कोरोनाची संमिश्र परिस्थिती आहे. त्यामुळे काही जिल्ह्यामध्ये काळजीची परिस्थिती आहे. यामध्ये पूरग्रस्त रत्नागिरी, रायगड, सांगली, सातारा, कोल्हापूरसह ६ जिल्हे आहेत. तेथे कोरोनाला अटकाव करण्यासाठी चाचण्याच्या सुविधा वाढवित आहोत, खाटांची संख्याही वाढविण्यात आली आहे. त्याचबरोबर  पुणे, अ.नगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदूर्ग, बीड मध्ये काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी सर्वच कार्यालयांनी कामाच्या वेळांची विभागणी करावी असे आवाहन करत ज्यांना वर्क फ्रॉम होम करणे शक्य आहे. त्यांनी त्या पध्दतीने काम करावे आणि इतरांनी कामांच्या वेळेत बदल करावा जेणेकरून गर्दी टाळली जाईल असेही ते म्हणाले.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; देहविक्रय हा ही “एक व्यवसाय” देहविक्रय करणाऱ्या महिलेवर कारवाईचा अधिकार नाही

वर्षानुवर्षे समाजातील देहविक्रय करणाऱ्या महिलांबाबत सातत्याने तिरस्काराच्या भावनेने बघितले जात आहे. तसेच हा व्यवसाय करणाऱ्यांना …

Leave a Reply

Your email address will not be published.