Breaking News

मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना ठणकावले, शिखंडीच्या आडून वार करणे बंद करा, मला टाका तुरुंगात मेहुण्याच्या मालमत्ता जप्तीवरून आणि पत्नीची मालमत्ता उघडकीस आणण्यावरून विरोधकांवर निशाणा

मागील काही दिवसांपासून भाजपा नेत्यांकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कुटुंबियाच्या मालमत्तांवरून सातत्याने निशाणा साधला जात आहे. तसेच मालमत्तांवर ईडीकडून ज्या काही जप्तीच्या कारवाया करण्यात येत आहेत. त्यावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज विरोधकांना सडेतोड उत्तर देत, जे काही आरोप करायचे आहेत ते आरोप माझ्यावर करा, चला मी तुमच्या सोबत येतो मला तुरुंगात टाका, मी जातो तुरुंगात पण माझ्या कुटुंबियांवर कशाला आरोप करता, आम्ही कधी काढलेय का तुमच्या कुटुंबियांचे असा खोचक सवाल करत माझ्या शिवसैनिकांची जबाबदारी मी घेतो चला मी येतो तुमच्या सोबत असे आव्हान विरोधकांना दिले.

विधानसभेत अर्थसंकल्पिय अधिवेशनातील विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.

तुम्हाला सत्ता हवी आहे म्हणून तुम्ही जी काही माझ्या कुटुंबियांची बदनामी करत आहात ती करण्याबदद्ल मला काही म्हणायचे नाही. पण कोणत्या थराला जावून करायची याला काही सीमा आहे की नाही असा सवाल करत अशी बदनामी करू नका असा इशाराही त्यांनी यावेळी देत मी स्वतःला कृष्ण म्हणणार नाही. हवे तर देवकीचा पहिल्या लहान मुलांमधील मुलगा असेन मी. मला तुरुंगात जाण्याचे भय कधी राहीले नाही. पण कंसाचा वध तुरुंगात जन्माला आलेल्या मुलानेच केला असा गर्भित इशाराही त्यांनी दिला.

महाभारतात शिखंडीला मध्ये घालून कर्णाचा वध केला तसे काही जण करत असतील. पण मला हल्ली कळतच नाही कोण शिखंडी आहे आणि कोण मध्यस्थ आहे. तसेच आज काल कोण केंद्रीय यंत्रणांचे दलाल झालेत की प्रवक्ते झालेत काय कळायला मार्ग नाही. कोणी तरी म्हणतं अनिल देशमुख तुरुंगात जाणार अनिल देशमुख गेले तुरुंगात. त्यामुळे आता नवाब मलिक यांच्यावरून रोज कोणी तरी म्हणतं होते. तुम्ही त्यांचा दाऊदशी संबध असल्याच्या कारणावरून राजीनामा मागताय. पूर्वी तुम्ही राम मंदीराच्या नावावर मतं मागितली आता काय दाऊदच्या नावावर मते मागणार आहात का? असा खोचक सवालही त्यांनी यावेळी केला.

मंत्री अनिल परब यांच्या घराचे अनधिकृत बांधकाम झाले म्हणून ते तुम्ही पाडले. हरकत नाही मग सगळ्यांचीच अनधिकृत बांधकाम पाडा ना, असा सूचक इशारा देत १९९३ च्या दंगलीच हिंदूना वाचविण्यासाठी हा अनिल परब रस्त्यावर गेला होता. तेव्हा पोलिसांनी आणि लष्कराने त्याला लोळवस्तोवर मारला होता. त्याच्या घरावर पाडकामाची कारवाई करता असा सवाल करत महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमाप्रश्नावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या आंदोलन करत होत्या. त्यावेळी त्यांच्यावर कर्नाटक पोलिसांनी केलेल्या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला खोच पडली त्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करता असा उपरोधिक सवालही त्यांनी विरोधकांना केला.

त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बहिणाबाई चौधरी यांची माणसा माणसा तुला हाव तरी किती, तुझे इतभर पोट त्यात मावणार किती, माणसा माणसा तुझी नियत किती खोटी तुझ्या परीस जनावर बरं गोठ्यातली, माणसा माणसा तु माणूस कधी होणार या चारोळींचे वाचन करून आपले भाषण संपविले.

Check Also

सुभाषचंद्र बोस यांच्या मुलीची मागणी, नेताजींच्या यांच्या अस्थी भारतात आणा जपान मध्ये असलेल्या अस्थी भारतात आणून गंगेत विसर्जन करा

आज देशभरात ७५ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात येत आहे. सकाळी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published.