Breaking News

#BreakTheChain आनंदाची बातमी: टप्प्याटप्प्याने निर्बंध उठविणार राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी

कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी आणि बाधित रूग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी राज्यात १४ एप्रिल २०२१ रोजीच्या रात्री ८ वाजल्यापासून राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. येत्या १ जून २०२१ रोजी त्यास दिड महिने पूर्ण होत असून १ जूनपासून राज्यातील लॉकडाऊनचे निर्बंध टप्प्या टप्प्याने उठविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले असून तशा सूचनाही मदत व पुर्नवसन विभागास दिल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकान्वये दिली. रुग्णवाढीचा दर हळूहळू कमी होत असला तरी १० ते १५ जिल्ह्यांत रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, शिवाय म्युकरचा धोकाही वाढतो आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्या उच्चांकी पातळीवर पोहचली होती. आजची राज्यातील रुग्ण संख्या कमी कमी होऊन सप्टेंबरच्या आकडेवारी एवढी झाली आहे. मात्र आपल्याला अजून काळजी घेणे भाग आहे. एकदम लॉकडाऊन न उठवता तो १ जूननंतर वाढवून मग हळूहळू टप्प्याटप्प्याने काही आवश्यक बाबतीत निर्बंध कमी करावे यावर मंत्रिमंडळात चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यादृष्टीने विभागास निर्देश दिल्याचेही सांगण्यात आले.

साधारणत जानेवारी २०२१ पासून राज्यातील कोरोना बाधित रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्यास सुरुवात झाली. तसेच बाधित रूग्णांच्या संख्येने ८५ हजाराचा आकडाही पार केला. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण येवून मृतकांचे प्रमाण वाढेल की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे राज्यात १४ एप्रिल रोजीच्या संध्याकाळपासून BreakThrChain अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले. अखेर मागील काही दिवसात बाधित रूग्णांच्या संख्येत घट होवून ही संख्या २० ते २५ हजारापर्यत खाली आल्याने लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ करत दुसऱ्याबाजूला निर्बंधात शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला.

या अनुषंगाने आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चाही करण्यात आली. यावेळी मागील काही दिवसांपासून व्यापारी वर्गाकडूनही निर्बंधात शिथिलता द्यावी अशी मागणी सातत्याने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येत होती. तसेच अनेकांच्या रोजगारावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत होते. यापार्श्वभूमीवर टप्याटप्प्याने शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Check Also

केंद्रीय निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदी यांना दिली आचारसंहितेतून सूट?

एखाद्या मतदारसंघातील किंवा राज्यातील विधिमंडळ अथवा संसदेच्या लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर झाल्यानंतर त्या त्या राज्याच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *