Breaking News

सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री पुन्हा असामान्य ? सीएमओत जाण्यासाठी मंत्रालयाची वेळ

साधारणत: तीन महिन्यापूर्वी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थानापन्न झाले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे सातत्याने हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहेत असे सांगत कोणीतीही अडचण घेऊन येणाऱ्या व्यक्तीच्या अडी-अडचणी ऐकून घेत आणि त्यावर तात्काळ फोन करून पुढील आदेश देत असत. मात्र आता मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची वाढती गर्दी पाहता या गर्दीला आवरण्यासाठी मंत्रालय प्रशासनाने मुख्यमंत्री कार्यालयात अर्थात सीएमओमध्ये येणाऱ्या सर्वसामान्य नागरीकांवर मंत्रालयाप्रमाणे वेळेचे बंधन घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याप्रमाणे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ही असामान्य होत आहेत की काय? अशी चर्चा सुरु झाली आहे.

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्याच्या विविध भागातून नागरीक त्यांच्या समस्या घेवून मंत्रालयात येत आहेत. मात्र अनेक वेळा मुख्यमंत्री मंत्रालयात कधी येतात आणि कधी जातात याची वेळपत्रक नागरीकांपर्यत येत नाही. सर्वसामान्य नागरीकांना मंत्रालयात प्रवेश करण्यासाठीची वेळ दुपारी २ वाजल्यापासूनची आहे. तरीही आपले लवकर व्हावे आणि पुन्हा संध्याकाळी परतीची गाडी धरावी या उद्देशाने अनेक नागरिक सकाळीच कोणाच्या तरी ओळखीने मंत्रालयात पोहोचतात. मात्र तेथून पुढे ते सहाव्या मजल्यावर गेले की त्या नागरिकांना दुपारी २ नंतर या असे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांकडून सांगण्यात येते. तसेच मुख्यमंत्री कार्यालयात प्रवेश करण्यासाठी असलेली सर्व दरवाजेही बंद करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे.

त्यामुळे एखाद्याने सकाळीच जरी मंत्रालयात प्रवेश मिळविला तरी त्या व्यक्तीला मुख्यमंत्री कार्यालयात जाता येत नाही. बरं हीच परिस्थिती मंत्रालयात किंवा एखाद्या गोष्टीची माहिती घेण्यासाठी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मुख्यमंत्री कार्यालयात जाण्याचा प्रयत्न करतात तर त्यांनाही आतमध्ये प्रवेश नाकारण्यात येतो. याबाबत पोलिसांना विचारले तर मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी यांचे नाव सांगण्यात येते. बरं त्यांना भेटायचे म्हटले तरी ते ही मुख्यमंत्री कार्यालयात बसतात. त्यामुळे नागरीकांची मोठी अडचण होत आहे.

बरं या गोष्टी करत असताना मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव काय किंवा प्रशासन काय सर्वसामान्य नागरीकांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वेळेचे योग्य नियोजन करत नसल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरु आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वसामान्य जनतेसाठी दर सोमवारी किंवा आठवड्यातील एक दिवस जनता दरबार भरवित असत आणि त्या दरबारात सर्वसामान्य नागरिकांचे अर्ज स्विकारणे, त्यांचे गाऱ्हाणे ऐकणे आणि त्याची तड लावण्यासाठी संबधित अधिकारी व्यक्तीकडे पाठविणे आदी गोष्टी केल्या जात होत्या. त्यामुळे त्या काळात देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी लोक येत असत आणि समाधानाने घरीही जात असत. मात्र विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत सध्या त्यांना प्रशासनाच्या बंधनात अडकाविण्याचे काम मंत्रालयातच सुरु झाले आहे की काय? तसेच सामान्यांचे मुख्यमंत्री असामान्य तर होत नाही ना? असा सवाल आता मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *