Breaking News

बाबरी विध्वंसाआडून चंद्रकांत पाटील यांचा नेमका कोणावर निशाणा, ‘शिंदे, फडणवीस कि ठाकरे ?’ देवेंद्र फडणवीसांची १८ दिवसांची जेलवारी आणि चंद्रकांत पाटील यांना अटक नाही

शिवसेनेतील फूटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आणि १३ खासदार गेले. त्यानंतर राज्यात भाजपासोबतच्या सरकारची धुराही एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. या सगळ्या परिस्थितीत जनमत आज स्थितीला मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या बाजूने असल्याचे दिसून येत नाही. या सरकारबद्दल अद्यापही जनतेच्या मनात चांगली भावना नसल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. त्याच्या उलट पक्षीय राजकारणात उध्दव ठाकरे हे एकटे पडले असतानाही त्यांच्या मागे जनमताचा कौल असल्याचे अद्याप तरी दिसून येत आहे. त्यामुळे पडद्या आडून भाजपाच एकप्रकारे शिंदे गटाच्या विरोधात राजकिय वातावरण पेटवून त्याचा अप्रत्यक्ष फायदा ठाकरे गटाला कसा होईल यावर सध्या भाजपाचा भर असल्याची चर्चा सुरु आहे. तर दुसऱ्याबाजूला भाजपामध्ये देवेंद्र फडणवीस यांनाच आता खिंडीत गाठण्याचे प्रयत्न त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांकडून होत असल्याने माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या बाबरी प्रकरणी केलेल्या वक्तव्यामुळे नेमका राजकिय निशाणा कोणावर अशी चर्चा आता राजकिय वर्तुळात रंगू लागली आहे.

काही महिन्यांपूर्वी भाजपाच्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी विध्वंस प्रकरणी आपण १८ दिवस उत्तर प्रदेशातील बदायुच्या तुरूंगात काढल्याची आठवण सांगितली. तसेच त्यासाठी माजी शिवसैनिक अतुल सावे यांच्या वडीलांचा संदर्भ द्यायला देवेंद्र फडणवीस विसरले नाहीत.

त्यानंतर जवळपास तीन ते चार महिन्यानंतर आता पुन्हा एकदा भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपण थेट बाबरी मस्जिद पाडण्याच्या स्थळी होतो असे सांगत म्हणाले की, तेथे येणाऱ्या कारसेवकांची आणि पक्षाच्या नेत्यांची व्यवस्था करण्याची जबाबदारी आमच्यावर होती. त्यावेळी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशिलकुमार मोदी हे ही आपल्या सोबत होते. तसेच भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले होते की बाबरी पडेल किंवा नाही पण येथून शेवटचा व्यक्ती गेल्याशिवाय येथून बाहेर पडायचे नाही असे आदेश दिले होते. त्यानुसार तेथून सर्व कारसेवक बाहेर पडल्यानंतर तेथून बाहेर पडणारा मी शेवटचा होतो त्यावेळी रात्री कुत्रे भुंकत होते असे माहिती दिली.

या दोन्ही नेत्यापैकी देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केल्यानुसार बदायु हा जिल्हा अयोध्येपासून गुगलच्या नकाशानुसार ४२४.१ किलो मीटर असल्याचे दाखवते. त्यामुळे अयोध्येतून कारसेवक बाहेर पडले ते जवळपास दुसऱ्या दिवशी. त्यानंतर केंद्र सरकारच्या निर्देशानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी धरपकड करण्यास सुरुवात केली.

तर चंद्रकांत पाटील यांच्या म्हणण्यानुसार अयोध्येतून सर्व कारसेवक बाहेर पडल्यानंतर तेथून सर्वात शेवटी बाहेर पडणारे चंद्रकांत पाटील हे होते आणि त्यावेळी रात्रीचे कुत्री भुंकत होती. यावरून काँग्रेसच्या एका नेत्याने सवाल केला की, जर इतक्या रात्री आणि तीही अयोध्येतून बाहेर पडताना उत्तर प्रदेश पोलिसांनी चंद्रकांत पाटील यांना कसे हटकले नाही असा सवाल केला. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांना अटक होत नाही आणि देवेंद्र फडणवीस यांना बदायु मध्ये अटक होते याचा अर्थ लागण्यासारखा नाही असा सवालही भाजपाच्या अन्य एका नेत्याने उपस्थित केला.

त्याचबरोबर बाबरी विध्वंस प्रकरणी आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार विशेषतः प्रमोद महाजन यांच्या नावाच्या आणि सुंदरलाल भंडारी यांच्या संदर्भानुसार बाबरी पाडण्यासाठी मस्जिदीवर चढलेल्या लोकांमध्ये मराठी बोलणारी माणसे होती अशीच माहिती भाजपाचे त्यावेळचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी जाहिररित्या दिली. तसेच मस्जिद पाडण्याची जबाबदारी भाजपा घेण्यास नसल्याचे सिध्द झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी ती जबाबदारी शिवसैनिक असतील तर मी घेतो असे जाहिर वक्तव्य केले. त्यास आता जवळपास २५ वर्षाहून अधिक काळ लोटल्यानंतर आता का चंद्रकांत पाटील केले याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

विशेष म्हणजे भाजपाच्या मदतीने शिवसेनेतून फुटून निघालेले एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या गटाचा कोणताही व्यक्ती मंत्री भाजपाच्या वक्तव्यावर आक्षेप घेणार नाही याबाबद्दलची खात्री जवळपास भाजपा नेत्यांना आहे. तर दुसऱ्याबाजूला या मुद्यावरून उध्दव ठाकरे आणि संजय राऊत हे आकाश पाताळ एक करतील याचा जणू अंदाजच भाजपा आहे. त्यामुळे या वक्तव्याचा प्रत्यक्ष फायदा ठाकरे गटालाच होणार आहे. हे जवळपास स्पष्ट आहे.

या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर भाजपाचे नेते अमित शाह आणि नरेंद्र मोदी नाराज असल्याची माहिती भाजपाचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी दिली. तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रकांत पाटील यांचे ते वैयक्तीक मत असल्याचे सांगत त्यांच्यापासून दोन हात लांब राहणे पसंत केले.

त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निशाणा नेमका देवेंद्र फडणवीस यांच्यावर होता की, एकनाथ शिंदे यांच्यावर की उध्दव ठाकरे याबाबतचे उत्तर आगामी काळातच मिळेल अशी आशा राजकिय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.

Check Also

अखेर मालदीव बरोबरचे संबध दृढ करण्यासाठी चीन घेतोय पुढाकार

साधारणतः दोन महिन्यापूर्वी मालदीव मधील निवडणूका पार पडल्या या निवडणूकीत भारतीय वंशाचे मोहम्मद मोईझु यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *