Breaking News

एकाच महिन्यात पुरोगामी महाराष्ट्रातील चिपळूण, सोलापूरात जातीयवादाच्या दोन मोठ्या घटना चिपळूणात मागासवर्गीयांना निवारा लांब करायला लावला, तर माळशिरसमध्ये स्मशानभूमीत अंत्यविधीस करण्यास नकार

सोलापूर-रत्नागिरी-मुंबई: प्रतिनिधी

फुले, शाहू आणि राज्यघटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून राज्यातील सर्वच राजकिय पक्षांकडून उल्लेख केला जातो. मात्र याच महाराष्ट्रात एकाच महिन्यात जातीवादाच्या दोन घटना घडल्या असून त्यातील एक चिपळूण तर दुसरी पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात घडली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील माळेवाडी बोरगांव येथे एका मातंग समाजाच्या व्यक्तीने अॅट्रोसिटी कायद्याखाली गावातील गावगुंडाच्या विरोधात दिलेली तक्रार मागे घेतली नाही म्हणून संबधित व्यक्तीच्या मृत भावावर गावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्याने अखेर या नागरीकांना गावच्या ग्रामपंचायतीसमोर अंत्यविधी करावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली असून विशेष म्हणजे यासंदर्भात स्थानिक पोलिस प्रशासनाला याची माहिती मिळूनही संबधित गावगुंडावर उशीराने कारवाई करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली.

माळशिरस तालुक्यातील माळेवाजी बोरगांवचे सरपंच दशरथ साठे यांच्या भावाचे रात्री २ वाजता निधन झाले. त्यानंतर सकाळच्या सुमारास साठे यांनी भावावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गावच्या स्मशानभूमीकडे घेवून निघाले. मात्र गावगुंडानी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास साठे यांना मनाई केली. यासंदर्भातील माहिती पोलिसांना कळविण्यात आली. तरीही पोलिसांनी यासंदर्भात तातडीने कारवाई करण्याऐवजी साठे कुटुंबियांना रस्त्यात अडवून ठेवले.

सदरचा मृतदेह १८ तास अंत्यविधीविना रस्त्यातच राहीला. मृतांच्या नातेवाईकांनी पोलिसांनी विनंती करत सदरचा मृतदेह गावात तरी नेवू द्या किंवा स्मशानभूमीत तरी नेवू द्या अशी विनंती करत होते. मात्र पोलिसांकडून साठे यांच्या नातेवाईकांनाच अडवित होते. त्यामुळे सकाळपासून ते दुपारच्या २ वाजेपर्यत साठे यांच्या भावाचा मृतदेह गावाच्या बाहेरच होता अशी माहिती साठे यांचे नातेवाईक राजाभाऊ खिल्लारे यांनी सांगितले.

दुपारी २ नंतर तो मृतदेह गावात आणण्यात आला आणि रात्री साडे सात वाजता ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर अंत्यविधी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी उच्चवर्णिय जातीतील ८ गावगुंडाना अटक केली.

तर दुसरी घटना रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील

कोकणात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर राज्याच्या अनेक भागातून मदतीचा ओघ सुरु असताना, चिपळूण तालुक्यात माणुसकीला लाजवणारा एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. आपल्याच गावातील मोहिते कुटुंबियामधील १७ जण मृत्युमुखी पडले असतानाही, गावातील मंडळीचे संसार उघड्यावर येत बेघर झाल्याचे चित्र समोर असताना त्यांच्यासाठी तात्पुरता निवारा शेड बांधण्यास स्थानिक गावकऱ्यांनी विरोध केला. प्रशासनाने नरमाई भुमिका घेतल्याने चार दिवसानंतर शेजारच्या अलोरे गावात जावे लागले. सदरची घटना ही २ ते ३ ऑगस्ट २०२१ या कालावधीतील आहे.

मानवावर कोणतीही नैसर्गिक आपत्त्ती येते तेंव्हा, त्याला मदत करताना जात, धर्म, पंथांच्या भिंती डोळ्यासमोर येत नाही. मानवता हीच ईश्वर सेवा असे मानून अनेकजण निरपेक्ष भावनेने काम करतात. मात्र, डोळ्यादेखत आपल्या गावातील लोकांवर मृत्युने घाला घातलेला असताना, त्यांना जात कशी आठवते? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पोसरे,ता.चिपळूण,जि.रत्नागिरी येथे दरड कोसळून १७ लोक मृ्त्यूमुखी पडले, या दुर्घटनेत राहती घरे उध्वस्त झाली. यात २२ जण वाचले होते. एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतर, गावातील अन्य लोकांनी मदत केली नाही. दुसऱ्या गावातील समाजातील मंडळीनी त्यांना जेवणाची व्यवस्था केली. चार दिवसानंतर प्रशासनाला जाग आली, तेव्हा घराचा पंचनामा करून, मुळगावात या लोकांना शेड ऊभी करण्याचे काम प्रशासना मार्फत होणार होते. मात्र उच्चवर्णीय लोकांनी विरोध केला. त्यामुळे त्यांना अलोरेला ठेवण्यात आले.

आपत्कालीन स्थितीत गावातील लोकांनी असे अमानवी वागून या धर्मांतरीत बौध्दांना नाकारले आहे. राज्य सरकारने गरजूंना चिपळूणला म्हाडाची घरे द्यावीत, अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेश भारतीय यांनी केली.

Check Also

कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळा सुट्टी नाहीच, एप्रिलमध्येही सुरु राहणार शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांची माहिती

कोरोना काळात शाळा बंद राहील्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान शैक्षणिक नुकसान झाले. हे शैक्षणिक नुकसान भरून …

Leave a Reply

Your email address will not be published.