Breaking News

शरद पवार यांचा इशारा; एक शुद्र, अति शुद्र असे वातावरण समाजामध्ये… कष्ट करण्याचे काम तुमचे आणि धनसंपत्ती ठेवायचे काम मालकांचे

संपत्ती मिळवायची आणि ठेवायचा अधिकार फक्त आमचा आहे आणि कष्ट करणारी जमात ही तुमची आहे. कष्ट करण्याचे काम तुमचे आणि धनसंपत्ती ठेवयाचे काम मालकांचे. त्यामुळे एक शुद्र, अति शुद्र असे वातावरण समाजामध्ये करून आज काही लोक मालकांच्या नावाने एक वेगळा निकाल घेत आहेत. तो निकाल त्यांना घ्यायचा असेल तर माथाडी कामगारांवर हल्ला करणे, त्यांना दुर्बल बनवणे ही भूमिका त्यांच्या मनामध्ये आहे असल्याची भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली.

हमाल माथाडी महामंडळाच्या २१ व्या राज्य अधिवेशनाच्या निमित्ताने अहमदनगर येथे लोकनेते स्व. शंकरराव घुले यांच्या पुतळ्याचे अनावरण आज या ठिकाणी शरद पवारांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आयोजित जाहिर कार्यक्रमात ते बोलत होते.

आज या ठिकाणी हमाल माथाडी महामंडळाचे अधिवेशन भरले. अनेक कायदे आलेत. कारखानदारी वाढली, दरवर्षी ती वाढते. अनेक हातांना त्यामुळे काम मिळते. ते काम देत असताना जो काम करणारा आहे त्याला कायद्याने संरक्षण आहे. पण या कायद्याच्या संरक्षणावर हल्ला करण्याचे काम काही लोकांनी सुरू केलेले आहे. माथाडी हमाल कायदा या देशामध्ये महाराष्ट्रात सुरू झाला आणि आज या कायद्याने कष्टकऱ्यांना सन्मानाने जगण्याची संधी दिली. परंतु आज काही लोक असे आहेत की त्यांना माथाडी कायदा खुपतो आहे. आज मालक वर्गाची एक मानसिकता वेगळी झाली आहे असा इशाराही शरद पवार यांनी दिला.

शरद पवार म्हणाले की, मला आठवते की, महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यावेळी मी नुकताच निवडून गेलो होतो. अण्णा पाटील, बाळासाहेब देसाई, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील असा अनेकांनी शक्ती पणाला लावली. मग गिरणी कामगार, माथाडी कामगार या सगळ्या लोकांची शक्ती तयार केली आणि त्यांच्यासाठी कायदा तयार करण्याचा निर्णय घेतला. त्या कायद्याने तुमच्या जीवनात एक प्रकारची शाश्वती आल्याचेही सांगितले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, २०१४ मध्ये सरकार बदललं आणि फडणवीस यांचे सरकार आले. त्यांनी काय केले तर या राज्यातील ३६ जिल्हे एकत्र करून एक नवीन राज्यव्यापी मंडळ स्थापन करण्याची भूमिका घेतली. त्या कायद्याला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न झाला. परंतु आजही तो कायदा काही प्रमाणात शिल्लक आहे. असे सांगितले जाते गुंडगिरी येथे आहे पैसे लुबाडण्याचे काम होते. मी बाबा आढावांना ५०-६० वर्षे ओळखतो. उभ्या आयुष्यामध्ये कुणी गुंडगिरी केली, कोणी पैसे लुबाडण्याचे काम केले तर बाबा आढाव कधीही त्यांच्या पाठीशी राहणार नाहीत व त्यांना योग्य धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. गुंडगिरीचा आरोप करून सबंध माथाडी चळवळीला एक प्रकारे बदनाम करण्याचे काम काही लोकं करतील त्या सगळ्या लोकांच्या विरुद्ध तुम्हाला व आम्हाला उभे राहावे लागेल असे आवाहनही केले.

शरद पवार म्हणाले की, आज महाराष्ट्रातील कोणतेही शहर बघा तेथे कष्ट करणारा खरा कोण आहे तर हमाल आणि माथाडी आहे. म्हणून या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे आणि ती घ्यायची असेल तर आपल्यामध्ये एकजूट असलीच पाहिजे आणि ती एकजूट देण्यासाठी बाबा आढाव आणि त्यांचे सहकारी गेले अनेक वर्षे काम करत आहेत. त्याच्या पाठीशी शक्ती उभी करणे तुम्हा लोकांची जबाबदारी आहे आणि ती तुम्ही पूर्ण कराल याची मला खात्री आहे अशी आशाही व्यक्त केले.

Check Also

बिल्कीस बानोप्रकरण सर्वोच्च न्यायालयः आधी शरण या मुदतवाढ नाही

गुजरातमधील गोध्रा दंगली दरम्यान तथाकथित हिंदूत्वावादी विचाराच्या लोकांनी बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचर करत तिच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *