Breaking News

तुकोबारायाने लिहिलेल्या ‘या’ ओळींची पगडी पंतप्रधानांना देणार शिळा मंदिराचे उद्या लोकार्पण होणार

देहू संस्थानाकडून नव्याने उभारण्यात आलेल्या जगद्गुरू संत तुकारामा महाराज मुर्ती आणि शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा उद्या मंगळवारी होत आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी खास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याने देहू संस्था आणि पुणे पोलिसांनी सुरक्षेच्यादृष्टीने मोठी जय्यत तयारी केली.

तसेच पहिल्यांदाच देहूत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी हे कार्यक्रमासाठी आल्यानंतर त्यांना तुकोबारायाची पगडी देण्यासाठी देहू संस्थानने पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांना तुकोबांची पगडी आणि उपरणे तयार करण्यास सांगितले. त्यानुसार तुकाराम पगडी तयार करण्यात आली. मात्र, त्या पगडीवर समोरच्या बाजूला मध्यभागी लिहिण्यात आलेली ओवी नंतर बदलण्यात आली.

आधी या पगडीवर ।। भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी ॥ ही तुकाराम महाराजांची ओवी लिहिण्यात आली होती. आता या पगडीवरील ओवी बदलण्यात आली असून त्यावर ॥ विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ ॥ ही ओवी लिहिण्यात आली आहे. आता हीच पगडी उद्याच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देण्यात येणार आहे.
या पगडीवरील ।। भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी ॥ या पगडीवरील ओव्या कोणत्या कारणास्तव बदलण्यात आल्या. या पगडीबाबत गिरीश मुरुडकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. देहू संस्थानकडूनही यावर प्रतिक्रिया देणं टाळण्यात आलं आहे.

कायदा व सुरक्षितता राखण्याच्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि उर्वरित ग्रामीण भागात ड्रोन, पॅराग्लायडींग, हॉट बलून सफारी, मायक्रोलाईट एअरोप्लेन अशा प्रकारची अवकाश उड्डाणे करण्यास मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सोमवारी काढले.

फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमाणे हे आदेश काढण्यात आले आहेत. हे आदेश मंगळवारी (१४ जून) सायंकाळी सहा वाजेपर्यंत लागू राहतील. आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा मंगळवारी होणार असून मुख्य मंदिराचा कार्यक्रम झाल्यानंतर सभामंडपात वारकरी, उपस्थित भाविकांशी ते संवाद साधणार आहेत. मंगळवारी दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी पंतप्रधान मोदी यांचे लोहगाव विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर विमानतळावरून देहूकडे हेलिकॉप्टरने पंतप्रधान मोदी प्रयाण करतील. एक वाजून ४५ मिनिटांनी मंदिर समिती जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर संस्थान परिसरात दाखल होतील.

या ठिकाणी मोदी यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा २० मिनिटांचा लोकार्पण सोहळा होणार आहे. त्यानंतर तेथून दोन वाजून दहा मिनिटांनी सभेच्या ठिकाणी मोदी दाखल होतील. या ठिकाणी ५० मिनिटांची सभा होणार असून सभामंडपात वारकरी, उपस्थित भाविकांशी ते संवाद साधणार आहेत. त्यानंतर तीन वाजून सात मिनिटांनी तेथून पंतप्रधान मोदी पुण्यातून दिल्लीकडे प्रयाण करणार आहेत, असे जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या दौऱ्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

Check Also

६२ वसतिगृहे या जिल्ह्यांमध्ये सुरु करण्यास सरकारची मान्यता

सामाजिक न्याय विभागांतर्गत स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतून ऊसतोड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *