परभणीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या लगत असलेल्या राज्यघटनेची विटंबना केल्याच्या विरोधात प्रशासनाच्या विरोधात स्थानिक आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी परभणी बंदचे आंदोलन पुकारले. मात्र याला हिंसक वळण लागले. यावेळी पोलिसांनी एलएलबी करणाऱ्या सोमनाथ सुर्यवंशी ला पोलिसांनी अटक केली. मात्र पोलिस कस्टडीत असतानाच सोमनाथ सुर्यवंशीचा मृत्यू झाला. तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्ये विजय वाकोडे यांचाही मृत्यू झाला. यातील सोमनाथ सुर्यवंशीच्या कुटुंबियाला राज्य सरकारकडून १० लाख रूपयांची मदत जाहिर करण्यात आली. मात्र सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी ही मदत आज दुसऱ्यांदा नाकारली.
या दोन आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी स्थानिक आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी आज एका सार्वजनिक बैठकीचे आयोजन केले. या बैठकीला सर्वच पक्षियांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सोमनाथ सुर्यवंशी आणि विजय वाकोडे यांचे कुटुंबियही उपस्थित होते. यावेळी सर्व आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्यांनी मुंबईपर्यंत लॉंग मार्च काढण्याचा निर्धार करण्यात आला.
हा लाँग मार्च परभणीतून सुरु होईल आणि लाँग मार्चचा समारोप मुंबईत करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. दरम्यान एकाबाजूला राज्य सरकारच्या गृहविभागाच्या गलथानपनामुळे एका विद्यार्थ्याचा मृत्यू अर्थात सोमनाथ सुर्यवंशी याचा मृत्यू झालेला असताना राज्य सरकारकडून जाहिर केलेली मदत नाकारण्याचे धाडस सोमनाथ सुर्यवंशी याच्या कुटुंबियानी नाकारले आहे. तर दुसऱ्याबाजूला बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी किमान अर्धा डझन जिल्ह्यात सर्वपक्षियांनी मोर्चे काढूनही अद्यापही आरोपींच्या विरोधात ठाम कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. तसेच त्या हत्याप्रकरणातील मोठ्या धेंडाना वाचविण्याचा प्रयत्न सरकार दरबारीच दिसून येत आहे.
सोमनाथ सुर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी परभणी ते मुंबई असा लाँग मार्च काढण्यात येणार असून २५ दिवसात हा लाँग मार्च मुंबईला पोहोचणार आहे. तसेच हा लाँग मार्च थेट मंत्रालयावर धडकणार असल्याचेही यावेळी आंबेडकरी कार्यकर्त्यांनी सांगितले.