साधारणतः १६ व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. त्या काळात दिल्ली आणि संपूर्ण भारतात अनेक शाह्या उदाहरणार्थ, कुतुबशाही, निझामशाही, आदिलशाही आदि शाह्या दक्षित भारतात स्थिर झालेल्या होत्या. तर तिकडे उत्तर भारतात मुगल साम्राज्याचे मांडलिकत्व राजस्थानसह उत्तर प्रदेश, बंगालसह अनेक राज्यांमधील आणि प्रांतांच्या राजे-रजवाडयांनी स्विकारले होते. त्यामुळे त्यातील जे काही बंडखोर-स्वतंत्र बाण्याचे राजे होते, त्यांनी नेहमीच त्या त्या भागातील कोणती शाही असेल किंवा उत्तरेत मुघल साम्राज्य असेल त्याच्या विरोधात उभ ठाकले. परंतु त्यांचा निभाव फारसा कधी लागला नाही. त्यामुळे त्या राजे-रजवाड्यांची नाव फार काळ इतिहासाच्या उदरात टीकली नाही.
मात्र या सगळ्यात मध्ये काही निवडक राजे-महाराजांची नावे मात्र आज २१ व्या शतकातही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यात भारताची सीमा खाली श्रीलंकेपर्यंत आणि इराणपर्यंत वाढविणारे गुप्त-मौर्य वंशाचे सम्राट अशोक, त्यापूर्वीचे इसवी सन पूर्वच्या काळात राजे पुरो ज्यांनी जगजेत्ता अलेक्झांडर याच्याबरोबर तुल्यबळ लढत देऊन पराभव झाला तरी त्याच्यासमोर कधी मान खाली केली नाही. मेवाडचे महाराणा प्रताप, मुघल साम्राज्याचे जल्लादुद्दीन अकबर, पंजाबचे सम्राट पृथ्वीराज. दक्षिण भारतात सम्राट विजय, त्यानंतर इसवी सन सुरु झाल्यानंतर दक्षिण भारतातील हैदर अली, टीपू सुलतान, तर १६ व्या शतकात महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे सुपुत्र संभाजी राजे आदी राजे-महाराजांची नावे आजही भारतातील अनेक भागात आदराने घेतली जातात आणि त्यांची आदर पूर्वक पूजाही केली जातात. यांच्याशिवाय इतिहासाच्या उदरात काही असेही राजे-महाराजे होऊन गेले पण अनेकांचे नावे किंवा त्यांचा इतिहास मुघल साम्राज्य असेल किंवा ब्रिटीश साम्राज्य असेल त्यांच्या अन्यायकारक राजवटीच्या विरोधात सातत्याने लढा दिला.
पण सगळ्यात महाराष्ट्रातील साडे तीन जिल्ह्यांपर्यंत मर्यादीत राज्य असलेल्या स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांचे नाव आज महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण भारत भरात घेतले जाते. मात्र दुर्दैवाने शिवाजी महाराजांचा आणि त्यांचे सुपुत्र संभाजी महाराजांचा इतिहास हा ब्रिटीश-पोर्तुगीज इतिहास कारांच्या लेखनातून महाराष्ट्राच्या जनतेला समजत आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात त्यांच्या सैन्यामध्ये पगार देण्याची प्रथा सुरु झाली. तसेच लढायांच्या दरम्यान किंवा नंतरच्या काळात जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या देठालाही धक्का लावायचा नाही असा दंडक घातला आणि त्याचे पालन करण्यास त्यांनी त्यांच्या सैन्याला भागही पाडले. याशिवाय त्यांच्या सैन्यात बारा बलुतेदारीतील सर्वांना आणि अठरापगड जातीच्या सर्वांचा समावेश होता. इतकेच नव्हे तर त्यांच्या त्या त्या व्यक्तीच्या वकुबानुसार त्या सैनिकावर जबाबदारीही सोपविली जात असे आणि त्याच्या नेतृत्वाखाली त्या त्या विभागाचा कारभारही सोपविला जात असे. जसे की, बहिर्जी नाईक, सिद्धी जोहर, नेताजी पालकर, गणोजी शिर्के यांचे वडील, दामोदर पंत, मोरारजी सारखी अष्टप्रधान मंडळातील त्यांचे सहकारी यासह असे अनेक जण त्यांचे सोबत होते, राहिले.
पण पुढे देशातील सर्वच राज्यसत्ता लयाला जाऊन ब्रिटीशांच्या सत्तेखाली अंमल सुरु झाला. त्यावेळी समाजातील वाईट प्रथा, अर्थात जाती-पाती, धर्माचे अवडंबर, महिलांवर असलेल्या जाचक अटी, त्यांचा हक्क डावलणे आदी गोष्टींच्या प्रथा सुरु झाल्या. पण काळ जसजसा पुढे जात राहिला तसतसा सामाजिक परिस्थितीत बदल घडवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचे वारस छत्रपती शाहु महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने समाज कार्याला सुरुवात केली. त्यांच्या समाजिक कार्यात जितक्या अडचणी आल्या आणि त्या तितक्या भोगून किंवा त्यावर मात करत समाजाला एका प्रगतीच्या रस्त्यावर आणून सोडले. त्याच्या कामातून प्रेरणा घेऊन काम करणाऱ्यांची संख्याही वाढतच होती. पण अनेकांचे वागणे हे व्यावाहिक पातळीचे बनण्यात ह्याच कालखंडात सुरुवात झाली आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा डॉ बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा संभाजी महाराज असतील किंवा फुले दांम्पत्य असतील ते जन्मावेत ते शेजारच्या घरात, किंवा त्यांच्या सारखे दुसरे होणे नाही असे म्हणत, आर्थिक सुबत्तता आलेल्यांनी सुरुवात करण्यास सुरुवात केली.
काँग्रेसच्या काळात ज्यांनी जो काळ जगला असेल त्या वयाच्या नागरिकांना माहित असेल की, त्या वेळी वर्तमान पत्रात आलेल्या सरकारी जाहिरातीमधून कोणत्याही महापुरुषाच्या जयंतीचा किंवा महापरिनिर्वाणाचा दिवस अनेकांना समजत असे. पण आजच्या २१ व्या शतकात झालेल्या तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे रोज कोणत्या महापुरुषाचा दिवस आहे, हे ही राजकिय नेत्यांच्या ट्विट आणि फेसबुकवरील पोस्टवरून कळायला सुरुवात झाली. पण त्या महापुरुषांबद्दलची उत्सुकता, आदर, त्यांच्या विचाराप्रती असलेली श्रद्धा, केलेल्या कामाचे मूल्य काही केल्या मात्र वाढण्याऐवजी ते कमी होत असल्याचे सामाजिक स्तरावर दिसून येत आहे.
त्यातच खरा इतिहास कोणता, असा सवाल करत प्रत्येक जणच गुगुलबाबा नामकवर त्या त्या दिवशी किंवा फावल्या वेळात कोणत्या तरी व्यक्तीचा व्हिडिओ पासून अथवा व्हॉट्सअॅपवर कोणी तरी पाठविलेल्या खरी-खोटी माहितीची खातरजमा न करता त्यावरून मत बनवून ती पुढे पाठविणाऱ्यांचा एक वेगळ्याच विचारांचा समाज आता निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याला एकाच व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या वैचारीकतेच्या धारणेवर १० पुस्तके त्यात त्याबद्दलची सकारात्मक आणि नकारात्मक असलेली पुस्तके वाचून मत जाणून घेण्याची तसदी घेत नाहीत. त्यामुळे एखाद्या खाजगी टीव्ही वाहिन्यांवरील धारावाहिक पाहून किंवा चित्रपट पाहून त्या महापुरुष किंवा त्यांच्या व्यक्तीमत्वाबद्दल मत तयार कऱण्याचा एक प्रघातही नव्याने निर्माण झाला आहे.
मात्र १६ ल्या शतकात जन्मलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाच्या देठालाही हात लावायचा नाही, आणि हे रयतेचे राज्य असल्याचे धोरण स्विकारलेल्या विचारांची अंमलबजावणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांनी लिहिलेल्या राज्य घटनेच्या प्रस्तावनेत आम्ही भारतीय लोक, आम्ही स्वतःप्रत राज्यघटना अर्पण करत असून त्या राज्य घटनेच्या माध्यमातून लोकांसाठी लोकानी निवडलेली राजसत्ता स्विकारत असल्याचे सांगत सर्व नागरिकांना स्वातंत्र्य, समता आणि बंधूत्व राखण्याची बांधीलकी दिली. किंवा आपण असे म्हणू की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे राजकिय तत्वे स्विकारली. पण ही तत्वे स्विकारताना धर्म बघून किंवा त्याची जात बघून त्याला संधी न देता सर्वांना समान संधी आणि समान स्वातंत्र्य देण्याची ग्वाहीही राज्यघटनेची प्रस्तावना वाचताना येते.
या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आणि काळजीपूर्वक वाचन केले असता या महापुरुषांची त्यांच्या विचारांप्रतीची निष्ठा, त्यांनी जो मार्ग निवडला आहे त्या मार्गावर मार्गक्रमण करताना आलेल्या अडचणी-संकट आणि त्यावर केलेली मात या गोष्टी पाहताना त्या घटनेचा विपर्यास करून दुसऱ्याप्रती द्वेष कधी निर्माण होऊ दिला नाही किंवा इतराच्या सामर्थ्याची अवहेलना ना कधी छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली ना १९ व्या शतकातील कोणत्याच महापुरुषांनी केली. म्हणूनच शिवाजी महाराज यांच्यावर चाल करून येण्यासाठी विजापूरच्या आदिलशाहीने पाठविलेला अफझल खानाला आणि त्याच्या सैन्याला आपण थेट भिडू शकत नाही हे सामर्थ्य उमगल्यानंतर अफझल खानाची वैयक्तिक भेट घेणे आणि त्याच्या धुर्त धोरणाचा अदमास घेत आधीच पूर्ण तयारी करून त्यानुसार स्वसंरक्षणाचा मार्ग चोखाळला. पण अफझलाखान याच्या मृत्यूनंतर त्याचे सन्मानपूर्वक दफन करणे आणि त्याच्या कबरीवरील दिवा बत्ती आणि देखभालीसाठी सरकारी खजिन्यातून पैशातून तरतूद राखत दुश्मनाच्या शौर्याची कदर करणे आणि त्याचा मृत्यूनंतरही योग्य तो मान-सन्मान राखणे हे फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांनाच शक्य झाले. हिच परंपरा मुघल बादशाह औरंगजेबानेही पाळली, शिवाजी महाराजांचे निर्वाण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर औरंगजेबानेही आपली डोक्यावरील बादशाहीचा मुकूट काढून नमाज अदा केली होती हा इतिहास आहे.
पण आताच्या जमान्यात त्यावेळचे शत्रुत्व दोन धर्मातील तेढ कोणत्याही कारणाशिवाय पाळण्याची मानसिकता सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक राबविली जात आहे. यास एकच कारण ते म्हणजे विद्यमान सत्ताधाऱ्यांना सर्वच पातळीवर अपयश येत असल्याने त्या अपयशाकडे कोणाचे लक्ष्य जावू नये म्हणून हेतु पुरस्सर धार्मिकतेच्या तेढ निर्माण करण्यावर आणि भावनिक मुद्दे निर्माण करून जनतेला भावनिकरित्या गुंतवण्याचे राजकारण खेळले जात आहे. आणि त्या पद्धतीला आपलीच भावना म्हणून आपण नकळत विरोध करण्याऐवजी तेच जपत असल्याने आता आपल्यालाच कळेनासे झाले की, आपला मुळ स्वभाव काय आणि कोणत्या घटनांचे कसे अर्थ आहेत या मानसिक गोंधळात अडकत चाललो आहोत. पण जाता जाता एकच स्पष्ट करावेसे वाटते ते म्हणजे, इतिहासात वेगळी वाट पण समाजाच्या देशाच्या हिताची भूमिका घेणारेच इतरांच्या दिर्घकाळ लक्षात रहात आले, पण फंद फिदूरीला, भ्याड पणाने जगणाऱ्यांचे विस्मरण लवकरच घडते.
लेखक- गिरिराज सावंत