Breaking News

स्वतःला व्यक्त करण्याची संधी कधीच सोडू नका – ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर बालसाहित्य मेळाव्याची परंपरा यापुढे होणाऱ्या साहित्य संमेलनातही सुरू राहील - स्वागताध्यक्ष छगन भुजबळ

मराठी ई-बातम्या टीम

मराठी साहित्य संमेलनाच्या याआधीच्या ९३ संमेलनात जे उपक्रम राबविले गेले नाही असे नाविन्यपूर्ण उपक्रम आपण कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राबविण्यात येत आहे. पहिल्यांदाच साहित्य संमेलनाच्या इतिहासात बाल साहित्य मेळाव्याचा समावेश करण्यात आला. बालसाहित्य मेळाव्याची ही परंपरा यापुढील होणाऱ्या साहित्य संमेलनात देखील कायम राहील असा विश्वास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

मेट भुजबळ नॉलेज सिटी आडगाव नाशिक येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बाल साहित्य मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या बालकवी मेळाव्याची बाल साहित्य पूजनाने करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मिलिंद जोशी, जयप्रकाश जातेगावकर, समीर भुजबळ, पंकज भुजबळ,विश्वास ठाकूर, प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, प्राचार्य प्रशांत पाटील, संतोष हुदलीकर, संजय करंजकर, विशाखा भुजबळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

इतिहासात प्रथमतः साहित्य संमेलनात बालकुमार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच साहित्य संमेलनाच्या ९३ वर्षाच्या इतिहासात झाले नाही ते नवे उपक्रम आपण या साहित्य संमेलनात घेतले आहे. यामध्ये चित्रकलेसह विविध कलांना स्थान दिले आहे. मुलांमध्ये बालपणापासूनच साहित्याची आवड निर्माण व्हावी हा या बाल साहित्य मेळाव्याचा महत्वाचा उद्देश असल्याचे सांगत बालसाहित्य मेळाव्यास मिळालेला प्रतिसाद बघता यापुढील होणाऱ्या साहित्य संमेलनात देखील बालकवी मेळाव्याचा सहभाग असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच उपस्थितांचा उत्साह बघून आपले व आपल्या मात्या- पितांचे आभार मानतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी दिलीप प्रभावळकर म्हणाले की, आजकालची मुलं अधिक स्मार्ट झाली आहेत. प्रत्येकात कुठली ना कुठली कला असते ती बाहेर पडली पाहिजे. आपल्यात जी कला आहे ती दाबून न ठेवता व्यक्त करावी यामध्ये पालकांनी देखील विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. वाचलेलं चांगल साहित्य लिहायला प्रेरणा देते. बालकांनी साहित्याशी दोस्ती करावी. त्यांनी पुस्तकाची संगत साहित्याची साथ सोडू नये असे सांगत दररोज तीनचार ओळींचे लिखाण करत पुस्तकाची तीन चार पाने दररोज वाचावी असे आवाहन त्यांनी केली.

यावेळी दिलीप प्रभावळकर यांनी उपस्थित बालकांशी संवाद साधला बालकांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रभावळकर यांनी दिली दिलखुलास उत्तरे देत त्यांनी चित्रपटात चिमणराव, बोक्या सात बंडे, तात्या विंचू, चौकट राजा, नारबा, आबा टिपरे यासह केलेल्या विविध भूमिकाबाबतचा पट मुलांसमोर उभा केला. तसेच बालकुमार साहित्य मेळाव्यात हजर राहण्याची संधी मिळाली याचा आनंद होत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

लिटिल चॅम्प फेम ओमकार कानिटकर, जय गांगुर्डे, राशी पगारे यांच्या गाण्यांनी रंगला बालसाहित्य मेळावा. ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आयोजित बालसाहित्य मेळाव्यात लिटिल चॅम्प फेम ओमकार कानिटकर व जय गांगुर्डे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी विविध गाण्याचे सादरीकरण यावेळी केले. याला बालकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

बालसाहित्य मेळाव्यात बाल चित्रकारांनी रेखाटली सुंदर चित्रे

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात इतिहासात पहिल्यांदाच बालसाहित्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या बाल साहित्य मेळाव्यात अनेक बाल चित्रकारांनी आपला सहभाग नोंदविला. यावेळी या बालकरांनी विविध सुंदर चित्रे रेखाटली. या बाल मेळाव्यात ३ वर्षाची ओजस्वी काने ही चिमुकली चित्र कलाकार देखील सहभागी झाली. तसेच इयत्ता ५ वीत शिकणारा मयुरेश आढावा या विद्यार्थ्याने रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन याठिकाणी लावण्यात आले होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ व ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

चित्रकला आणि शिल्पकला हे देखील साहित्यच – छगन भुजबळ

मराठी साहित्य संमेलनात अच्युत पालव यांचे कॅलिग्राफी प्रात्यक्षिक चित्रकला आणि शिल्पकला हे देखील साहित्यच आहे त्यामुळे त्याचा देखील आम्ही सन्मान करतो असेही स्वागताध्यक्ष भुजबळ म्हणाले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात “ऐसी अक्षरे” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अच्युत पालव यांचे कॅलिग्राफी प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भेट देऊन छगन भुजबळ यांनी अच्युत पालव व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या.

आपल्या साहित्य संमेलनाचा परीघ ह्या वर्षी आपण वाढवला आहे. त्यात बालकवी कट्टा, चित्रकला, कॅलिग्राफी, शिल्पकला प्रदर्शनाचा कार्यक्रम देखील घेतला आहे. साहित्य आणि चित्रकला ही आपल्याला नेहमी विचार करायला भाग पडतात आणि साहित्य, चित्रकलेतून मनात अनेक तरंग उठतात असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले

यावेळी बोलताना अच्युत पालव म्हणाले की, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात चित्रकलेला आदरपूर्वक दिलेला सन्मान दिला याचा आनंद होत आहे अश्या भावना व्यक्त केल्या. यावेळी माजी खासदार तथा संमेलनाचे समन्वयक समीर भुजबळ, विश्वास ठाकूर, जयप्रकाश जातेगावकर, प्राचार्य प्रशांत पाटील यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

 

Check Also

६२ वसतिगृहे या जिल्ह्यांमध्ये सुरु करण्यास सरकारची मान्यता

सामाजिक न्याय विभागांतर्गत स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतून ऊसतोड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *