Breaking News

चला! जाणून घेऊ या संरक्षण दलाची सज्जता आणि सक्षमता एकदा अवश्य भेट द्या…डीआरडीओच्या दालनाला

आपले संरक्षण दल व त्याच्या वेगवेगळ्या शाखा अखंडपणे देश संरक्षणासाठी सज्ज असतात. मात्र ही सज्जता, सक्षमता आणि आक्रमकता येते ती विज्ञान आणि तंत्रज्ञानातून. या विज्ञान तंत्रज्ञानाच्या नवनवीन शोधाचे प्रात्यक्षिक दाखवणारे संरक्षण संशोधन आणि विकास संघटना विभागाचे (डीआरडीओ) दालन इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये सर्वांचे लक्ष वेधुन घेत आहे.

संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रयोग व त्याचे प्रात्यक्षिक या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे. दालनाच्या सुरुवातीला आकर्षक ड्रोन ठेवण्यात आला आहे. पाच किलो वजनाचा हा ड्रोन शत्रूच्या सीमेत घुसून पाच किलोमीटर परिसरात टेहळणी करू शकतो. युद्ध काळात मानव विरहित टेहळणी करणारा ड्रोण सध्या युद्धनीतीमध्ये माहिती गोळा करणारे यंत्र म्हणून प्रामुख्याने वापरल्या जाते. शासनाच्या विविध योजना राबविण्यासाठी ड्रोनचा वापर, लग्नामध्ये शुटींग करण्यासाठी, क्वचित प्रसंगी शहरात पोलिसांनी वापरलेला ड्रोन आपण बघितला असेल मात्र हा ड्रोन अधिक सक्षम असून त्यांच्या उच्च क्षमतेची माहिती या ठिकाणी मिळते.

याच दालनात अन्य एका स्टॉलवर ‘कन्फाईंड स्पेस रिमोटली ऑपरेटेड व्हेईकल’ नावाचे अद्भुत यंत्र आहे. हे यंत्र जमिनीवर कुठेही दडवलेले स्फोटक शोधून काढते. एवढेच नव्हे तर पायऱ्या चढून स्वतःच स्फोटके लपवलेली बॅग शोधू शकते. स्फोटक शोधणे, उचलणे, स्फोटक जिवंत आहे अथवा नाहीत याचे विश्लेषण करणे. वेळ नसेल तर त्याच ठिकाणी स्फोटक निकामी करते. अशा पद्धतीचे केवळ रिमोटवर चालणारे हे यंत्र असून अडचणीच्या ठिकाणी ठेवलेले स्फोटक शोधून काढण्याचे कौशल्य हे त्याचे वैशिष्ट्य आहे. मानवाच्या प्रतिकृतीत तसेच छोट्या खेळण्याच्या आकारात हे यंत्र लक्ष वेधून घेते.

समुद्राच्या तळाशी पाणबुडीच्या युद्धाचे अनेक चित्रपट आपण बघितले असतील. मात्र ‘सबमरीन सोनार सिस्टम’ काय असते, याची माहिती सगळ्यांना नाही. समुद्राच्या पोटात अनेक हालचाली होत असतात त्यांचे तांत्रिक विश्लेषण ही यंत्रणा करते. समुद्रात निर्माण होणाऱ्या ध्वनीलहरी वरून नेमके अंतर कसे काढायचे, त्याचे विश्लेषण कसे करायचे, या विश्लेषणाचा नेमकेपणा कसा असतो, याबाबतची माहिती या ठिकाणी दिली जाते. दिशा ठरवणे आणि अंतर ठरवणे अशी विभागणी सोनार सिस्टममध्ये केलेली असते. सैनिकी कारवाया, नागरिकांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करताना हे तंत्रज्ञान वेगवेगळ्या स्वरूपात वापरले जाते.

या ठिकाणी आणखी एक दालन ‘डिफेन्स जिओ इन्फॉर्मेटिक्स रिसर्च एस्टॅब्लिशमेंट’ चंदीगड येथील संस्थेच्या कामकाजाची माहिती देते. ही संस्था हिमालयामध्ये निर्माण होणाऱ्या हिम वादळासंदर्भात विश्लेषण देते. हिम वादळ निर्माण होणार अथवा कसे? यासंदर्भात सैन्यदलास माहिती देण्याचे काम ही संस्था करते. हिमालयामध्ये कोणत्या ठिकाणी कोणत्या क्षमतेचे बर्फाचे वादळ निर्माण होऊ शकते; याची कल्पना या संस्थेमार्फत दिली जाते. याशिवाय क्षेपणास्त्रांबाबतची अनेक दालने या ठिकाणी आहेत. यामध्ये मध्यम परिणामकारक मारा करणारे क्षेपणास्त्र व त्याची वैशिष्ट्ये सांगितली जातात. हवेतून हवेत मारा, हवेतून टॅंक निकामी करणारे, लांब अंतरावर मारा करणारे अनेक क्षेपणास्त्र येथे प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत.

Check Also

६२ वसतिगृहे या जिल्ह्यांमध्ये सुरु करण्यास सरकारची मान्यता

सामाजिक न्याय विभागांतर्गत स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतून ऊसतोड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *