Breaking News

अनाथांच्या डोक्यावरची असलेली सिंधूताई नावाची छत्रछाया हरविली वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी ई-बातम्या टीम

आपल्या वैयक्तीक आयुष्यात आलेल्या कटू अनुभवांना मायेच्या झऱ्यात परिवर्तित करून हजारो अनाथ मुलांच्या डोक्यावर मायेची छत्रछाया धरणाऱ्या आणि त्यांच्यासाठी आयुष्यभर वटवृक्ष बनणाऱ्या सिंधूताई सपकाळ यांचे आज पुण्यात वयाच्या ७३ व्या वर्षी रात्री ८ वाजता निधन झाले.

अत्यंत मनमिळावू, प्रेमळ आणि सगळ्यांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या सिंधूताईंच्या निधनानं हजारो लेकरं पोरकी झाली. पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात  त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. सिंधुताई यांच्यावर महिनाभरापूर्वी हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

सिंधुताई यांच्यावर मागील महिनाभरापासून उपचार सुरु होते. त्यांच्यावर हर्निया संबंधित शस्त्रक्रिया झाल्यानंतर सुरुवातीला त्यांनी उपाचाराला प्रतिसाद दिला. मात्र, आज सकाळपासून त्यांनी उपचाराला प्रतिसाद देणं बंद केल्याची माहिती सिंधुताई यांचे निकटवर्तीय सुरेश वैराळकर यांनी दिली.

सिंधुताई सपकाळ यांचं पार्थिव उद्या सकाळी ८ वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता ठोसर पागेत महानुभाव पंथानुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. सिंधुताई यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.

सिंधूताई सपकाळ यांचा संक्षिप्त प्रवास

सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा येथे झाला होता. वर्धा जिल्ह्यातील नवरगाव ही सिंधुताई यांची जन्मभूमी. त्यांचा विवाह वयाच्या ९ व्या वर्षी वयाने २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला होता. घरी प्रचंड सासुरवास होता. कुटुंबात शैक्षणिक वातावरण नव्हते. नवऱ्याने चारित्र्याचा संशय घेऊन त्यांना घराबाहेर काढलं. घरच्यांनीही त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे परभणी-नांदेड-मनमाड रेल्वे स्टेशनांवर सिंधुताई भीक मागत हिंडायच्या. एकदा तर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. अनेक दिवस भीक मागितल्यानंतर त्या स्मशानातही राहिल्या. त्यानंतर त्यांनी अनाथ मुलांना सांभाळण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी ममता बाल सदनची स्थापनाही केली.

पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. अनाथ, बेवारस मुलांना सांभाळतानाच त्यांना शिक्षण, अन्न, कपडे देण्यास त्यांनी सुरुवात केली. या संस्थेत १ हजार ५० मुले या राहिलेली आहेत. त्यांनी पुण्यात बाल निकेतन, चिखलदरा येथे सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, वर्ध्यात अभिमान बाल भवन, गोपिका गाईरक्षण केंद्र, सासवडमध्ये ममता बाल सदन आणि पुण्यात सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्थेची स्थापना केली.

त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक नेत्यांसह मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

Check Also

बिल्कीस बानोप्रकरण सर्वोच्च न्यायालयः आधी शरण या मुदतवाढ नाही

गुजरातमधील गोध्रा दंगली दरम्यान तथाकथित हिंदूत्वावादी विचाराच्या लोकांनी बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचर करत तिच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *