Breaking News

वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार घरून या संकेतस्थऴावर करता येणार अर्ज

स्वच्छ भारत अभियान (ग्रा.) अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालय नसलेल्या पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करण्याची सुविधा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने सुरु केली आहे. या प्रणालीद्वारे ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधण्याकरिता व त्यानंतर प्रोत्साहन अनुदान मान्यतेसाठी अर्ज करता येणार आहे.

स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) ही केंद्र पुरस्कृत महत्वाकांक्षी योजना, केंद्र शासन व राज्य शासनाच्या संयुक्त उपक्रमाद्वारे राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेसंदर्भात जनजागृती निर्माण करणे, स्वच्छतेची व्याप्ती वाढविणे व उघड्यावर मलविसर्जन करण्यास प्रतिबंध करण्यासाठी लाभार्थी कुटुंबाने वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण केल्यानंतर अनुषंगिक प्रोत्साहन अनुदान देण्यात येते. या योजनेअंतर्गत, दारिद्र्य रेषेखालील सर्व कुटुंबे व दारिद्र्यरेषेवरील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, लहान व अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन शेतमजूर, शारीरिकदृष्ट्या अपंग आणि महिला कुटुंब प्रमुख हे घटक प्रोत्साहन अनुदानास पात्र करण्यात आले आहेत.

यापूर्वी पायाभुत सर्वेक्षणात आढळलेल्या व वैयक्तिक शौचालय नसलेल्या, पायाभूत सर्वेक्षणातून सुटलेल्या तसेच पायाभूत सर्वेक्षणाबाहेरील अशा ६६ लाख ४२ हजार ८९० कुटुंबांना वैयक्तिक शौचालय सुविधा, स्वच्छ भारत अभियान (ग्रा.) च्या पहिल्या टप्प्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. राज्यामध्ये स्वच्छतेचा जागर कायम रहावा व स्वच्छ भारत अभियान (ग्रा.) अंतर्गत शौचालय सुविधेपासून कोणीही वंचित राहू नये, याकरिता आता दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालय नसलेल्या पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालय उपलब्ध व्हावीत यासाठी घरी बसूनच ऑनलाईन प्रणालीद्वारे वैयक्तिक शौचालयाकरिता अर्ज करण्याची सुविधा, https://sbm.gov.in/sbm_dbt/secure/login.aspx किंवा https://sbm.gov.in/sbmphase२/homenew.aspx या लिंक द्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या लिंकवर नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जदारास वैयक्तिक शौचालय बांधण्याकरिता व त्यानंतर वितरणासाठी प्रोत्साहन अनुदानाकरिता मान्यतेसाठी अर्ज करता येणार आहे. पात्र कुटुंबांनी या सुविधेचा लाभ घेवून राज्याला हागणदारीमुक्त करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने केले आहे.

Check Also

उच्च शिक्षणाच्या शिष्यवृत्ती योजनेत अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ

देशातील नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *