होळी, धूलिवंदन व रंगपंचमीबाबत गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. होळी, धूलिवंदन व रंगपंचमी उत्सव नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन अथवा गर्दी करुन साजरे न करता स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून काळजी घेऊन साजरे करावे, असे गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
होळी / शिमगा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी १७ मार्च, २०२२ रोजी होळीचा सण आहे. कोविड संक्रमणामुळे हा सण शक्यतोवर गर्दी न करता कोविड अनुरुप वर्तणूक (Covid Appropriate Behaviour) नियमांचे पालन करुन साजरा करावा. तसेच १८ मार्च रोजी धूलिवंदन व २२ मार्च रोजी रंगपंचमी हे सण साजरे करण्यात येणार आहेत. या सणानिमित्ताने एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करण्यात येत असते. परंतु कोविड १९ चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी धुलिवंदन व रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत.
होळी / शिमगा सणानिमित्ताने (विशेष करून कोकणात) पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतु यावर्षी देखील पालखी घरोघरी न नेता स्थानिक मंदिरातच दर्शनाची व्यवस्था होईल याकरीता स्थानिक प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. तसेच त्याठिकाणी गर्दी होणार नाही व कोविड अनुरुप वर्तणूक नियमांचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घ्यावी. महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने १ मार्च, रोजी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असे गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे.
Tags holi festival holi festival guideline home department
Check Also
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ कायद्याची अंमलबजावणी, अन्यथा शाळांवर कारवाई पिवळी रेषा रेखांकन न करणाऱ्या शाळांवर कारवाई करणार- राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम
केंद्र शासनाच्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ कायदा (कोटपा)-२००३ ची राज्यभर अंमलबजावणी करण्यात येत असून या …